अशोक गेहलोत यांचं नाव ठरवायला राहुल गांधींना एवढा वेळ का लागला?

वव

फोटो स्रोत, Twitter

    • Author, अभिजित करंडे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

गेल्या तीन दिवसांपासून असलेल्या सस्पेन्सवर अखेर पडदा पडलाय. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी जुणेजाणते अशोक गेहलोत यांची वर्णी लागलीय. तर तरुणतुर्क सचिन पायलट उपमुख्यमंत्री असतील.

राहुल आणि सोनिया गांधींशी झालेल्या बैठका आणि चर्चांच्या मालिकांनंतर हा निर्णय घेण्यात आला. राजस्थानचे प्रभारी वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली.

यावेळी सचिन पायलट यांनी "कुणाला माहिती होतं, की दोन-दोन करोडपती होणार आहेत," असं म्हणत वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला.

पण या सगळ्या सस्पेन्सचा हॅपी एन्ड होण्याआधी करौली, टोंक आणि भरतपूर जिल्ह्यात सचिन पायलट समर्थकांनी रास्ता रोको केला. एका ठिकाणी रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला. निदर्शनं केली.

अशोक गहलोत आणि सचिन पायलट समर्थक आमने-सामने आले. यानंतर जयपूरमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. आणि हे सगळं मुख्यमंत्रिपदाचा फैसला होत नसल्याने सुरु होतं.

त्यामुळेच 3 राज्यांत सत्तेत आल्यानंतर आणि मुख्यमंत्री निवडण्याचे अधिकार राहुल गांधींकडे असतानाही मुख्यमंत्री निवडीसाठी राहुल गांधींना इतका वेळ का लागला, हा प्रश्न आहे.

गुरुवारपासून अशोक गहलोत, सचिन पायलट आणि राहुल गांधी यांच्यात बैठकांची अनेक सत्रं झाली. संध्याकाळी अशोक गहलोत जयपूरला निघण्यासाठी दिल्ली विमानतळावर पोहोचले. पण हायकमांडचा फोन आल्यानंतर परत ल्युटियन्स झोनमध्ये परतले.

राजकीय निरीक्षकांच्या मते सचिन पायलटही मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडायला तयार नव्हते. सोनियांनी समजावल्यानंतरही ते आपल्या मतावर ठाम होते. अखेर राहुल गांधींनी त्यावर उपमुख्यमंत्रिपद देऊन तोडगा काढला.

4 दशकं राजकीय पत्रकारिता करणाऱ्या आणि काँग्रेसचा जवळून अभ्यास करणाऱ्या राशीद किडवाई यांच्या मते "तीन राज्यांत सत्ता आल्यानंतर राहुल गांधींसाठी ही एक चांगली संधी होती. पक्षात कुठलेही मतभेद नाहीत आणि काँग्रेसमध्ये निर्णय प्रक्रिया स्पष्ट आहे, हे दाखवता आलं असतं. 2019च्या निवडणुकीआधी थेट संदेश कार्यकर्त्यांमध्ये गेला असता आणि तो मैलाचा दगड ठरला असता. पण राहुल गांधींनी ती संधी गमावली आहे. निकालांच्या 48 तासांनंतरही मुख्यमंत्री ठरवता येऊ नये आणि निव्वळ बैठकांची मालिका सुरू राहणं हे त्यांच्या निर्णयक्षमतेतील उणिवा दाखवतं."

गेहलोत

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, अशोक गेहलोत यांच्यासोबत राहुल गांधी

अशोक गेहलोत आक्रमक का?

अशोक गहलोत गेली 40 वर्षं राजस्थानच्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत. याआधी दोनवेळा त्यांनी मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. त्यामुळे राज्यातल्या बहुतेक आमदारांच्या ते निकट आहेत. त्यांची प्रशासनावर चांगली पकड आहे, असं जाणकार सांगतात.

राज्यात गहलोत यांचं सरकार असताना काही योजना त्यांनी प्रभावीपणे राबवल्या आहेत. राजस्थानशी त्यांचं भावनिक नातं आहे. त्यामुळे पक्षात सध्या राहुल गांधी यांच्यानंतर गहलोत यांना महत्त्व असलं तरी त्यांना मुख्यमंत्रिपदात रस आहे.

सचिन पायलट का आग्रही आहेत?

2014च्या लोकसभा निवडणुकीत UPAचा दारुण पराभव झाला. राजस्थानात तर काँग्रेसला खातंही उघडता आलं नाही. विधानसभेत वसुंधरा राजेंनी 165 जागा जिंकल्या. काँग्रेसला अवघ्या 21 जागा मिळाल्या.

अशा विषम परिस्थितीत सोनिया गांधींनी सचिन पायलट यांच्याकडे राजस्थानच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली. पायलट यांनी पुन्हा नव्यानं संघटना बांधली. कार्यकर्त्यांना बळ दिलं.

4 वर्षांतला बराच काळ त्यांनी राजस्थानमध्येच घालवला. त्यामुळे पायलट सोनिया आणि राहुल गांधींनी समजूत घातल्यानंतरही आपल्या मतावर ठाम होते, असं राजकीय निरीक्षक सांगतात.

राहुल गांधी

फोटो स्रोत, Twitter/incindia

असं असलं तरीसुद्धा हा पेच आधीच संपायला हवा होता, असं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे. CNN-News18 या न्यूज चॅनलच्या जयपूर प्रतिनिधी असलेल्या स्वाती वशिष्ठ सांगतात की "सध्या राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेसमध्ये जे सुरू आहे, ते खूपच लाजिरवाणं आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याशी गेहलोत आणि पायलट यांच्या अनेक बैठका होऊनही ते माघार घ्यायला तयार नहते. हे चित्रं फार चांगला संदेश देणारं नाही. राहुल गांधी यांच्यासमोर हे सर्वांत मोठं आव्हान असणार आहे."

हायकमांड पेचात का होतं?

राजकीय विश्लेषकांच्या मते 2019च्या निवडणुकीआधी राजस्थानात गेहलोत किंवा पायलट या दोघांनाही नाराज करणं परवडणारं नाही.

राशीद किडवई सांगतात, "सचिन पायलट यांची प्रतिमा स्वच्छ नेत्याची आहे. तरुणांमध्ये त्यांची क्रेझ आहे. त्यांना या निवडणुकीत शेतकऱ्यांच्या भावनेला हात घातलाय. तसंच 2019च्या लोकसभेआधी पक्षात तरुणांना वाव मिळत असल्याचं आधोरेखित होईल. पण दुसरीकडे अशोक गहलोत संजय गांधींपासून गांधी परिवाराच्या निकट आहेत. दूरदृष्टी असलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे. राजस्थानच्या जनतेशी त्यांचं जवळचं नातं आहे. प्रशासनावर पकड आहे. शिवाय ते लोकसभा निवडणुकीआधी करिश्मा घडवू शकतात."

गेहलोत राजस्थानात परतले आता दिल्लीत कोण?

अशोक गेहलोत हे काँग्रेसचे सरचिटणीस आहेत. सोनियांच्या काळात जे महत्त्व अहमद पटेल यांना होतं, तेच राहुल गांधींच्या काळात गेहलोतांना आहे. राहुल गांधी यांच्यानंतर पक्षातलं सर्वांत महत्त्वाचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.

गुजरात आणि कर्नाटक निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. अत्यंत शांतपणे राजकीय परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य दिसून आलं. साध्या राहणीमुळे त्यांच्याबद्दल पक्षातही उत्तम मत आहे. त्यामुळे जर गहलोत यांना हायकमांडनं पुन्हा राजस्थानात धाडलं खरं, पण ती जागा कोण भरुन काढणार? हा पेच आणि उत्सुकताही आहे.

बीबीसीने राहुल गांधींना मुख्यमंत्री निवडण्यासाठी इतका वेळ का लागला यावर काँग्रेसच्या नेत्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण यावर कुणीही प्रतिक्रिया दिली नाही.

अखेर राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपद जुन्याजाणत्यांकडे सोपवून तरुणतुर्कांना उपमुख्यमंत्रिपद देऊन खूश केलं. आता हा राजकीय समतोल राजस्थानच्या प्रशासनात कसा दिसेल? जो करिश्मा गेहलोत-पायलट जोडीने विधानसभेत दाखवला, तो 2019 च्या लोकसभेतही पाहायला मिळेल का? याचं उत्तर 4 महिन्यात मिळेल.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)