You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस: 'या' देशामध्ये आढळला नाही कोरोनाचा एकही रुग्ण
- Author, अब्दुजलील अब्दुलासुलोव्ह
- Role, बीबीसी न्यूज
जगातले 211 देश कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. मात्र, काही मोजकी राष्ट्रं आहेत जिथे अजून तरी कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही. तुर्कमेनिस्तान यापैकीच एक.
पण तज्ज्ञांच्या मते कदाचित इथलं सरकार खरी माहिती दडवत आहे आणि असं असेल तर यामुळे कोरोनामुळे निर्माण झालेल्या जागतिक आरोग्य संकटाचा सामना करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसू शकते.
अनेक देशांमध्ये लॉकडाऊन असताना तिकडे तुर्कमेनिस्तानमध्ये मात्र जागतिक आरोग्य दिनानिमित्त सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.
देशात अजून एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही, असा तुर्कमेनिस्तानचा दावा आहे. मात्र, सेन्सॉरशिपसाठी ओळखल्या जाणाऱ्या या देशाकडून देण्यात येणाऱ्या आकडेवारीवर विश्वास ठेवला जाऊ शकतो का?
- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?
प्रा. मार्टिन मॅक्की लंडनमधल्या 'स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीन' मध्ये प्राध्यापक आहेत. तुर्कमेनिस्तानातल्या आरोग्य व्यवस्थेचा त्यांचा अभ्यास आहे. प्रा. मार्टिन मॅक्की सांगतात, "तुर्कमेनिस्तानकडून अधिकृतरित्या जी आकडेवारी देण्यात येत आहे, त्यावर अजिबात विश्वास ठेवता येत नाही."
ते पुढे म्हणतात, "गेल्या दशकात तुर्कमेनिस्तानात एड्स/एचआयव्हीचा एकही रुग्ण नसल्याचा दावा केला होता. यावरही विश्वास ठेवता येत नाही. 2000 च्या दशकात या देशानं अनेक आजारांविषयीची माहिती दडवली होती. यात प्लेगचाही समावेश होता."
तुर्कमेनिस्तानमध्ये अनेकांना कोव्हिड-19 आजाराची भीती वाटते. त्यामुळे ते या आजाराने ग्रस्त असण्याची शक्यता आहे.
कोरोनासाठीचा कृती आराखडा काय आहे?
तुर्कमेनिस्तानची राजधानी अश्गाबाटमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितलं, "माझ्या ओळखीची एक व्यक्ती सरकारी एजन्सीमध्ये काम करते. त्याने मला सांगितलं, की इथे विषाणुचा प्रादूर्भाव झाला आहे किंवा मी याबाबत ऐकलं आहे, असं कुणालाही सांगू नकोस. नाहीतर मीच अडचणीत येईल."
खरंतर तुर्कमेनिस्तान प्रशासन सातत्याने या संसर्गजन्य आजारापासून बचावाचे प्रयत्न करत आहे आणि संक्रमित लोकांचा शोधही घेत आहे.
संयुक्त राष्ट्रांसोबत तुर्कमेनिस्तान कोरोनावरच्या कृती आराखड्याविषयी चर्चादेखील करत आहे.
या आराखड्यात समन्वय, जोखिमीविषयी संवाद, तपास, लॅब चाचणी आणि इतर उपायांवरही चर्चा सुरू असल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या तुर्कमेनिस्तानमधील रेसिडेंट कोऑर्डिनेटर एलेना पनोवा यांनी बीबीसीला सांगितलं.
देशात अजून एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही, या तुर्कमेनिस्तानच्या दाव्याविषयी विचारल्यावर त्या थेट उत्तर द्यायला कचरत असल्याचं आम्हाला जाणवलं.
त्या म्हणाल्या, "आम्ही अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवत आहोत. कारण इतर देशांमध्येही असंच आहे. यात विश्वासाचा प्रश्नच नाही. काम असंच करतात."
सुरुवातीच्या दिवसांमध्येच हवाई प्रवासावर आणि वाहतुकीच्या इतर मार्गांवरही निर्बंध घातल्याने इथे संसर्ग झाला नाही, असं एलेना पनोवा यांना वाटतं.
तुर्कमेनिस्तानने जवळपास महिनाभरापूर्वीच ज्या सीमांवरून वाहतूक सुरू होती, त्या बंद केल्या होत्या.
शिवाय फेब्रुवारी महिन्यातच चीन आणि इतर काही देशांमधली हवाई वाहतूकही बंद केली होती. इतकंच नाही तर सर्वच आंतरराष्ट्रीय उड्डाणं राजधानीच्या शहराऐवजी तुर्कमेनाबाद या ठिकाणी वळवण्यात आली होती. तिथे एक विलगीकरण (क्वारंटाईन) झोनही तयार करण्यात आला होता.
इतकी तयारी असली तरी काही स्थानिकांनी सांगितलं, की ज्या लोकांना दोन आठवड्यांसाठी विलग करण्यात आलं होतं त्यापैकी काहीजण लाच देऊन विलगीकरण झोनच्या बाहेर आले होते.
एलेना पनोवा यांनी सांगितलं, की देशात येणारी प्रत्येक व्यक्ती आणि कोव्हिड-19ची लक्षणं असणाऱ्या सर्वांची चाचणी करण्यात आली. मात्र, आजवर किती जणांच्या कोव्हिड-19 चाचण्या झाल्या आहेत आणि तुर्कमेनिस्तानकडे किती टेस्ट किट्स आहेत, याचं नेमकं उत्तर त्या देऊ शकल्या नाही.
त्या म्हणाल्या, "सरकारी अधिकाऱ्यांशी बोलल्यावर जाणवलं की त्यांनी पुरेशा चाचण्या केल्या आहेत."
आरोग्य व्यवस्थेची स्थिती कशी आहे?
कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी तुर्कमेनिस्थानातील आरोग्य यंत्रणा किती सज्ज आहे?
या प्रश्नावर पनोवा म्हणाल्या, "आम्हाला याबद्दल माहीत नाही. सरकारी यंत्रणांनी अनेक पातळ्यांवर तयारी केल्याचं सांगितलं आहे आणि आमचा त्यावर विश्वास आहे. कारण इथल्य हॉस्पिटलमध्ये सोयीसुविधा चांगल्या आहेत."
"मात्र, संसर्ग वाढला तर इतर देशांप्रमाणे इथेही आरोग्य यंत्रणेवर ताण येईल. त्यामुळे तुम्ही कितीही तयारी केली तरी ती कमीच पडणार. आम्ही आधीच आरोग्य यंत्रणांना व्हेंटिलेटर्स आणि इतर उपकरणांची जुळवाजुळव करण्याविषयीची सल्ला देत आहोत."
कोरोना संसर्गाविषयी लोकांमध्ये बरीच जागरुकता आली आहे. शहरांमध्ये वाहतुकीवर निर्बंध आहेत आणि राजधानी अश्गाबाटमध्ये येणाऱ्यांकडे डॉक्टरांचा रिपोर्ट असणं बंधनकारक आहे.
वनौषधी म्हणून वापर होणाऱ्या एक प्रकारच्या गवताचा जाळ करून त्याद्वारे बाजार आणि कार्यालयांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. या गवताच्या धुराने कोरोना नष्ट होतो, असं तुर्कमेनिस्तानचे अध्यक्ष गुरबांगुली बेरदीमुहामेदोव यांनी म्हटलं आहे. मात्र, याला वैज्ञानिक आधार नाही.
मात्र, इतर राष्ट्रांच्या तुलनेत तुर्कमेनिस्तानातली जनता सामान्य आयुष्य जगत आहे. कॅफे, रेस्टॉरंट खुले आहेत. लग्न सोहळ्यांमध्येही बरीच गर्दी असते. मास्क बांधलेलं कुणी दिसत नाही आणि वेगवेगळे कार्यक्रमही मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत.
हे सगळं बघता तुर्कमेनिस्तानमध्ये कोरोना संसर्गाच्या गांभीर्याकडे पूर्णपणे डोळेझाक केली जात आहे, असंच वाटतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)