दिल्ली दंगल : 'त्या' मशिदीच्या मिनारावर कोणी लावला झेंडा? ग्राऊंड रिपोर्ट

    • Author, फैसल मोहम्मद अली
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

दिल्लीच्या अशोक नगरात पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या मशिदीसमोर भरपूर लोकांची गर्दी जमा आहे. या मशिदीचा पुढचा भाग जाळण्यात आलाय.

अशोक नगराच्या पाचव्या गल्लीच्या जवळच्या 'बडी मस्जिद'च्या बाहेर असणाऱ्या तरुणांशी बोलण्याचा प्रयत्न बुधवारी सकाळी बीबीसीने केला.

त्यांच्या प्रतिक्रियांमधून त्यांचा आक्रोश उमटत होता.

आम्ही त्यांच्या मागून मशिदीत गेलो. आतमध्ये जमिनीवरचा गालिचा अर्धवट जळलेला होता. टोप्या इतस्ततः विखुरलेल्या होत्या. याच गालिचावर इमाम उभे होते. ती जागा आता काळी पडली होती.

ही तीच मशीद आहे जिच्यावर हल्ला करणाऱ्या लोकांमधल्या काहींनी मिनारवर तिरंगा आणि भगवा झेंडा फडकवल्याच्या बातम्या मंगळवारी आल्या होत्या.

याचा व्हीडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण अशोक नगरात अशी कोणतीही घटना घडलीच नसल्याचं विधान दिल्ली पोलिसांनी नंतर केलं.

पण आम्ही इथे पोहोचलो तेव्हाही मशिदीच्या मिनारवर तिरंगा आणि भगवा झेंडा लावलेला होता.

मंगळवारी या परिसरात घुसलेल्या जमावाने हे सगळं केल्याचं मशिदीबाहेर गोळा झालेल्या लोकांनी सांगितलं.

'बाहेरून लोक आले'

या मशिदीच्या इमामांना पोलसांनी रात्री नेल्याचा दावा मशिदीच्या आत असणाऱ्या आबिद सिद्दीकी नावाच्या व्यक्तीने केला. पण याबाबत ठोसपणे सांगता येणार नाही. मशिदीच्या इमामांशी बोलणं होऊ शकलं नाही.

आम्ही इथे पोहोचलो तेव्हा जवळच पोलिसांची एक गाडी उभी होती. थोड्यावेळाने ही गाडी इथून निघून गेली.

मशिदीची नासधूस करण्यात आल्याने दुखावलेले रियाज सिद्दीकी नावाचे गृहस्थ म्हणाले, "लोकांना अखेर असं करून काय मिळतं?"

आम्ही या भागातल्या हिंदुंशीही बोललो. ही मशीद इथे अनेक वर्षांपासून असल्याचं या लोकांचं म्हणणं होतं. या मशिदीची नासधूस करणारे लोक बाहेरून आले होते, असं या स्थानिकांचं म्हणणं आहे.

बाहेरून आलेल्या लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला असतो तर आपण कदाचित ठार मारले गेलो असतो असं स्थानिक हिंदूंचं म्हणणं होतं.

(या घटनेचं गांभीर्य आणि संवदेनशील वातावरण लक्षात घेता ज्यामुळे भावना भडकू शकतील अशी काही दृश्यं आणि त्यावेळी उपस्थित लोकांची वक्तव्यं काढून टाकण्यात आली आहेत. बीबीसीच्या संपादकीय धोरणांनुसार हे करण्यात आलेलं आहे.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)