नासा अंतराळ मोहीम: SpaceX काय आहे? आणि त्यांच्या अंतराळवीरांच्या स्पेस सूटचं वैशिष्ट्यं काय?

"गो नासा. गो स्पेसएक्स. गॉड स्पीड बॉब अँड डग."

नासाच्या अधिकृत चॅनलवर सुरू असलेल्या प्रक्षेपणादरम्यान समालोचकाचे हे शब्द, जेव्हा अमेरिकेच्या केनेडी स्पेस सेंटरमधून SpaceXचं एक अंतराळयान दोन अंतराळवीरांना घेऊन झेपावलं.

बुधवारी खराब हवामानामुळे रद्द करण्यात आलेलं लाँचिंग अखेर शनिवारी यशस्वीरीत्या झालं.

या फाल्कन-9 रॉकेट आणि क्रू ड्रॅगन कॅप्सूलमधून नासाचे दोन अमेरिकन अंतराळवीर - डग हर्ले आणि बॉब बेंकेन हे स्पेस एक्समधून अंतराळातल्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनकडे जाण्यासाठी झेपावले.

पण ही स्पेस एक्स मोहीम अनेक कारणांसाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण पहिल्यांदाच एक खासगी कंपनी नासाच्या मदतीने अंतराळवीर पाठवणार आहे.

स्पेस एक्स काय आहे?

स्पेस एक्स ही टेस्लासाठी प्रसिद्ध असणाऱ्या इलॉन मस्क यांची कंपनी आहे. 2002 मध्ये सुरू झालेल्या या कंपनीने आतापर्यंत पुन्हा वापरण्याजोगी म्हणजेच रियुजेबल रॉकेट लाँच सिस्टीम तयार केलेली आहे, अंतराळात कार पाठवलीय, उपग्रह त्यांच्या पृथ्वीभोवतीच्या कक्षेत पाठवले आहेत.

आता या कंपनीने नासासोबत भागीदारी केलीय ती अंतराळवीरांना पाठवण्यासाठी. म्हणजेच अंतराळात आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये माणसं पाठवणारी ही पहिली खासगी कंपनी ठरणार आहे.

अमेरिकेने त्यांच्याकडची स्पेस शटल्स वापरणं 2011 मध्ये बंद केलं. त्यानंतर अमेरिकन अंतराळवीरांना घेऊन जाणारी ही पहिली मोहीम आहे.

अमेरिकेच्या नासाने बोईंग कंपनीशीदेखील अंतराळवीरांना स्पेस स्टेशनपर्यंत नेण्यासाठी अशाच प्रकारचा करार केलेला आहे.

अंतराळवीरांच्या स्पेससूटचं वैशिष्ट्यं

बुधवारची मोहीम रद्द झाली, पण स्पेसएक्सने बनवलेल्या या अंतराळवीरांच्या सूट्सनी मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. कारण आतापर्यंतच्या अंतराळवीराच्या स्पेस सूट्पेक्षा हे सूट्स वेगळे होते. या सूटना 'स्टारमन सूट्स' म्हटलं जातंय.

आतापर्यंतच्या बोजड सूट्सपेक्षा हे स्पेससूट सुटसुटीत होते. यातली हेल्मेट्स 3D प्रिंट करण्यात आली असून ग्लोव्हज टचस्क्रीन सेन्सिटिव्ह आहेत. म्हणजेच हे ग्लोव्ह्ज घालूनही अंतराळवीर टचस्क्रीन वापरू शकतील.

पण आतापर्यंतच्या स्पेस सूट्सप्रमाणेच याही सूट्सचा उद्देश तोच आहे - क्रू मेंबर्सना कमी दबावापासून वाचवणं. यामध्ये कॅपस्युलमधला हवेचा दाब कमी होतो. याशिवाय अंतराळवीरांना पुरेसा ऑक्सिजन मिळत राहील आणि त्यांच्या शरीराचं तापमान काय राहील याचीही काळजी हे स्पेस सूट्स घेतात. या स्पेससूट्सना एका 'नाळेने' जोडलं जातं ज्यातून त्यांना संपर्कासाठीच्या लिंक्स आणि श्वसनासाठीचे वायू पुरवले जातात. आणि ही केबल वा नाळ त्यांच्या सीटला जोडलेली असते.

कॅप्टन अमेरिका : सिव्हिल वॉर आणि बॅटमॅन व्हर्सेस सुपरमॅन : डॉन ऑफ जस्टिस यासारख्या चित्रपटांचं काम करणारे हॉलिवुडचे कॉस्च्युम डिझायनर होजे फर्नांडिस यांनी हे स्पेस सूट्स डिझाईन केले आहेत.

हे सूट्स स्पेस एक्सच्या कॅप्स्यूलमध्ये - म्हणजेच क्रू ड्रॅगनमध्ये वापरता येतील. स्पेसवॉक्ससाठी म्हणजेच स्पेस स्टेशनच्या बाहेर पडून काम करण्यासाठी हे सूट्स वापरता येणार नाहीत.

क्रू ड्रॅगन काय आहे?

या अंतराळवीरांना ISS म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनकडे घेऊन जाणाऱ्या अंतराळयानाला (Spacecraft) क्रू ड्रॅगन म्हटलं जातंय. ISS कडे सामान घेऊन जाणाऱ्या ड्रॅगन या अंतराळयानाची ही सुधारित आवृत्ती आहे. जास्तीत जास्त 7 प्रवासी घेऊन जाण्याची या क्रू ड्रॅगनची रचना आहे. पण नासा यामधून जास्तीत जास्त 4 प्रवासी नेईल आणि इतर जागा सामानासाठी वापरली जाईल.

या क्रू ड्रॅगनमध्ये असलेल्या Thrusters च्या मदतीने या अंतराळयानाची दिशा ठरवता येईल आणि हे यान स्पेस स्टेशनला जोडता येईल वा तिथून काढता येतील.

शिवाय आतापर्यंतच्या यानांपेक्षा वेगळी गोष्ट म्हणजे या यानामध्ये आतापर्यंतच्या बटणांच्या ऐवजी सगळे कन्ट्रोल्स टचस्क्रीनवर असणार आहेत.

कोरोना व्हायरस आणि अंतराळ मोहीम

कोरोना व्हायरसच्या बाबतीत या मोहीमे दरम्यान विशेष काळजी घेतली जातेय. कोणत्याही पद्धतीने कोव्हिडचा विषाणू अंतराळात पोहोचणार नाही, यासाठीची संपूर्ण खबरदारी घेण्यात आलीय.

अंतराळात जाणाऱ्या व्यक्तींना हे नेहमीच मोहीमेच्या आधी विशेष काळजी घ्यावी लागते. पण यावेळी डग हर्ले आणि बॉब बेंकेन या दोन्ही अंतराळवीरांना बरेच दिवस आधीच क्वारंटाईन करण्यात आलं होतं.

टेक्सासमधल्या नासाच्या ह्युमन स्पेसफ्लाईट हेडक्वार्टर्समध्ये या दोघांनाही क्वारंटाईन करण्यात आलं होतं.

विशेष म्हणजे हे दोन्ही अंतराळवीर यापूर्वी दोनदा अंतराळात जाऊन आलेले आहेत.

स्पेस एक्स मोहीम महत्त्वाची का?

नासाच्या आतापर्यंतच्या सगळ्या मोहीमा आणि स्पेस एक्स मोहीमेतला मुख्य फरक म्हणजे यासाठीची संपूर्ण तयारी आणि आखणी, खर्च स्पेस एक्स या कंपनीने केलेला आहे.

नासाने 2011 पासून अंतराळवीरांना घेऊन जाणाऱ्या मोहीमा राबवलेल्या नाहीत. कारण नासाने या वर्षी त्यांची स्पेस शटल्स वापरणं बंद केलं.

त्यानंतर अमेरिका त्यांचे अंतराळवीर पाठवण्यासाठी रशिया आणि त्यांच्या सोयूझ एअरक्राफ्टवर अवलंबून होती. आणि यासाठी त्यांना मोठा खर्च करावा लागत होता.

त्यामुळेच अंतराळवीरांना अंतराळात नेण्यासाठी वा इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपर्यंत नेण्यासाठी त्यांनी स्पेस एक्स आणि बोईंग या कंपन्यांशी करार केलेला आहे.

शिवाय स्पेस एक्सने डिझाईन केलेली रॉकेट्स ही पुन्हा वापरता येण्याजोगी म्हणजेच री-युजेबल असल्याने पैसा वाचणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)