आंतरराष्ट्रीय महिला दिन: मोर्चेकरी महिलांना का मिळताहेत बलात्काराच्या धमक्या?

    • Author, सायरा अशर
    • Role, बीबीसी न्यूज

चूल आणि मूल हेच स्त्रीचं खरं जग असल्याची म्हण आपल्याकडे आहे. अशाच बुरसटलेल्या अर्थाची पाकिस्तानी म्हण आहे- 'चादर और चार दिवारी ही औरत की असली जगह है.'

मात्र, येत्या रविवारी पाकिस्तानातल्या महिला या बुरसटलेल्या विचारांविरोधात रस्त्यावर उतरणार आहेत. या रॅलीची धास्ती घेतलेल्यांनी अनेक महिलांना धमक्या देऊन रॅलीत सहभागी न होण्याचा इशारा दिला आहे. काहींनी तर न्यायालयात याचिकादेखील दाखल केल्या आहेत. मात्र, तरीही या रॅलीची जोरदार तयारी सुरू आहे.

या रॅलीला 'औरत मार्च' म्हटलं जातं. 2018 सालापासून पाकिस्तानात जागतिक महिला दिनी ही रॅली निघते. पाकिस्तान जिथे आजही महिलांना सार्वजनिक ठिकाणी एकट्याने जायला भीती वाटते, अशा रुढीवादी मुस्लीम देशात महिला हक्कांसाठी महिलांनी एकत्र येऊन अशी रॅली काढणं, सोपं नाही.

गेल्यावर्षी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या महिलांना याच्या परिणामांना तोंड द्यावं लागलं. विशेषतः सोशल मीडियावर. अनेकींना खून आणि बलात्काराच्या धमक्या देण्यात आल्या. यावरूनच पाकिस्तानात अशी एखादी रॅली काढणं किती धाडसाचं आहे, याची कल्पना येते.

यावर्षी तर दोन्ही बाजूंचं वातावरण चांगलंच तापलं आहे. धार्मिक आणि कडव्या विचारसरणीच्या गटांनी ही रॅली इस्लामविरोधी असल्याची उघड भूमिका घेतली आहे. तर मध्यममार्गी लोकांनीही या रॅलीमुळे चिथावणीखोर वातावरण तयार होईल, अशी भावना व्यक्त केली आहे.

याविषयी बीबीसीशी बोलताना रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या कराचीतील एका महिलेने म्हटले, "ज्या समाजात आम्ही राहतो त्या समाजात स्त्रियांनी मोबाईल हाताळणे, एकटीने बाहेर पडणे, यासारख्या हक्कांची मागणी करण्याचा जो हक्क आहे, त्यावरून बराच संघर्ष आहे."

पाकिस्तानात महिलांवर होणारा हिंसाचार आणि छळ याविरोधात आवाज उठवण्यासाठी जागतिक महिला दिनी कराचीतल्या एका पार्कमध्ये महिलांना एकत्र जमायचं, असं काही महिलांनी ठरवलं आणि त्यातूनच 'औरत मार्च'च्या कल्पनेचा जन्म झाला.

त्यानंतर ही मोहीम व्यापक होत गेली. पुढे यात तृतीयपंथीयांचाही समावेश झाला. महिला सुरक्षेसाठी चांगले कायदे आणि अस्तित्त्वात असलेल्या कायद्यांची परखड अंमलबजावणी अशी मागणी करण्यात आली. तसंच महिलांविषयी समाजात जागरुकता निर्माण करणे आणि त्यांच्याविषयीचा बुरसटलेला दृष्टिकोन बदलणं, याकडे विशेष लक्ष दिलं जाऊ लागलं.

अमेरिकेतही अशाच प्रकारचे कार्यक्रम आखले जातात. 'औरत मार्च'ची प्रेरणा ही त्या कार्यक्रमांतून मिळालेली असली तरी या मोहिमेला खरी ऊर्जा मिळाली ती पाकिस्तानात घडणाऱ्या घटनांमुळे. पाकिस्तानातील सोशल मीडिया स्टार कंदील बलूच ऑनर किलिंगची बळी ठरली. या आणि अशाच प्रकारचा अनेक घटनांमुळे पाकिस्तानातील सुधारणावादी स्त्रियांना अशाप्रकारच्या मार्चची प्रकर्षाने गरज भासू लागली.

औरत मार्चच्या आयोजक आणि या मार्चची मूळ संकल्पना असणाऱ्या काही महिलांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "तरुण मुलींनी आवाज उठवण्याची गरज इथे आधीपासूनच होती. आम्ही वर्तमान परिस्थितीला आव्हान देत आहोत. आम्ही आमच्या समाजातील प्रतिगामी तत्त्वांना आव्हान देत आहोत."

'आपले हक्क हिसकावून घ्या'

'महिलांना आर्थिक न्याय' ही या वर्षीच्या औरत मार्चची मुख्य मागणी आहे.

मात्र, औरत मार्चची गेल्या वर्षी जी थीम ठेवण्यात आली त्यावरून पाकिस्तानात बराच गदारोळ झाला. मुख्यप्रवाहातील प्रसार माध्यमांपासून ते सोशल मीडियापर्यंत अनेकांनी त्या थीमवर टीका केली. अनेकींना ट्रोल करण्यात आलं.

गेल्या वर्षीची थीम होती 'मेरा जिस्म मेरी मर्जी' म्हणजे 'माझं शरीर माझी मर्जी'. पाकिस्तानसारख्या पुराणमतवादी देशात एवढी टोकाची पुरोगामी भूमिका मांडल्यामुळे अनेकांनी विखारी टीका केली आणि म्हणूनच यावर्षी होणाऱ्या मार्चला अधिक विरोधाचा सामना करावा लागतो आहे.

स्वतःच्या शरीरावर आपलं स्वतःचं नियंत्रण असायला हवं, हा 'मेरा जिस्म मेरी मर्जी' थीममागचा उद्देश होता, असं आयोजकांचं म्हणणं होतं. मात्र, त्या घोषवाक्याचा अर्थ लैंगिक स्वातंत्र्य आणि व्यभिचार यांच्याशी जोडण्यात आला. हे घोषवाक्य अश्लील आहे. संभोगाविषयी आहे आणि स्त्रीकडून असणाऱ्या नैतिकतेच्या सर्वोच्च अपेक्षेचा भंग करणारं आहे, अशी टीका झाली.

त्यामुळे या मोहिमेचा आदर्शच मुळात पाश्चिमात्य आहे, असंही म्हटलं गेलं.

'मेरा जिस्म, मेरी मर्जी'ची कहाणी

गेल्या वर्षी नूर (नाव बदललेलं आहे) या तरुणीने 'मेरा जिस्म, मेरी मर्जी' घोषवाक्य असणारं हे पोस्टर तयार केलं होतं. स्त्रीला विचारस्वातंत्र्य असायला हवं, काय घालायचं आणि स्वतःच्या शरीरासोबत काय करायचं, हे ठरवण्याचा संपूर्ण हक्क स्त्रीला असायला हवा, हे करताना तिला छळ किंवा बलात्काराची भीती असता कामा नये, हा पोस्टर बनवण्यामागचा आपला उद्देश असल्याचं नूर सांगते.

मात्र, पोस्टरवर जी नकारात्मक प्रतिक्रिया उमटली त्यामुळे आपण इतके घाबरलो की आता स्वतःचं नाव उघड करायचीही भीती वाटते, असं नूर म्हणते. बीबीसी ऊर्दूशी बोलताना नूर सांगत होती.

यात सहभागी असणारे म्हणाले की घोषवाक्य आणि पोस्टर प्रक्षोभक आहे. मात्र, सामाजिक रुढी बदलताना हेच गरजेचं असतं.

जेंडर फ्लुईड (लैंगिकता निश्चित नसणारी व्यक्ती) असणारी 28 वर्षांची एक स्वयंसेविका म्हणाली, "या समस्येकडे लक्ष देण्याचा एक मार्ग म्हणजे तुम्ही शांतपणे काम करत रहा आणि काही दशकांनंतर तुम्हाला त्याचे परिणाम बघायला मिळतील. आणि दुसरा दृष्टिकोन आहे 'हिसकावून घ्या'. कारण ही लढाई खूप दीर्घकाळ चालणारी आहे, कठीण आहे आणि क्लेशदायक आहे."

आमच्या ग्रुपने सोशल मीडिया आणि इतरही माध्यमातून या मोहिमेमागचा उद्देश समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्याचा दुभंगलेली मनं सांधण्यात आणि शाब्दिक हल्ले रोखण्यात काहीच उपयोग झाला नाही. उलट यावर्षीच्या रॅलीच्या तोंडावर विरोध अधिक कटू होत चालला आहे. पोस्टर्स आणि भित्तीचित्रं फाडण्यात आली. सोशल मीडियावर स्वयंसेवकांसाठी आवाहन करणाऱ्या पोस्टवर आलेल्या स्त्रीद्वेषी प्रतिक्रियांनी तर हद्द पार केली आहे.

एका स्वयंसेविकेने सांगितलं, "मला वाटतं समाजाच्या पचनी पडेल, त्यापेक्षा जास्त वेगाने आम्ही जातो. मात्र, आम्ही समाज, संस्कृती आणि धर्माने शिकवलेल्या विषारी विचारांना दूर करण्यास त्यांना मदत करत आहोत. स्त्री-पुरूष भेदभावरहित नव्या व्यवस्थेविषयी त्यांना सांगत आहोत."

गेल्या महिन्यात 'औरत मार्च' रॅलीविरोधात लाहोर कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली होती. ही रॅली अराजकता पसरवणारी, अश्लीलतेला प्रोत्साहन देणारी, ईशनिंदा करणारी आणि द्वेष पसरवणारी असल्याने मार्चला परवानगी देऊ नये, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

कोर्टाने याचिका फेटाळत औरत मार्चला परवानगी दिली असली तरी रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्यांनी 'सभ्यता आणि नैतिक मूल्यांचं' पालन करावं, अशी सूचनाही कोर्टाने केली आहे.

रॅलीचा दिवस जवळ येतोय तसा संघर्ष अधिक तीव्र होताना दिसतोय. याच आठवड्यात एका टीव्ही न्यूज चॅनलवर 'औरत मार्च' या विषयावर चर्चा करण्यात आली. चर्चेचं थेट प्रक्षेपण सुरू असताना मार्चविरोधी असणाऱ्या आणि स्त्रीविरोधी लिखाणासाठी ओळखल्या जाणाऱ्या एका लेखकाने महिला अधिकार कार्यकर्तीला शिवीगाळ केली.

या शिवीगाळीचा निषेध करण्यात आला असला तरी मार्च आयोजकांनाही सतर्क राहण्याचा आणि काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

पाकिस्तानातील प्रसिद्ध अभिनेत्री मिहिरा खान यांनीही ट्वीट करत 'औरत मार्च'ला पाठिंबा दिला आहे. मात्र, रॅलीमध्ये प्रक्षोभक फलक वापरू नका, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

मात्र, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना रॅलीच्या समर्थनार्थ उतरली आहे. अॅमेन्स्टी इंटरनॅशनलने 'मोर्चेकऱ्यांना मिळणाऱ्या हिंसाचार, छळ आणि बलात्काराच्या धमक्यांचा' निषेध केला आहे.

"धोका पत्करल्याशिवाय स्त्रीला तिचे हक्क मागता येत नाही, यावरूनच औरत मार्चचं महत्त्व अधोरेखित होतं."

या सगळ्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये सहभागी होणाऱ्यांना अॅसिड हल्ला, बॉम्ब हल्ला, पाळत ठेवणे किंवा डॉक्सिंग म्हणजे खाजगी माहिती इंटरनेटवरून सार्वजनिक करण्याची भीती सतावते आहे.

"आम्ही घाबरलो आहोत. पण आम्ही घाबरलो नाही, आम्हाला कशाची भीती वाटली नाही तर बदल घडण्याची अपेक्षा कशी बाळगणार?"

आणि म्हणूनच या रविवारी समाजाने घातलेली ही भीतीसुद्धा पाकिस्तानातील स्त्रीला 'चादर और चार दिवारी'मध्ये कैद ठेवू शकणार नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)