HCQ : डोनाल्ड ट्रंप घेत असलेल्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधावरून WHOने युटर्न घेतलाय का?

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना रुग्णांसाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाच्या वापरासंदर्भात क्लिनिकल ट्रायलला काही काळासाठी तत्त्वासाठी स्थगिती दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक डॉ. टेड्रॉस एडहॅनम गेबेरियेसुस सोमवारी म्हणाले की, डेटा सेफ्टी मॉनिटरिंग हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाच्या सुरक्षित उपयोगाबाबत अभ्यास करतील. जगभरात या औषधाच्या वापरासंदर्भात सुरू असलेल्या प्रयोगांचंही विश्लेषण करण्यात येईल.

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि क्लोरोक्वीन या औषधांचा उपयोग मलेरिया तसंच लुपस या ऑटोइम्यून आजारांचा बीमोड करण्यासाठी केला जातो, असं टेड्रॉस यांनी सांगितलं.

मात्र कोरोना रुग्णांसाठी हे औषध सुरक्षित आहे का, यासंदर्भात साशंकता व्यक्त केली जात आहे.

ट्रेडॉस यांनी लॅन्सेट या विज्ञानविषयक शोधपत्रिकेत छापून आलेल्या लेखाचा संदर्भ दिला. या अभ्यासानुसार कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन दिलं गेलं तर त्यांना मृत्यूचा धोका संभवतो.

हे संशोधन समोर आल्यानंतर शनिवारी जागतिक आरोग्य संघटनेनं सॉलिडरिटी ट्रायलच्या एक्झिक्युटिव्ह गटाची बैठक झाली. दहा सदस्य देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत या गटाने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाच्या क्लिनिकल ट्रायलला हंगामी पातळीवर स्थगिती दिली आहे.

जगभरात या औषधासंदर्भात सुरू असणाऱ्या प्रयोगांचं विश्लेषण केलं जाईल, असं स्पष्ट करण्यात आलं.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध घेत असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे हे औषध चर्चेत आलं होतं.

कोरोना रुग्णांसाठी हे औषध किती परिणामकारक ठरतं हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

मार्च महिन्यात भारताने या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. भारताने हा प्रतिबंध हटवावा आणि अमेरिकेला पुरवठा करावा असं ट्रंप यांचा आग्रह होता. ट्रंप यांच्या वक्तव्यानंतर भारताने या औषधाच्या निर्यातवरची बंदी काही प्रमाणात हटवली होती.

जागतिक आरोग्य संघटनेची आधीची भूमिका काय होती?

जागतिक आरोग्य संघटनेच्या कोव्हिड-19 बाबतच्या क्लिनिकल मॅनेजमेंट ब्लू-प्रिंटमधील माहितीनुसार, प्रयोगशाळेतील तपासणीत 'हायड्रोक्सिक्लोरोक्वीन'चा कोव्हिड-19 विरोधात एंटी व्हायरल म्हणून फायदा होत असल्याचं आढळून आलं आहे. मात्र, चीनमध्ये कमी लक्षणं असलेल्या कोव्हिड-19 च्या तीस रुग्णांवर करण्यात आलेल्या संशोधनात या औषधाच्या वापरामुळे रुग्ण बरा होण्याच्या अवधीचा वेळ कमी झाला किंवा व्हायरस क्लिअरन्स झाल्याचं आढळून आलं नाही.

हायड्रोक्सिक्लोरोक्वीन'चा उपचार पद्धत म्हणून वापर करण्याबाबत सध्या संशोधन सुरू आहे.

भारतात वापराला सुरुवात

भारतातील संशोधन क्षेत्रात काम करणारी सर्वात मोठी संस्था ICMR म्हणजे इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने देशात 'हायड्रोक्सिक्लोरोक्वीन' औषधाच्या प्रतिबंधात्मक वापरासाठी शिफारसी जारी केल्या होत्या.

"प्रयोग शाळेत झालेल्या संशोधनातून या औषधाचा फायदा होत असल्याचं समोर आलं आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची काळजी घेणारे आरोग्य कर्मचारी आणि कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लक्षणं नसलेल्या व्यक्तींना हे औषध प्रतिबंधात्मक म्हणून देण्यात यावं," असं ICMRने आधी म्हटलं होतं.

WHOच्या ताज्या निर्णयानंतर मात्र भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) महासंचालक बलराम भार्गव म्हणाले की "क्लोरोक्विन हे औषध जवळजवळ शंभर वर्षांपासून वापरात आहे, आणि हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे अधिकच सुरक्षित आहे, मलेरियासाठी सर्वत्र वापरलं जातं.

"वैद्यकीय शक्यता बघता आणि या औषधीची उपलब्धता बघून आम्ही याचा वापर सुचवला होता, पण काटेकोरपणे वैद्यकीय निरीक्षणात. अमेरिकन सरकारसुद्धा ते वापरू लागलं आणि ते अचानक लोकप्रिय झालं. त्यांनी तातडीने त्याला मान्यताही दिली आणि त्यामुळे आम्हालाही वाटलं की ते कदाचित कोरोनावर काम करेल."

HCQचे फायदे आणि धोक्यांविषयी भारतात एम्स, ICMR आणि दिल्लीच्या तीन सार्वजनिक रुग्णालयांमध्ये तपासणी आणि अभ्यास करण्यात आले, असंही त्यांनी सांगितलं.

"यातून असं लक्षात आलं की याचे मळमळ होणे किंवा छातीत धडधडणे, याशिवाय दुसरे कोणतेही मोठे दुष्परिणाम होत नाहीय. त्यामुळे कोरोनाशी थेट लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना तरी हे औषध घेण्यापासून रोखलं जाऊ नये. तसंच PPEचा वापर सुरू राहिला पाहिजेच," असंही ते म्हणाले.

औषधाची मात्रा कशी असेल?

याबाबत बोलताना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलच्या किडनीविकार विभागाचे प्रमुख डॉ. श्रीरंग बिच्चू म्हणतात, "इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या शिफारसींनुसार दिल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक डोसचा लोकांवर फारसा विपरीत परिणाम होणारा नाही.

"पहिल्या दिवशी 400 मिलीग्रॅम गोळी दिवसातून दोन वेळा आणि त्यानंतरच्या प्रत्येक आठवड्यात, सात आठवड्यांपर्यंत हा डोस दिवसातून एकदा लोकांना देण्यात येणार आहे. याचा एक फायदा म्हणजे भविष्यात आपल्याला या संशोधनातून उत्तर मिळू शकतं."

'हायड्रोक्सिक्लोरोक्वीन' मुळे काय होईल?

ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयाचे हृदयविकारतज्ज्ञ डॉ. विजय सुरासेंनी सांगितलं, "हायड्रोक्सिक्लोरोक्वीनच्या वापराने कोव्हिड-19 इन्फेक्शनचा वेळ आणि तीव्रता कमी होण्यास मदत होईल. ज्यामुळे रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते. या औषधामुळे आजारात निर्माण होणारी गुंतागुत आणि मृत्यूची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे न्यूमोनिया होण्याची शक्यताही कमी होण्यास मदत होईल."

तर, डॉ. बिच्चू म्हणतात, "हायड्रोक्सिक्लोरोक्वीन' चा कोव्हिड-19 विरोधात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फायदा झाल्याचा काहीच वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. पण या औषधातील मेकॅनिझमचा फायदा कोव्हिड-19 व्हायरसला शरीरातील पेशींमध्ये जाण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी होऊ शकतो."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)