पाकिस्तानमधील मुलींची चिनी पुरुष का 'खरेदी' करत होते?

    • Author, सहर बलोच
    • Role, बीबीसी उर्दू प्रतिनिधी

चिनी नागरिक लग्नासाठी पाकिस्तानमधून मुली खरेदी करत असल्याची बातमी बीबीसीने काही वर्षांपूर्वी दिली होती.

चिनी पुरूष पाकिस्तानातील ख्रिश्चन मुलींशी लग्न करत असल्याची बातमी समोर आली आणि बातमीने सर्वत्र खळबळ माजली होती.

पाकिस्तानी प्रशासन खडबडून जागं झालं आणि याप्रकरणी 50 जणांना अटक केली होती. मात्र, कारवाई होऊनही वर्षभरानंतर हा गैरकारभार सुरूच होता.

प्रकरण काय आहे, हे जाणून घेण्यासाठी जरा मागे जाऊया. गेल्या वर्षी म्हणजे 2019 साली एका शोध मोहिमेत मॅरेज रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. चीनमधले अनेक पुरूष पाकिस्तानातील गरीब ख्रिश्चन मुलींशी लग्न करत असल्याचं कळलं होतं. श्रीमंत कुटुंबात लग्न लावण्याचं आमिष देऊन गरीब घरातल्या मुलींची फसवणूक केली जात होती. या कामी अनेक पादरी, दुभाषिक चीनी पुरुषांची मदत करायचे.

मात्र, यातली बरीचशी लग्न फ्रॉड होती. पाकिस्तानातील पंजाब प्रातातील गरीब ख्रिश्चन मुलींना फसवून लग्नाचं आमिष दाखवून चीनमध्ये घेऊन जात आणि तिथे त्यांना वेश्यावृत्ती करायला भाग पाडलं जायचं.

इतकंच नाही तर या मुलींचे अनेक अवयव विशेषतः गर्भाशय काढून अवयवांच्या आंतरराष्ट्रीय ब्लॅक मार्केटमध्ये विक्री व्हायची, अशी माहितीही पाकिस्तानच्या केंद्रीय तपास यंत्रणेच्या हाती आली होती. ज्या मुली वेश्यावृत्तीसाठी योग्य नाही, असं वाटायचं त्यांचे अवयव काढून ते विकले जायचे.

बीबीसी उर्दूने नुकतीच पुन्हा एकदा या बातमीचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही केलेल्या तपासात आजही पाकिस्तानातली पंजाब आणि खैबर पख्तुनख्वाह प्रांतातील गरीब ख्रिश्चन मुलींना मध्यस्थांमार्फत चीनमधल्या मुलांची स्थळ येत असल्याचं आम्हाला कळलं.

देहव्यापार करणारी एक टोळी अजूनही या भागात सक्रीय आहे. पाकिस्तानातील सीमा भागात असणाऱ्या मरदान, पेशावर आणि चारसद्दा यासारख्या शहरांमध्ये अशी लग्न लावून दिली जात आहेत.

या लग्नांमध्ये बहुतेकवेळा एखादा पादरी, नातेवाईक किंवा कुटुंबाचा मित्र मध्यस्थाची भूमिका बजावतो. हा मध्यस्थ मुलीच्या कुटुंबीयांशी चर्चा करून लग्नाची तारीख ठरवतो. त्यानंतर या मुलींना गुप्तपणे इस्लामाबादला नेऊन तिथे छुप्या पद्धतीने लग्न लावून दिलं जातं.

2018 पासून अशी जेवढी लग्नं झाली त्यातल्या बहुतांश सर्वच प्रकरणांमध्ये एक बाब सारखी होती आणि ती म्हणजे आपल्या मुलींची लग्नं लावून देणारी सर्व कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गुजराण करत होती.

या लग्नामुळे आपल्या मुलीला आर्थिक स्वातंत्र्य मिळेल. म्हणूनच आपण आपल्या मुलीचं चीनमधल्या मुलाशी लग्न लावून दिल्याचं सर्वांचं म्हणणं होतं. पाकिस्तानातील अंतर्गत विषयांचे मंत्री एजाज शहा यांनी सांगितलं, "अशा लग्नांपैकी एक टक्का लग्न कायदेशीर असेलही. मात्र, बहुतांश प्रकरणांमध्ये शोषण करण्यासाठीच लग्न करण्यात आली आहेत."

वीटभट्टी मजूर

पाकिस्तानातील मध्य पंजाब प्रांतातील शेखीपुरा शहरातून लाहोरला जाण्यासाठीच्या रस्त्यावर शेखीपुरा शहराबाहेर गिरजा कॉलोनी नावाचा भाग आहे. या भागात अनेक ख्रिश्चन कुटुंबं राहतात. मुस्लीम आणि ख्रिश्चन लोक या भागातील मुख्य गल्लीत समोरा-समोर राहतात. गल्लीत भाज्या आणि किराणा मालाची अनेक दुकानं आहेत.

या कॉलोनीत पंजाबमधली बहुतांश वीटभट्टी कामगार राहतात. देहव्यापार करणाऱ्या टोळीने या मजुरांपैकी अनेक कुटुंबांना तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न चीनमधल्या मुलाशी लावून दिलं तर तुम्ही आज ज्या वीटभट्टीवर काम करता, उद्या त्या वीटभट्टीचे मालक व्हाल, असं सांगून फसवणूक केली होती.

याच कॉलोनीमध्ये समीरन आपल्या कुटुंबासोबत राहते. जवळच्याच पाण्याच्या बाटल्या बनवणाऱ्या कारख्यान्यात ती आपल्या पतीसोबत कामाला जाते. त्यांना महिन्याला 35 हजार रुपये पगार मिळतो.

नुकतच एका पादरीने या जोडप्याशी संपर्क केला होता. आपल्याकडे चीनचं एक उत्तम स्थळ असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

मी या जोडप्याच्या घरी पोहोचले तेव्हा एका मुलाने दार उघडलं. आपल्या आई-वडिलांना यायला उशीर असल्याचं त्याने सांगितलं. ते येईपर्यंत वाट बघा, असं सांगितल्यावर आम्ही तिथेच थांबलो.

घरातली मुलं बुजरी होती. आम्ही त्यांच्याशी गप्पा करत असताना त्यांनी त्यांच्या थोरल्या बहिणीशी लग्न करण्यासाठी कोण त्यांच्या घरी आले होते, हे सांगितलं.

समीरनचे पती सांगत होते, "मी खोटं बोलणार नाही. सुरुवातीला आम्ही दोघंही खूप उत्साहित होतो." समीरनला सात अपत्य आहेत. पादरीने त्यांच्यापैकी दोन मोठ्या बहिणी 21 वर्षांची उरफा आणि 19 वर्षांची सफिरासाठी स्थळ आणलं होतं.

समीरनने सांगितलं, "पादरीने आम्हाला त्या मुलांचे फोटो दाखवले. ते 20-25 वर्षांचे असतील. पादरी म्हणाल्या या मुलांना गलेलठ्ठ पगार आहे आणि ते आमच्या मुलींना सुखात ठेवतील."

समीरनने पुढे सांगितलं, "त्या पादरी आम्हाला म्हणाल्या की आमच्या मुली सुखात असल्याचं बघून इतरही लोक त्यांच्या मुलींची लग्न चीनी मुलांशी लावून देतील." मात्र, कुटुंबाने हा प्रस्ताव धुडकावला.

पुढे काही बोलायच्या आधी समीरन आणि त्यांच्या पतीने एकमेकांच्या डोळ्यात बघितलं. मग समीरन पुढे सांगू लागल्या. त्या म्हणाल्या की त्यांनी कराचीत राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबाच्या इतर सदस्यांशी या प्रस्तावाविषयी चर्चा केली.

समीरन यांनी सांगितलं, "आमच्या वडीलधाऱ्यांनी आणि भावंडांनी आम्हाला धमकी दिली, की आम्ही आमच्या मुलींची लग्न चीनमध्ये लावून दिली, तर ते आमच्याशी नातं तोडतील. त्यामुळे आम्हाला नकार द्यावाच लागला." सध्या समीरनचं कुटुंब आणि त्या पादरीमध्ये अबोला आहे.

समीरन सांगतात, "त्या पादरीचं म्हणणं आहे की आमच्यामुळे त्यांचं जे नुकसान झालं आहे, त्याची भरपाई म्हणून आम्ही त्यांना 15 लाख रुपये द्यावे. त्यांनी आमच्या मुलींचं राष्ट्रीय प्रमाणपत्र तयार करण्यासाठी पैसे दिले होते. त्यांचे पासपोर्ट बनवले होते आणि व्हिसासाठी अर्जही केले होते. मात्र, आमच्या मुलींची कागदपत्रं अजूनही त्यांच्याकडेच आहेत. आम्ही नुकसान भरपाई देत नाही तोवर कागदपत्र देणार नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे."

'परमेश्वरानेच पादरी बनवलं'

समीरन यांच्या घरापासून जवळच पादरी गोलनाज यांचं घर आहे. त्यांना भेटण्याआधी मी त्यांना फोन केला होता. त्यांचं दार ठोठावताच त्यांनी इतक्या घाईत दार उघडलं जणू त्या माझीच वाट बघत होत्या.

त्या मला एका छोट्या खोलीत घेऊन गेल्या. तिथे तीन जण आधीच होते. मला त्यांच्या अगदी समोर बसायला सांगण्यात आलं. मी बसताच गोलनाज एकही शब्द न बोलता मला कागदपत्रांचं ढिग देतात.

ती जवळपास 12 प्रमाणपत्रं होती. लाहोर आणि शेखपुराच्या चर्चने ही प्रमाणपत्रं दिली होती. यातलं एक प्रमाणपत्र त्यांना अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील ऑस्टीन शहरातील पादरीने त्यांना बहाल केलं होतं.

मी ती सर्व प्रमाणपत्रं तपासली आहेत, याची खात्री पटल्यावरच गोलनाज यांनी बोलायला सुरुवात केली. त्यांचं वय तीशीच्या आसपास असावं. गोलनाज म्हणाल्या, "मी इथे माझ्या समाजाच्या लोकांसाठी काम करते. आणि मला तर स्वतः परमेश्वराने पादरीची दीक्षा दिली आहे. जेणेकरून मला या लोकांची मदत करता यावी."

यानंतर गोलनाज यांनी मला त्यांची बहीण समीनाचे फोटो दाखवले. समीना सध्या चीनच्या सांक्शीमध्ये असते. गोलनाज मला समीनाच्या सहा महिन्याच्या मुलीच्या बारशाचे फोटो दाखवत म्हणाल्या, "बघा, ते सर्व तिथे किती आनंदात आहेत."

"मला वाटतं लोक जेव्हा बघतील की ती तिथे किती आनंदात आहेत तेव्हा त्यांनाही चीनमध्ये लग्न करण्याची इच्छा होईल. त्यांनी असंच करावं, असं मला तरी वाटतं. मात्र, त्यासाठी कुणी त्यांच्यावर दबाव टाकत नाही."

मात्र, आम्ही गोलनाज यांना सराफीन यांच्या कुटुंबाविषयी विचारलं, की तुम्ही तर त्यांना 15 दिवसात मुलीचं लग्न लावून द्या म्हणून दबाव टाकला होता. तेव्हा गोलनाजने याचा इनकार केला.

पाकिस्तानात लग्नात येणाऱ्या अडचणी

पाकिस्तान प्रशासन अनेक अशा प्रकरणांचा तपास करत आहेत, जी केंद्रीय तपास यंत्रणा आणि जमिनीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मते उघड उघड वेश्यावृत्तीशीसंबंधित आहे.

गेल्यावर्षी बीबीसीच्या तपासात आढळलं होतं, की लग्नाचं आमिष दाखवून पाकिस्तानातील 700 मुलींना चीनमध्ये नेण्यात आलं आहे.

त्यावेळी केंद्रीय तपास यंत्रणेचे (FIA) तत्कालीन अधिकारी जमील खान मेयो यांनी बीबीसीला सांगितलं होतं की, "ज्या मुली वेश्या व्यवसायासाठी पात्र नव्हत्या त्यांचे अवयव आंतरराष्ट्रीय ब्लॅक रॅकेटमध्ये विकण्यात आले." सर्वाधिक मागणी गर्भाशयाला असल्याचंही जमील खान यांनी सांगितलं होतं.

त्यानंतर अशी अनेक प्रकरणं उघड झाली आहेत. पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील लाहोर, फैसलाबाद, कसूर, शेखुपुरा आणि गुजरावाला यासारख्या प्रमुख शहरांमध्ये या घटना घडल्या आहेत.

यातली अनेक प्रकरणं सारखीच आहेत. एखाद्या गरीब पाकिस्तानी ख्रिश्चन मुलीसाठी चीनच्या मुलाचं स्थळ सुचवलं जातं. दुभाषिकाच्या माध्यमातून त्यांची भेट घडवली जाते. वरपक्ष लग्नासाठी किंवा मुलीच्या कुटुंबीयांवर असलेलं कर्ज फेडण्यासाठी 10 ते 50 लाखांपर्यंत पैसे देण्याची तयारी दाखवतात.

जवळपास सर्वच मुलींना इस्लामाबादमधल्या एका घरात नेलं जातं. इथे त्यांना एका ओरिएंटेशन कार्यक्रमात सहभागी व्हावं लागतं. इथे त्यांना चीनी भाषेची शिकवणी दिली जाते. मुलींची देखभाल करण्यासाठी आणखी एक कर्मचारी तिथे असतो. हा कर्मचारी मुलींनी शिस्तीत रहावं, यासाठी अत्यंत शिवराळ भाषा वापरत असल्याचं सोफिया नावाच्या तरुणीने आम्हाला सांगितलं.

ही प्रकरणं पाकिस्तानी प्रसार माध्यमांपर्यंत पोचताच स्थानिक प्रशासन जागं झालं. जमील खान मेयो आणि FIA च्या अधिकाऱ्यांनी लोकांना या प्रकरणांची माहिती मिळावी, यासाठी मे 2019 पर्यंत अनेक पत्रकार परिषदा घेतल्या होत्या.

लाहोरमध्ये घेण्यात आलेल्या अशाच एका पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं होतं की चीनी पुरुषांची एक टोळी ज्यात एक महिला आणि पाकिस्तानी दुभाषीही आहे, पंजाबमध्ये अशी लग्न लावण्यासाठी फिरत आहेत. यानंतर संपूर्ण पंजाब प्रांतातून जवळपास 50 चीनी पुरूष आणि त्यांना मदत करणाऱ्यांना अटक करण्यात आली होती.

मसिहा, मेहद लियाकत आणि मुकद्दस या तरुणींची या टोळीच्या तावडीतून मुक्तता करत त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आलं होतं. या तरुणी फैसलाबाद आणि गुजरांवाला शहरातल्या होत्या.

लाहोरमधले मुहम्मदी इस्लामिक सेंटर, पाक-चायना मॅरेज कन्स्लटंसी आणि झोंगबा मॅरेज ब्युरो ही तीन मॅरेज ब्युरो बंद करून त्यांच्या संचालकांना अटक करण्यात आली होती. तसंच लाहोरमधून 11 चीनी नागरिक आणि त्यांच्या 2 पाकिस्तानी हस्तकांना अटक करण्यात आली होती.

मात्र, नुकतंच FIAच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारलं तेव्हा यापैकी केवळ एकच चीनी नागरिक आपल्या ताब्यात असल्याचं त्यांनी सांगितलं. पुराव्यांअभावी उर्वरित चीनी सोडण्यात आल्याचं आणि त्यांना त्यांच्या देशात परत जाण्याची परवानगी देण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

त्यांचं म्हणणं होतं, "त्यांना अटक करून खटला न्यायालयात उभं करणं, एवढंच आम्ही करू शकत होतो. आम्ही न्याय मिळवून देऊ शकत नाही. आणि या लोकांना कायमचं तुरुंगात कैद तर ठेवू शकत नाही."

अशाप्रकारचे अवैध लग्नं अजूनही सुरू आहेत. मात्र, आता कामाची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. हे सगळं प्रकरण आता अत्यंत गुप्त ठेवलं जातं. मुलीच्या कुटुंबीयांचा होकार मिळत नाही, तोवर चीनी मुलं त्या कुटुंबाला भेटायला जात नाही.

नुकतंच वायव्य पाकिस्तानातील खैबर पखतुनख्वाह प्रांतातल्या पेशावर आणि मरदान या दोन शहरातून अशी दोन लग्नं लावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

पेशावरमध्ये राहणारे पादरी आणि मुलींच्या कुटुंबीयांशी बातचीत केल्यावर कळलं की, आता अशी लग्नं ती कुटुंबं लावून देतात ज्यांच्या मुलींनी चीनमधल्या मुलांशी विवाह केला आहे.

आता होकार देणाऱ्या कुटुंबीयांना पंजाब किंवा खैबर पख्तुनख्वाहहून इस्लामाबादला आणलं जातं आणि अगदी जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पडतो.

दोन मुलींचा मृत्यू

समिया डेव्हिड आणि एबिगेल या दोन तरुणींचा मृत्यू महिनाभरातच झाला होता. समिया डेव्हिड गुजरांवालाची राहणारी होती. तर एबिगेल पेशावरच्या फादर्स कॉलोनीत राहायची.

या दोन्ही तरुणींची पाकिस्तान सोडून जाण्याची आणि त्यानंतर मृत्यूची कहाणीही सारखीच आहे. एबिगेलचा वीस वर्षांचा भाऊ ताबिश सांगतो की, त्याच्या बहिणीचं वय 18 वर्षं होतं. तिला अधेमधे फीट यायची.

आपल्या सर्वात मोठ्या बहिणीचं लग्नही एका चीनी व्यक्तीशी झाल्याचं ताबिश सांगतो. ती सुखात असल्याच बघूनच लहान बहिणीचं लग्नही एका चीनी व्यक्तीशी करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतल्याचं त्याचं म्हणणं आहे.

आपल्या कुटुंबाविषयी सांगताना ताबिश सांगतो, "माझे वडील सतत आजारी असतात आणि आई गृहिणी आहे. आम्ही भावंडं एकमेकांची काळजी घेतच मोठे झालो. एबिगेल आमच्यासोबत राहायची तेव्हा तिला फार फीट यायची नाही. मात्र, चीनमध्ये गेल्यावर तिला बरेचदा फीट यायची."

नोव्हेंबर 2018 मध्ये तिचं लग्न झालं आणि ती लगेच चीनला गेली.

चीनला गेल्यावर पाच महिन्यातच ती पाकिस्तानात परतण्याचा हट्ट करू लागली. मग तिला तिच्या नवऱ्यासोबत पाकिस्तानात बोलवण्यात आलं. पाकिस्तानात आल्यावर ती पतीसोबत इस्लामाबदमधल्या E-11 सेक्टरमधल्या एका अपार्टमेंटमध्ये राहायची.

मात्र, जून 2019 मध्ये गोलरा शरीफ पोलीस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्याला माहिती मिळाली की एका तरुणीने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की घटनेच्या दोन आठवड्यांपर्यंत तपास सुरू होता. तरुणीच्या गळ्यावर आणि मनगटावर खुणा होत्या.

एबिगेलचा मित्र आणि तिच्या एका चीनी मित्राला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात थांबवून ठेवण्यात आलं. पण आठवडाभरानंतर तपास थंडावला.

पेशावरच्या सेंट जेम्स चर्चशी संबंधित रेव्हरंड एलेक्झँडर यांना कन्फेशन घेण्यासाठी चर्चमध्ये बोलवलं जातं. लग्नाआधी होणारी प्रार्थना सभा त्यांच्याच नेतृत्वाखाली भरते.

रेव्हरंड अॅलेक्झँडर म्हणतात, "मला एबिगेलच्या लग्नात बोलवण्यात आलं नाही आणि प्रार्थना सभेतही बोलवलं नाही. अत्यंत गुप्तपणे लग्न लावण्यात आलं. त्यामुळे असं वाटलं जणू हे लग्न बळजबरीने लावण्यात आलं."

लाहोरचे सामाजिक कार्यकर्ते सलीम इकबाल या बेकायदेशीर कृत्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या सुरुवातीच्या लोकांपैकी आहेत. ते सांगतात, "एबिगेलच्या मृत्यूनंतर तिच्या लहान बहिणीने त्यांना पत्र लिहून या सगळ्या प्रकरणाचा छडा लावण्याची विनंती केली. मात्र, ताबिशने तुम्ही आमच्या खाजगी बाबींमध्ये लक्ष देऊ नका, अशी धमकी दिली."

यानंतर काही दिवसांनीच एबिगेलच्या वडिलांनी पोलिसांना एक लांबलचक पत्र लिहिलं. त्यात त्यांनी पोलिसांकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले होते आणि आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी सैतान आणि काळी विद्या जबाबदार असल्याच म्हटलं होतं.

पंजाब प्रांताच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या गुजरांवाला शहरात राहणारी सामिया डेव्हिडने सुखी भविष्याची स्वप्न बघत चीनी मुलाशी लग्न केलं. तिचंही लग्न 2018 च्या शेवटीशेवटी झालं आणि मे 2019 मध्ये ती पाकिस्तानात परतली आणि आठवडाभरातच तिचाही मृत्यू झाला. मात्र, तिच्या कुटुंबाने विशेषतः तिच्या आईने आणि भावाने हे सगळं प्रकरण दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

इस्लामिक आणि ख्रिश्चन प्रथेप्रमाणे मृत्यूनंतर दफन करण्याआधी पार्थिवाची आंघोळ घातली जाते. मात्र, सामियाच्या आईने तिच्या पार्थिवाची आंघोळ घालण्यासाठी आपल्या एका जवळच्या मैत्रिणीला बोलावलं. त्या मैत्रिणीने सांगितलं की सामियाच्या शरीराच्या खालच्या भागावर आणि पोटावर जखमा होत्या.

याच दरम्यान बीबीसीने सामियाचा भाऊ साबिर मसीह याच्याशी बातचीत केली. तो म्हणाला, "लोक सामियावर जळायचे. विशेषतः ज्या प्रकारचं आयुष्य ती जगत होती ते बघून. मात्र, आता तिने या जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे जग सोडून गेलेल्यांऐवजी आपण जिवंत व्यक्तींना महत्त्व दिलं पाहिजे."

चीनमध्ये होणाऱ्या विवाहांविषयी बोलण्यावर बंदी

या लग्नांची बातमी प्रसार माध्यमांमध्ये आल्यावर FIA ने जून 2019मध्ये यासंबंधीचा सविस्तर अहवाल पाकिस्तान सरकारला सादर केला. या अहवालानुसार, पाकिस्तानातील एकूण 629 मुलींची तस्करी करून त्यांना चीनमध्ये नेण्यात आलं आहे.

ऑगस्ट 2019 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या एका परिषदेत सहभागी झालेल्या FIAच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, "2018 पासून पाकिस्तानातील जवळपास 20 हजार तरुणींची तस्करी करण्यात आली आहे." मात्र, यापेक्षा अधिक माहिती त्यांना द्यायची नाही. सामाजिक कार्यकर्त सलीम इकबाल म्हणतात की सरकारच्या वरिष्ठ पातळीवरच अशी प्रकरणं दाबण्याचा प्रयत्न होतो.

चीनी पुरूष आणि पाकिस्तानी स्त्रीचं लग्न

एप्रिल 2019 मध्ये लाहोरमधल्या 8 तरुणींनी शहरातल्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी नोंदवल्या होत्या. या एफआयआरची भाषा जवळपास सारखी होती आणि आरोपीही जवळपास सारखेच होते.

या मुलींनी आपल्या पालकांवर, नातेवाईकांवर आणि धर्मगुरूंवर केवळ पैशांसाठी बळजबरीने लग्न लावून दिल्याचा आरोप केला होता. चीनी पुरुषांच्या लग्नाच्या बातम्या आल्या तेव्हा अशा FIRची संख्या 13 झाली. मात्र, या सर्व तक्रारी पंजाबमधल्या केवळ एका शहरातल्या होत्या. मात्र, काही दिवसांनी पंजाब प्रांतातल्या इतर शहरांमधूनही पोलीस ठाण्यांमध्येही अशा तक्रारी येऊ लागल्या. यातल्या तिघींशी बीबीसीने बातचीत केली.

आशियातील इतर पाच राष्ट्रांप्रमाणेच पाकिस्तानातही लग्न होत असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था असलेल्या 'ह्युमन राईट वॉच'ने पाकिस्तानला दिला होता. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरैशी यांनी सांगितलं की या प्रकरणाच्या चौकशीसाठी चीन पाकिस्तानला सर्वतोपरी सहकार्य करत आहे.

कुरैशी म्हणाले, "प्रत्येक समाजात सर्व प्रकारचे लोक असतात. चीनने व्हिसावरही काही काळ बंदी घातली होती. आणि त्या लोकांवर अजूनही देखरेख ठेवली जात आहे. चीनसोबत आमचे संबंध असे आहेत की आम्ही एकमेकांना समजून घेतो, बातचीत करतो आणि सहकार्यही करतो. त्यांच्या सहकार्याचाच परिणाम आहे की हे प्रकरण आता मागे पडलं आहे."

पाकिस्तानच्या अंतर्गत विषयाच्या मंत्रालयाने FIAचा तोच अहवाल संसदेत सादर केला होता ज्यात या प्रकरणी 50 चीनी नागरिकांना अटक केल्याचं म्हटलं होतं आणि आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्याचंही सांगण्यात आलं. मात्र, हे तेच लोक होते, ज्यांना पुढे पुराव्यांअभावी पाकिस्तानच्या न्यायलयाने सोडून दिलं होतं.

याविषयी आम्ही पाकिस्तानचे अंतर्गत विषयाचे मंत्री एजाज शाह यांना विचारल्यावर, "याप्रकरणात चीन सहकार्य करत असल्याचं" त्यांनी सांगितलं.

एजाज शाह म्हणाले, "आम्ही या प्रकरणांची ओळख पटवली आहे आणि चीनच्या अधिकाऱ्यांनाही माहिती दिली आहे." ते पुढे म्हणाले, "हा अवैध कारभार पाकिस्तानी सरकारच्या इशाऱ्यांवर सुरू नाही आणि चीनी अधिकारीही याचं समर्थन करत नाही."

तसंच पुराव्यांअभावी मुक्तता करण्यात आलेल्या चीनी आरोपींविषय़ी ते म्हणाले, "अंतर्गतविषयाचा मंत्री म्हणून मी कुणाला अटक करतो तिथे माझं काम संपतं. आता त्यांना शिक्षा करायची की सोडून द्यायचं हे काम न्यायालयाचं आहे. त्यांना कसंकाय सोडलं, हे बघणं आमचं काम नाही."

गेल्यावर्षी चीनमधून सुटका करून आणलेल्या नताशा मसिहला तिच्यासोबत काय झालं, याबद्दल विचारलं. तेव्हा उत्तरादाखल तिने उलट प्रश्न विचारला की आता याविषयी का बोलायचं? मात्र, फोन कट करण्याआधी नताशा म्हणाली, "भर न्यायालयात मला अपमानित करण्यात आलं. मी देशाची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला. तर आता याविषयावर बोलून मला काय मिळेल?"

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)