मुंबईत दंगल रोखणाऱ्या मोहल्ला कमिटीचं काम कसं चालतं?

    • Author, प्राजक्ता धुळप
    • Role, बीबीसी मराठी

गेले काही दिवस जातीय दंगलीमुळे ईशान्य दिल्ली होरपळतेय. जमाव एकमेकांवर धावून जातानाचे व्हीडिओ सोशल मीडियावर फॉरवर्ड, शेअर होत आहेत आणि खरं-खोटं याची शहानिशा न करता ते व्हायरल केले जात आहेत. भावनांचा उद्रेक सुरू आहे. हिंदू, मुस्लीम समुदायांविषयी प्रक्षोभक भाषा वापरली जातेय.

याचे पडसाद मुंबईत बसलेल्या कोणाच्या फोनवर नाहीत उमटले तर नवलच. धारावीमध्ये अनेकांच्या फोनवर दिवसाला असे शेकडो मेसेज येताय ज्यामुळे लोकांच्या भावना भडकू शकतात. अशा परिस्थितीत जगातल्या मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेल्या धारावीमध्ये गेले काही दिवस मोहल्ला कमिटीच्या शांतता बैठका सुरू आहेत. त्यात नेमकं काय घडतंय ते जाणून घेऊ.

दिल्ली दंगलीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी धारावीच्या 90 फीट रोडवरच्या कामराज हायस्कूलमध्ये मोहल्ला कमिटीची मिटींग बोलावण्यात आली. धारावीतल्या या मोहल्ला कमिटीचा 'हम सब एक है' नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. दंगलीचे भावना भडकवणारे जे मेसेज येत होते, त्यावर मोहल्ला कमिटीच्या लोकांमध्ये रविवारपासूनच चर्चा सुरू होती.

या कमिटीत धारावीचे वेगवेगळ्या धर्माचे तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे. मोहल्ला कमिटीची मिटींग दर महिन्याला होत असल्याने, धारावीकरांना त्याचं काही विशेष वाटलं नाही. साधारण दोनशे धारावीकर या मिटींगला जमले होते. अफवांवर विश्वास ठेवू नका, आपापसात संवाद सुरू ठेवा, वाद-विवाद होतील अशा विषयांवर शांतपणे तोडगा काढा, वातावरण चिघळू देऊ नका या आवाहनांवर यावेळीही जोर दिला गेला.

या मासिक मिटींगला न चुकता उपस्थित राहणारे गुलजार खान या मोहल्ला कमिटीला धारावीची ताकद मानतात. 1993 साली धारावीत दंगल झाली तेव्हा ते अवघ्या सात वर्षांचे होते. वस्तीत काय घडलं हे त्यांना अंधुकसं आठवतं, पण वडील वकार खान यांच्यामुळे नंतर अनेक वर्षं त्यांनी दंगलीतल्या कहाण्या ऐकल्या आहेत.

'मुंबईतील दंगली आणि होरपळणाऱ्या वस्त्या'

अयोध्येत 6 डिसेंबर 1992 साली बाबरी मशीद पाडल्यानंतर देशभर अनेक ठिकाणी दंगली उसळल्या. त्यात सगळ्यांत मोठी झळ मुंबईला बसली होती. मुंबईत मशीद बंदर, भायखळा, नागपाडा, वरळी, वांद्रे, बेहरामपाडा, कुर्ला, भागातल्या हिंदू आणि मुस्लीम वस्त्यांवर जमावाने हल्ला केला.

श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालानुसार डिसेंबर 1992 ते जानेवारी 1993 या दोन महिन्यांच्या काळात मुंबई दंगलीमध्ये 900 लोक मारले गेले. त्यात मुस्लिमांची संख्या 575, हिंदूंची 275, इतर पाच जण तर ज्यांची ओळख पटली नाही असे 45 लोक होते.

मुंबईतल्या दंगलीनंतर अनेक वस्त्या काही दिवस धगधगत होत्या. धारावी ही त्यापैकीच एक. धारावीला अनेकजण 'मिनी इंडिया' म्हणतात. अनेक जाती-धर्माचे लोक आजही दाटीवाटीने इथं राहतात. इथल्या छोट्या-छोट्या उद्योगांमध्ये दिवसरात्र काम सुरू असतं.

92 च्या दंगलीत अनेक कुटुंबांनी धारावी सोडली होती. अनेक महिने वस्तीत तणावाची परिस्थिती निर्माण होत होती आणि धार्मिक समुदायांमध्ये अंतरही वाढत चाललं होतं. अशा वेळी मोहल्ला कमिटी तयार झाल्याने वातावरण निवळायला मदत झाली, असं त्यावेळी धारावीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेणारे सामाजिक कार्यकर्ते भाऊ कोरडे सांगतात. आज त्यांचं वय 80 आहे.

'मोहल्ला कमिटीत तिसरी पिढी'

आज मोहल्ला कमिटीची तिसरी पिढी तयार होतेय याचा कोरडे यांना अभिमान वाटतो. सुरूवातीच्या काळात धारावीत शांतता नांदावी म्हणून 'हम सब एक है' या नावाचं एक पोस्टर बनवण्यात आलं होतं, त्याविषयी गुलजार खान सांगतात- "जाहिरपणे होर्डिंग लावण्यासाठी एक फोटो काढायचा होता. सर्व धर्माची मुलं असावीत यासाठी फोटोसेशन करायचं होतं. कोणीही हिंदू पंडित बनण्यासाठी मुंडन करायला तयार नव्हतं. त्यावेळी मुस्लीम असूनही माझ्या वडिलांनी म्हणजेच वकार खान यांनी मला हिंदू पंडित बनवण्यासाठी माझं मुंडन केलं."

मोहल्ला कमिटी ही चळवळ राजकिय नाही, तर लोकांमधून पुढे आलेली चळवळ आहे, असं त्यांना वाटतं. ते म्हणतात, "दंगल होण्याचे अनेक प्रसंग धारावीत येऊन गेले, पण दंगल झाली नाही. एकदा काय झालं... गणेशोत्सव आणि रमझान ईद एकाच काळात होती. धारावीत 31 मशिदी आहेत. गणेश विसर्जनाच्या मिरवणुका आणि नमाझ पढण्याची वेळ एकच. दोन्ही धार्मिक भावना महत्त्वाच्या."

"धारावीतल्या बडी मशिदीजवळून मिरवणूक गेली तर त्याची झळ दोघांनाही पोहचणार. अशावेळी दोन्ही समुदायाच्या लोकांनी मोहल्ला कमिटीत मुद्देसुद चर्चा केली. आणि असं ठरलं की नमाज संपल्यानंतर गणेश विसर्जनाची मिरवणूक न्यायची. आणि मशिदीजवळून जाताना गुलाल फेकायचा नाही. मशिदीवर गुलाल उडेल म्हणून मोठा कपडा बांधायचा. पाच वर्षांपूर्वी नवरात्र आणि रमझान ईदच्या वेळी देखील अशीच परिस्थिती उद्भवली होती. तेव्हाही असाच तोडगा निघाला," गुलजार खान सांगतात.

अशा समझोत्यांमध्ये पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे, असं भाऊ कोरडे यांना वाटतं.

गुलजार खान पाच वर्षांपूर्वीची एक तणाावपूर्ण परिस्थिती सांगतात, "धारावीत एक राजकीय कार्यक्रम आयोजित केला गेला होता. रस्त्यालगत खांबांवर भगवे झेंडे लावण्यात आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते काढण्यावरून वातावरण काहीसं तंग होऊ लागलं होतं. कारण दोन दिवसांनंतर मोहर्रम सुरू होणार होता. त्यासाठी रितीरिवाजाप्रमाणे खांबांवर मोहर्रमचे झेंडे लागणार होते. पण भगवे झेंडे काढण्याची जबाबदारी समझोता करून पोलिसांनी घेतली."

अनेकदा दंगलसदृश्य परिस्थिती तयार होण्यासाठी अगदी क्षुल्लक कारणंही पुरेसं ठरतं. त्यामुळे धारावीच्या मिटींगमध्ये वस्तीतलं ट्रॅफिक जॅम, गटारं तुंबणं, व्यसनी लोकांविषयी तक्रारी असे विषयही चर्चेला येतात. आणि त्यासाठी पोलिसांच्या मदतीने प्रश्नांचा विषयांचा पाठपुरावाही केला जातो.

मोहल्ला कमिटी चळवळीला 25 वर्षं पूर्ण

सध्या महिन्यातून एकदा अंधेरीतल्या वर्सोवामध्ये मुंबईतल्या मोहल्ला कमिटीच्या प्रतिनिधींची एकत्रितपणे मीटिंग होते. मुंबईवर दंगलीची परिस्थिती पुन्हा ओढवू नये, समाजात जातीय सलोखा तयार व्हावा म्हणून माजी पोलीस आयुक्त ज्युलियो रिबेरो, आयपीएस अधिकारी सतीश साहनी आणि सामाजिक कार्यकर्त्या सुशोभा बेंद्रे यांनी मोहल्ला कमिटी बनवण्यासाठी 1994मध्ये पुढाकार घेतला. गेल्या वर्षी या उपक्रमाला 25 वर्षं पूर्ण झाली. त्यावेळी काही कार्यकर्त्यांचा सत्कारही करण्यात आला होता.

पत्रकार मीना मेनन यांच्या मुंबई दंगलीविषयी असलेल्या Riots and After in Mumbai या पुस्तकात लिहितात, "1994 मध्ये मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेलो आणि सतीश सहानी यांच्या कल्पनेतून आणि प्रयत्नांमधून पुढे आलेली मोहल्ला कमिट्यांची चळवळ आजही सुरू आहे. यातील काही कमिट्या पुढे निष्क्रिय झाल्या. त्यांना पुन्हा सक्रीय करण्याच्या उद्देशाने 2006 पासून विरोचन रावते हे सामाजिक कार्यकर्ते काम करत आहेत.

"सुरुवातीच्या काळात या कमिट्या इतर नागरी समस्या सोडवण्याचंही काम करत. पोलीस आणि लोक यांच्यातला संवादाचा दुवा बनत. क्रिडा स्पर्धांचं आयोजन करत. आता त्यांचं काम नियमित सुरू आहे. तणावाची शक्यता नसलेल्या एखाद्या वस्तीतही लोक अनपेक्षितपणे सक्रिय होऊ शकतात. विरोचन रावतेंना वाटतं की दंगलीच्या वेळची मानसिकता आज नाही, पण लोकांचे विचार आजही कट्टर आहेत," असं मेनन नमूद करतात.

'भिवंडी पॅटर्न आणि मोहल्ला कमिटी'

मोहल्ला कमिटीच्या संकल्पनेचे जनक माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांना मानलं जातं. मुंबईत जेव्हा दंगली भडकल्या होत्या तेव्हा भिवंडी शांत होती, याचं श्रेय खोपडेंना दिलं जातं. त्यावेळी ते भिवंडीचे पोलीस उपायुक्त होते.

भिंवडीमध्ये चार मोठ्या दंगली झाल्या होत्या, त्याचा सखोल अभ्यास खोपडेंनी केला. स्थानिक तंटे सोडवणारी आणि आपापसात विश्वासाचं नातं तयार करणारी मोहल्ला समिती तयार करण्यात आली. त्यांच्या या प्रयोगाला 'भिवंडी पॅटर्न' असं म्हटलं जातं.

दिल्लीत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने सुरेश खोपडे यांच्याशी चर्चा केली. पोलिसांनी दंगलीवेळी निर्णायक भूमिका घ्यायला हवी होती, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

खोपडे सांगतात, "आग लागल्यानंतर ती विझवण्याचं काम केलं जातं. आग लागू नये यासाठी काम करत नाही. ज्यावेळी कायद्यांना आव्हान दिलं गेलं त्यावेळी दिल्लीत किंवा इतर ठिकाणी पोलिसांनी चर्चा करून लोकांना समजावून सांगायला हवं होतं.

"हिंदू आणि मुस्लीम समुदायामध्ये तसंच पोलीस दलातील कनिष्ठ आणि वरिष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये संवाद निर्माण करायला हवा होता. तसंच दंगली हाताळण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीबद्दल विचार करायला हवा होता. तसं न झाल्यानेच दिल्लीतल्या दंगली चिघळताना दिसल्या," खोपडे सांगतात.

दिल्लीत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोहल्ला कमिट्यांची गरज असल्याचा उल्लेख केला आहे. येणाऱ्या काळात दंगली थोपवण्यासाठी कोणता पॅटर्न दिल्लीकडे असेल आणि त्यासाठी मुंबईच्या मोहल्ला कमिट्या आशादायक ठरतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)