You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'ये कम्बख्त सारे मिले हुए है'वाले पाकिस्तानी 'चिचा' मला भेटतात तेव्हा...
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी, कतार विमानतळाहून
'ये बिक गयी हैं गोरमिंट'वाली आंटी आठवतेय? त्या टाईपचा 'चिचा' भेटला होता मला. 'कम्बख्त सारे मिले हुए हैं. मै बताता हूँ.'
"चार लोक त्यांनी इकडे ठेवलेत आणि चार ह्यांनी तिकडे. जिथे कुठे निवडणुका लागतील तिथले लोक कामाला लागतात. मरतात ती आपल्यासारखी गरीब माणसं."
कतार एअरपोर्टला पुढच्या फ्लाईटची वाट पाहत होते. हे चाचा सहकुटुंब आलेले. मुलगा, सून, अजून एक जण सोबत होता. बहुतेक पुतण्या असावा. एकमेकांशी जे बोलत होते ते सगळं कळत होतं, साहजिकच प्रश्न विचारला इंडियन हो ?
उत्तर आलं - नहीं, पाकिस्तानी.
ऑकवर्ड ! दोघे एकमेकांकडे बघून कसनुसं हसलो. पण भाषा एकमेकांना बांधून ठेवणार मोठा फोर्स आहे.
आपण जे बोलतोय ते दुसऱ्याला समजतंय म्हटल्यावर कोणी बोलल्याशिवाय राहत नाही. बोलता-बोलता राजकारणाच्या गप्पा सुरू झाल्या आणि ते चाचा बोलू लागले.
"इतने दिनो से चिल्लाते आये हो, देखो इन्होने ये किया, उन्होने वो किया, में पूछता हू तुमने क्या किया? वो करेंगे अपनी किस्मत से, खायेंगे अपनी किस्मत का, तुम अपनी जिम्मेदारी निभावो."
"ज्यांच्या नळाला पाणी नाही, तिथे निवडणुका लढताना तुम्ही शेजारच्या देशाची भीती घालता," असं म्हणणारे आपल्याकडचे आजोबा असतात त्यांचंच हे पाकिस्तानी व्हर्जन वाटलं मला.
दिल्ली पेटायच्या आधीची गोष्ट आहे ही. त्यांनी विचारलं, "ये क्या हो रहा है, आपके देश में. बहोत कुछ सुनने में आ रहा है. टीव्हीपर देख रहे है."
नाही म्हटलं तरी भारतीय जागी झालीच मनातली. 'ओ, तुम्ही तुमचं बघा' हे उत्तर पोलाइटली कसं द्यावं असा विचार करत होते, तेवढ्यात ते म्हणाले.
"भारताचं असं चित्र पाहायची आम्हाला सवय नाही. आमच्याकडे वाटोळं झालंच होतं. जो येतो तो हुकूमशाह बनायला पाहतो, एकाला काय फाशी दिली, एकाला गोळ्या घालून मारलं, एक देश सोडून परागंदा झाला. तुमची एक राजकीय संस्कृती आहे. राजकारण करण्याचीही रीत आहे. सूडचक्र तुमची स्टाईल नाही आणि ती बनू देऊ नका," कोरडा उपदेश नव्हता हा.
एखादं माणूस स्वतः तावून सुलाखून निघाल्यानंतर दुसऱ्याला सांगतो ना, बाबा रे, असा करू नको लय वंगाळ आहे त्या वाटेला. तेव्हा त्या माणसाच्या नीयतवर शंका कशी घ्यावी?
"तुमची लोकसंख्या कितीये?" चाचांनी गियर बदलला. "1 अब्ज 30 कोटी," मी उत्तर दिलं.
चाचांची गाडी कोणत्या दिशेला वळली होती काही कळत नव्हतं. "उसमे मिला दो हमारी 22 करोड. एक झालो तर कोणाची हिम्मत नसती झाली डोळे वर करून बघायची. अगर थूक भी दे तो सैलाब आये. पर हमारी हालत देखो. पोटासाठी बोचकी पाठीला बांधून दारोदार फिरतोय," चाचांच्या आवाजात विषण्णता होती.
"कतारच्या इमारती बघून लोक खुश होतात, कोणी बांधल्या या? कोणी उभी केली दुबई, अबुधाबी, लंडन? आपल्या मजुरांनी. मग हे आपल्या देशात नसतं का उभं करता आलं. "सियासत करते रहे, लोगो को लडवाते रहे और लाखों लोग पेट के पीछे अपना मुल्क छोड चले."
चाचा मोझाम्बिकला राहतात. कुटुंबकबिला पाकिस्तानात कराचीला असतो. कराची कसंय विचारल्यावर असा चेहरा केला, डिट्टो दिल्ली कशीये विचारल्यावर मी करते.
"इतना पोल्युशन, धूल, क्या बतायें. ट्राफिक तो जान खाले बस. शेहेरे ना हुई, जहन्नम हो गया. अभी बेटे और बहू को ले जा रहे हैं. हमारी शादी देरी से हुई थी. तो इनकी जल्दी कर दी."
चाचांची सून म्हणजे सुबक ठेंगणी अवतार होता. ब्लॅक जीन्स, ब्लू टॉप आणि त्याला मॅचिंग हिजाब. पहाटे 3 वाजता कराचीहून निघाले म्हणून तिच्या डोळ्यात झोप मावत नव्हती. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण बयोचं सगळं लक्ष सेल्फीमध्ये.
चाचा आधी धान्याचा व्यवसाय करायचे, म्हणजे मोझाम्बिकहुन धान्य आणून पाकिस्तान आणि भारतात विकायचं. आता मोबाईलचा बिझनेस करतात. "वहाँ तो दिनेश भी बैठता हैं, सलीम भी, प्रभाकर भी और हुसैन भी. साथ मैं बैठकर कहते है, एक दूसरे का साथ देते है. पर अपने देश जाके कुछ नहीं बोल पाते. फिर लोग कहेंगे क्या गद्दारो जैसी बाते करता हैं."
तीच तीच वाक्य परत कानावर पडतात. विरोधाच्या आवाजाला कुठे देशद्रोही म्हणतात, कुठे गद्दार. निघताना म्हणाले, "तुम्हारे अब्बू के जैसा हू, अगर कुछ गलत कह दिया तो माफ करना. दिल्ली को मेरा सलाम बोलना. आधी यायचो अनेकदा. खूप मित्र होते, पण गेल्या 30 वर्षात येणं झालं नाही."
"पार्टीशन हुआ तो पछतावा भी हुआ. पर हमारे बच्चोंपर इसका बोझ क्यों? जब पार्टीशन हुआ, तो मैं खुद पैदा नहीं हुआ था. अब बच्चों का सोचना है, दोनों मुल्को के लोगों को. कितने साल यह हिंदुस्तान - पाकिस्तान का खेल खेलते रहेंगे?"
मी म्हटलं, मलाही यायचंय हो एकदा पाकिस्तानला. "करतापूर के रस्ते से आना." म्हटलं, "अहो ते पुढे येऊ देणार नाहीत ना पण." तर म्हणे, "का बरं, येऊ देणार नाहीत. कुठे जायचंय तुला?" मी म्हणाले, मला लाहोरला जायचंय. तर म्हणतात, "काहीच प्रश्न नाही, सरळ सांग मला लाहोरने जायचं आहे." मला वाटलं आता म्हणतात, "माझं नाव सांग त्यांना. म्हणा सुलेमान चिचाकडे चालले." पण असं काही म्हणाले नाहीत.
"आना जरूर. तुम्हे बहोत पसंद आयेगा. आलीस आणि एरपोर्टला उतरलीस, की मला फोन कर." पुतण्याला हाक मारून म्हणे, बिलाल नंबर दे अपना. हा तुला घ्यायला येईल. काय खायला प्यायला लागेल सांगून ठेव. काही काळजी करू नकोस. चला निघूयात."
बिलालचा नंबर अजूनही माझ्याकडे सेव्ह आहे. एक दिवस मी खरंच कराची एअरपोर्टला उतरेन, बिलाल मला घ्यायला येईल आणि घरी जाऊन बटाट्याची भाजी पोळी खायला घालेल, असं उगाच माझं दिवास्वप्न आहे. अजून स्वप्नांवर बंदी आलेली नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)