You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रतनलाल: दिल्ली हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या पोलिसाच्या कुटुंबाचं आता काय होणार?
- Author, भूमिका राय
- Role, बीबीसी प्रतिनिधी, दिल्ली
तारीख - 24 फेब्रुवारी 2020, दिवस - सोमवार
दिल्ली पोलिसात हेड कॉन्स्टेबल असणारे रतनलाल यांच्यासाठी नेहमीसारखाच दिवस होता. गेली अनेक वर्ष ते सोमवारी उपवास करायचे. सकाळी बरोबर 11 वाजता ते ऑफिसमध्ये म्हणजे गोकुलपुरी एसीपी ऑफिसमध्ये जाण्यासाठी रवाना झाले.
बरोबर 24 तासांनंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता बीबीसीचे आम्ही त्यांच्या घरी आहोत. काही तासातच या घरातलं वातावरण बदलून गेलं आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याचे विरोधक आणि समर्थक यांच्यात झालेल्या हिंसाचाराने रतनलाल यांचा बळी घेतला.
ईशान्य दिल्लीतल्या चांद बाग, भजनपुरा, बृजपुरी, गोकुलपुरी आणि जाफराबाद या भागांमध्ये उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत रतनलाल यांच्यासह सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर 90हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
पत्नीला कधी दिली बातमी?
रतनलाल यांच्या घरी त्यांचे चुलत भाऊ दिलीप आणि भाचा मनिष यांच्याशी आमची भेट झाली. दोघांनीही सांगितलं की रतनलाल आता या जगात नाहीत, ही बातमी त्यांच्या पत्नीला पूनमला अजूनही सांगितलेली नाही.
मात्र, घरातून रतनलाल यांच्या पत्नी पूनम यांचा मोठमोठ्याने येणारा रडण्याचा आवाज सांगत होता की त्यांना या अकल्पित घटनेची कल्पना आली असावी.
गेल्या शनिवारीच दोघांनी लग्नाचा 16 वा वाढदिवस साजरा केला होता.
1998 साली रतनलाल नोकरीवर रुजू झाले. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी त्यांना रॉबर्ट वाड्रा यांच्या सुरक्षा ताफ्यात तैनात केलं होतं. दोन वर्षांपूर्वी त्यांचं प्रमोशन झालं आणि ते हेड कॉन्स्टेबल झाले.
रतनलाल यांचे चुलत भाऊ दिलीप सराय रोहिल्लालगतच्या परिसरात राहतात. त्यांनी सांगितलं, "काल मुलं ट्युशनला गेली तेव्हा पूनमने टिव्हीवर ऐकलं की रतनलाल यांना गोळी लागली आहे. तोवर टिव्हीवर फक्त बातमी येत होती. रतनलाल यांचा फोटो नव्हता. त्यानंतर कदाचित शेजाऱ्यांनी पूनम यांच्या घरचा टिव्ही बंद केला. तेव्हापासून टिव्ही बंदच आहे."
जहांगीर पुरीमध्ये राहणारे रतनलाल यांचे भाचे मनीष सांगतात, "दिल्लीत उसळलेल्या दंगलींची माहिती आम्हाला होतीच. मामा तिथेच बंदोबस्तावर असल्याचंही माहिती होतं. तरीही जेव्हा रतनलाल यांना गोळी लागल्याची बातमी टिव्हीवर आली तेव्हा आम्हाला वाटलं दिल्ली पोलिसात एकच रतन लाल थोडीच आहे. मात्र, काही वेळाने फेसबुकवर वगैरे फोटो आले तेव्हा कळलं की मामांनाच गोळी लागली आहे. आम्ही लगेच इथे आलो. मात्र, मामींना अजून काही सांगितलेलं नाही."
राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातले रतनलाल तीन भावंडांमध्ये थोरले होते. मधला भाऊ दिनेश गावात गाडी चालवतात. तर धाकटा भाऊ मनोज बंगळुरुमध्ये एका खाजगी कंपनीत काम करतात. रतनलाल यांच्या आई संतरादेवी सीकरमध्येच दिनेशसोबत राहतात.
दिलीप यांनी सांगितलं की रतनलाल यांच्या आई संतरादेवी अजून सीकरमध्येच आहेत आणि त्यांनाही रतनलाल यांच्या मृत्यूची बातमी सांगितलेली नाही.
पूनमचा आक्रोश
रतनलाल यांना तीन मुलं आहेत. थोरली मुलगी परी 11 वर्षांची आहे. मधली मुलगी कनक 8 वर्षांची आहे तर धाकटा राम 5 वर्षांचा आहे. तिघेही केंद्रीय विद्यालयात शिकतात. घरात लोकांची गर्दी होऊ लागली तेव्हा तिन्ही मुलांना शेजारी पाठवण्यात आलं. या तिघांपैकी फक्त परीलाच याची कल्पना आहे की तिचे वडील आता कधीही घरी परतणार नाही.
रतनलाल यांच्या शेजाऱ्यांकडून कळलं की त्यांनी पाच वर्षांपूर्वीच कर्ज काढून बुराडीच्या अमृतविहारमध्ये घर घेतलं होतं. चिंचोळ्या गल्ल्यांच्या आत असलेल्या या घराचं अजून प्लॅस्टरही झालेलं नाही.
आज याच घराबाहेर चपलांचा ढिग लागला आहे. ज्या भिंतीजवळ लोकांची गर्दी आहे तिथून एक ब्लॅक बोर्ड दिसतो. त्या ब्लॅकबोर्डवर मुलांनी काहीतरी खरडलं आहे. एक जुना कॉम्प्युटरही आहे. पूनम ज्या पलंगावर बसल्या आहेत तिथे त्यांना सांभाळण्यासाठी बऱ्याच महिलाही आहेत.
पूनम मोठमोठ्याने रडत आहेत. मधेच त्यांची शुद्ध हरपते. टिव्हीवर बातमी पाहिल्यापासून त्यांनी अन्नाचा कणही घेतलेला नाही. कुणी म्हटलंच तर "ते आल्यावर त्यांच्यासोबतच जेवेन" म्हणून सांगतात.
चिंचोळ्या गल्लीत असलेल्या या घरापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला बऱ्याच जणांना पत्ता विचारावा लागला. लोकांनी रस्ता तर सांगितलाच. सोबत रतन लाल यांच्या आठवणींनाही उजाळा दिला.
रतनलाल किती चांगले होते, मनमिळाऊ होते, हे सांगताना कुणी थकत नव्हतं. जे त्यांना नावाने ओळखत नव्हते ते त्यांच्या लांब मिशांवरून तर ओळखायचेच.
मीडियावाले असं कसं करु शकतात?
मनीष सांगतात, "गेल्यावेळी शाहीन बाग आणि सीलमपूरमध्ये निदर्शनं झाली त्यावेळीसुद्धा मामा तिथे बंदोबस्तावर होते. त्यांच्या हाताला दुखापतही झाली होती. मात्र, ते फक्त ड्युटीवर असताना पोलीस असतात. घरी येताच सामान्य माणसाप्रमाणे असतात. तुम्ही धाकदपटशा करणारे पोलिसवाले बघितले असतील. ज्यांना बघूनच भीती वाटते. मामा असे अजिबात नव्हते. ऑफिस आणि पोलिसांच्या गोष्टी कधीच घरी आणत नसत."
कायम हसतमुख असणारे रतनलाल यांच्याविषयी बोलताना त्यांचे शेजारी मीडियावर मात्र चांगलेच नाराज होते. त्यांनी सांगितलं की सोमवारी रात्री 11 च्या सुमारास मीडियाची काही माणसं रतनलाल यांच्या घरी आली आणि त्यांच्या झोपलेल्या मुलांना उठवून फोटो काढले.
लोकांमध्ये यावरुनही संताप होता की दिल्लीत पोलीसच सुरक्षित नाहीत तर सामान्य नागरिकाची व्यथा काय सांगायची.
कुटुंबीयांच्या मागण्या
जोपर्यंत कुटुंबीयांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर रतनलाल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी कुजबूज गर्दीतून ऐकू येत होती.
आम्ही दिलीप यांना कुटुंबीयांच्या मागण्यांविषयी विचारल्यावर ते म्हणाले, "आमची मागणी थेट आहे. आमच्या भावाला शहिदाचा दर्जा मिळावा. कारण स्वतःसाठी नाही तर लोकांना वाचवताना त्यांचा जीव गेला. वहिनीला सरकारी नोकरी मिळावी आणि सरकारने मुलांच्या शिक्षणाची सोय करावी."
मात्र, या सर्व गोष्टींना अजून वेळ आहे. रतनलाल यांच्या कुटुंबीयांना अजूनही हेही नीटसं माहिती नाही की नेमकं काय घडलं? रतनलाल यांचा शवविच्छेदन अहवालाही अजून आलेला नाही. काल रात्री आम आदमी पक्षाचे आमदार संजीव झा कुटुंबीयांची भेट घेऊन गेले. मात्र, दिल्ली पोलिसांनी या कुटुंबाला अजून कुठलीही माहिती दिलेली नाही.
या परिसरातले लोक सोशल मीडियावर बरेच अॅक्टिव्ह आहेत. सर्वांच्याच मोबाईलवर हिंसाचाराशी संबंधित फोटो, व्हिडियो, बातम्या, अफवा असं बरंच काही येतंय. लोकांना सध्यातरी माहितीचा हाच एकमेव स्रोत आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)