You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : इटलीमध्ये मृतांचा आकडा 10 हजारांवर, नेमकं चुकलं कुठे?
कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात चीनमधील वुहान शहरात आढळला होता. त्यानंतर काही आठवड्यातच जगभरात या व्हायरसचा प्रादूर्भाव झाला आहे.
जगभरात सात लाखांहून अधिक लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असून मृतांचा आकडा 33 हजारांहून अधिक झाला आहे. अर्थात, एक लाखांहून अधिक लोक बरेही झाले आहेत.
कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या अमेरिकेत आहे, तर इटलीमध्ये सर्वाधिक रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत.
इटलीमध्ये आतापर्यंत दहा हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव वाढायला लागल्यानंतर इटलीनं अनेक कठोर उपाययोजना केल्या. मात्र तरीही इटलीमध्ये करोनामुळे दररोज सरासरी सहाशे मृत्यू होत आहेत.
- वाचा - कोरोनाचा माझ्या जीवाला किती धोका आहे?
- वाचा -आधी कोव्हिड-19ची किट बनवली, मग बाळाला जन्म दिला
- वाचा-कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा- कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?
अँटोनिया मिलान शहरात राहतात. त्या कारमध्ये बसल्या असताना पोलिसांनी त्यांना हटकलं. त्यांनी कुठलाही नियम मोडलेला नव्हता. पोलीस त्यांच्याकडे आले होते त्यांना सांगण्यासाठी की, अँटोनिया यांच्यासोबत गाडीत बसलेल्या त्यांच्या मैत्रिणीने मास्क लावावा आणि मागच्या सीटवर बसावं एवढंच सांगण्यासाठी तो पोलिस अधिकारी त्यांच्याकडे आला होता.
मिलान शहरातच राहणाऱ्या आणखी एका महिलेनं आम्हाला सांगितलं, की दोन लोक एकाच सीटवर बसू शकत नाहीत, अशी सक्त ताकीदच पोलिसांनी दिली आहे. ही महिला आपल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जात होती.
महिलेचे नातेवाईक रुग्णालयात असले तरी त्यांना कोव्हिड-19 झालेला नाही. आरोग्यविषयक दुसऱ्या समस्येमुळे ते रुग्णालयात आहेत.
इटलीत सध्या लॉकडाऊन असल्याने तुम्हाला घराबाहेर पडायचं असेल तर त्यासाठी काही ठोस आणि योग्य कारण हवं.
लोकांवर अशाप्रकारचे निर्बंध घातल्यानंतरचा हा सहावा आठवडा आहे. तिथली परिस्थिती बघून असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे, की इतर देशांच्या तुलनेत इटलीतच मृतांचा आकडा एवढा जास्त का आहे?
तज्ज्ञांच्या मते यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे इथं ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे. जपानच्या खालोखाल इटलीमध्ये वृद्धांचं प्रमाण सर्वाधिक आहे.
कोरोना व्हायरसबद्दल सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, कोव्हिड-19 हा आजार वयोवृद्ध लोकांमध्ये जास्त लवकर पसरतो. दुसरं कारण निदानासाठी वापरलेली टेस्टिंग पद्धती हे आहे. इटलीमध्ये अजूनही नेमक्या किती लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, हे स्पष्ट होत नाहीये.
आकड्यांची मोडतोड
मिलानमधील एका रुग्णालयात काम करणाऱ्या डॉ मासिमो गॅली यांच्या मते, इटलीत जितक्या लोकांवर चाचण्या झाल्या आणि त्यातून जे आकडे बाहेर आले ते पुरेसे नाहीयेत. संसर्ग झालेल्या लोकांची संख्या त्याहून कितीतरी अधिक आहे.
ज्या लोकांमध्ये संसर्गाची तीव्र लक्षणं आढळली आहेत, त्यांच्याच चाचण्या घेण्यात आल्या आहेत. बाकी लोकांची तपासणी झाली नाही. त्यामुळे मृतांचा आकडा वाढतो आहे.
इटलीतील लॉम्बार्डी प्रांतात कोरोना व्हायरसचा संसर्ग सगळ्यात जास्त झाला आहे. इथं दररोज पाच हजारपेक्षा जास्त चाचण्या केल्या जात आहेत.
''आता जितक्या चाचण्या होत आहेत त्यापेक्षा अधिक चाचण्यांची गरज आहे. कारण चाचणी करणाऱ्या पथकांची वाट पाहत हजारो लोक घरांमध्ये बसले आहेत," असं डॉ. गॅली यांनी सांगितलं.
याशिवाय कोरोना व्हायरसची लागण झालेल्या लोकांवर उपचार करणाऱ्या आरोग्यसेवकांकडे आवश्यक सुरक्षा उपकरणं आणि पोशाख नाहीयेत.
इतर देशांसाठी हा एक मोठा इशारा आहे.
डॉ. मासिमो गॅली यांनी याविषयी बोलताना जे सांगितलं ते महत्त्वाचं आहे. ते म्हणतात,''आमच्या देशात राष्ट्रीय आरोग्यविषयक योजना अस्तित्वात आहे. ती चांगली सुरू आहे. पण कोरोनाच्या उद्रेकात ही व्यवस्थाही कमी पडली आहे."
इटलीच्या रुग्णालयांमध्ये अतिरिक्त खाटांची सोय करण्यात आली. पण औषधांची कमतरता ही सर्वात मोठी समस्या आहे आणि इतर देशांनाही लवकरच या गोष्टी भेडसावणार आहेत.
वृद्धांना सर्वाधिक धोका
इटलीतील आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मृत पावलेल्या लोकांचं सरासरी वय हे 78 वर्षं होतं.
सगळं नकारात्मक चित्र समोर येत असताना एक आशेचा किरणही आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार इटलीमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सेवांच्या आधारे आणि सार्वजनिक आरोग्यसेवेअंतर्गत अनेक वृद्धांचा जीव वाचवणंही प्रशासनाला शक्य झालं आहे.
एकीकडे मृतांचा आकडा वाढत असताना एक बातमी दिलासा देणारीही आहे.
102 वर्षांच्या ग्रोनडोना कोव्हिड-19 आजारातून पूर्ण बऱ्या झाल्या. 20 दिवस रुग्णालयात राहून त्या घरी परतल्या आहेत. उत्तर इटलीच्या जेनेवा शहरात डॉक्टरांनी ग्रोनडोना आणि त्यांच्या भाच्यावर यशस्वी उपचार केले. आता दोघांची प्रकृती बरी आहे.
नागरिकांवर लावलेले निर्बंध जाचक?
काही तज्ज्ञांनी कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी इटलीत लादलेले निर्बंध जाचक असल्याची टीका केली आहे. चीनमधील वुहान शहर हे लॉकडाऊन करण्यात आलेलं पहिलं शहर ठरलं. जानेवारी महिन्यात तिथले व्यवहार ठप्प झाले.
तिथली सर्व विमान उड्डाणं रद्द झाली. रेल्वे बंद झाली. बससेवा थांबली. महामार्ग आणि शहराच्या सीमाही बंद करण्यात आल्या.
इटलीमध्ये विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांवर सरकारने 2 लाख 49 हजार रुपयांचा दंड लादला आहे.
लॉम्बार्डी, जिथं कोरोना व्हायरसचा संसर्ग सर्वाधिक प्रमाणात झाला, तिथे लोकांना घराबाहेर पडायलाही मनाई आहे. पाळीव कुत्र्यांना फिरवायचं असेल तर घराबाहेर दोनशे मीटरपेक्षा जास्त दूर जाण्याची परवानगी नाही.
आता नवीन नियमांनुसार, 15 एप्रिलपर्यंत लोकांना वॉक किंवा जॉगिंगसाठीही घराबाहेर पडता येणार नाही. सायकलिंगही करता येणार नाही. घराबाहेर गवत किंवा लॉन असेल तर तिथे व्यायाम करायला हरकत नाही.
घराबाहेर कुठल्याही गर्दीत सहभागी झालात तर लगेच पाच हजार युरोपर्यंतचा दंड तुम्हाला होऊ शकतो. इटलीच्याच इतर भागात होणाऱ्या दंडापेक्षा ही रक्कम 25 पटींनी जास्त आहे.
कुणाकडे दोन घरं असतील तर त्यांना एकाच घरी रहावं लागेल आणि दुसऱ्या घरी त्यांना जाता येणार नाही.
देशातील सर्व पर्यटन केंद्र बंद करण्यात आली आहेत. यात तिथल्या हॉटेल, फार्म हाऊसचाही समावेश आहे. विद्यापीठांमधील डॉर्मेटरी आणि धार्मिक संस्था चालवत असलेल्या सेवाभावी निवारा केंद्रांना यातून सूट देण्यात आली आहे.
याशिवाय प्रत्येक घरातील फक्त एकाच व्यक्तीला जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दुकानात जाता येईल. खाण्यापिण्याचे पदार्थ देणारे व्हेंडिंग मशिन अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहेत.
इटलीतील उत्पादन केंद्र मग औद्योगिक असोत वा इतर कुठलीही, सध्या बंद आहेत. जीवनावश्यक सेवा पुरवणारे आणि सुपर मार्केटमध्ये काम करणारे लोक यांच्या शरीराचं तापमान दर तासाला तपासलं जात आहे.
सार्वजनिक ठिकाणी लोकांना थांबवून त्यांच्या शरीराचं तापमान बघण्याचे अधिकार पोलिसांना देण्यात आले आहेत.
लॉम्बार्डी प्रमाणेच पीडमाँट प्रांतातही असे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. पीडमाँट हा कोरोना व्हायरसचा सर्वाधिक संसर्ग झालेला तिसरा इटलीतील प्रांत आहे.
इटली आणि स्पेनमध्ये करोनाचा कहर
इटलीत लावलेल्या या निर्बंधांवर काहीजण टीका करतात. पण काहींचं मत अगदी उलट आहे. चीनच्या तुलनेत अजूनही इटलीतील निर्बंध सुसह्य आहेत असं त्यांचं म्हणणं आहे.
युरोपीयन अँड इटालियन सोसायटी फॉर व्हायरॉलॉजीचे माजी प्राध्यापक डॉ. पालू यांच्या मते असे निर्बंध लावण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता.
ते सांगतात, ''आमचे काही संवैधानिक हक्क आमच्यापासून हिरावून घेतले जात आहेत. पण, त्याचबरोबर लोकशाही देशात करता येईल तेवढी चांगली उपाययोजना इटलीमध्ये करण्यात आली आहे.''
इटलीत कोव्हिड-19 आजाराने मरण पावणाऱ्यांचा आकडा अजून कमी होण्याचं नाव घेत नाही. अशावेळी हे निर्बंध लवकर कमी होण्याची शक्यताही नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)