पाकिस्तान: आपल्याच नागरिकांचा पाकिस्तानी सैन्याकडून अमानुष छळ

    • Author, एम. इलियास खान
    • Role, बीबीसी, डेरा इस्माईल खान, पाकिस्तान

अमेरिकेवर झालेल्या 9/11च्या अतिरेकी हल्ल्यानंतर कट्टरपंथीयांविरोधातल्या दीर्घकालीन लढ्यात हजारो लोकांचा मृत्यू झाला. हत्यांचे पुरावे आणि सैन्यांकडून झालेल्या अत्याचाराच्या कहाण्या आता उघड होत आहेत.

बीबीसीने काही पीडितांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून सर्व हकीकत समजून घेतली.

2014च्या सुरुवातीला टिव्ही चॅनल्सवर पाकिस्तानातल्या तालिबानविरोधी लढ्याला आलेल्या यशाबद्दल कौतुकाचा वर्षाव सुरू होता. तालिबान्यांचा एक अत्यंत वरिष्ठ कमांडर रात्री करण्यात आलेल्या एका हल्ल्यात ठार झाला होता.

अफगाण सीमेवरच्या उत्तर वझिरीस्तानच्या आदिवासी भागात अदनान रशीद आणि त्याच्या कुटुंबातले पाच जण या हल्ल्यात ठार झाल्याचं वृत्त आलं.

पाकिस्तानच्या हवाई दलातला निवृत्त टेक्निशिअन असलेल्या रशीदला बरेचजण ओळखायचे. त्याने मलाला युसूफझईला एक अतिशय वाचनीय पत्र लिहिलं होतं.

मलाला मुलींच्या शिक्षणासाठी लढणारी कार्यकर्ती आहे, तिला नोबेल देखील मिळालं आहे. ती शाळेत शिकत असताना तालिबान्यांनी तिच्या डोक्यात गोळी झाडली होती.

कट्टरतावाद्याला ठार करण्याऐवजी नागरिकांनाचं ठार केलं

वर्षभरानंतर कळलं की ज्या ठिकाणाला लक्ष्य करण्यात आलं होतं ते चुकीचं होतं. रशीदचा एक व्हिडियो समोर आला आणि कळलं की त्याच्या मृत्यूची बातमी खोटी होती.

कट्टरपंथीयाला ठार करण्याऐवजी पाकिस्तानी लष्कराने एका स्थानिकाचं घर बेचिराख करत त्याच्या संपूर्ण कुटुंबालाच ठार केलं होतं.

सुरक्षा दलांनी आपण चुकीचा हल्ला केल्याचं कधीच मान्य केलं नाही. या घटनेची सत्यता पडताळण्यासाठी बीबीसीचे प्रतिनिधी सिंधू नदीकाठी असलेल्या डेरा इस्माईल खान गावात पोचले. इथे त्या व्यक्तीला भेटले ज्याचं घर सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केलं होतं.

हल्ला झाला त्यावेळी 20 वर्षांचे असलेले नझिरुल्लाह सांगत होते, "रात्रीचे जवळपास अकरा वाजले होते." नझिरुल्लाह यांचं नुकतच लग्न झालं होतं आणि लग्नानंतर त्यांना स्वतंत्र खोली मिळाली होती, ही त्यांच्यासाठी मोठी गोष्ट होती. घरातले इतर सर्व सदस्य घरातल्या दुसऱ्या खोलीत झोपले होते.

नझिरुल्लाह सांगतात, "घरात स्फोट झाल्यासारखा आवाज झाला. माझी आणि माझ्या बायकोची झोप उघडली. हवेत दारुगोळ्याचा वास भरला होता. आम्ही दोघेही दारातून बाहेर आलो आणि बघितलं तर आमच्या खोलीचं छत पडलं होतं. एका कोपऱ्यात जिथे आमचा पलंग होता तेवढाच भाग पडला नव्हता."

दुसऱ्या खोलीचं छतही कोसळलं होतं आणि अंगणात आग लागली होती. नझिरुल्लाह यांना मलब्यातून रडण्याचे आवाज ऐकू येत होते. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने कुटुंबीयांना आगीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

शेजाऱ्यांनीही जखमी आणि मृतांना बाहेर काढण्यात मदत केली.

नझिरुल्लाहच्या कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाला. त्यात एक तीन वर्षांची चिमुकलीही होती. सुदैवाने त्यावेळी जेमतेम वर्षभराची असलेली त्यांची पुतणी सुमय्या वाचली होती. तिची आई मात्र दगावली. मलब्यातून कुटुंबातल्या इतर चौघांनाही वाचवण्यात यश आलं. मात्र, त्या सर्वांनाच जबरदस्त मार लागला होता.

या हल्ल्यानंतर नझिरुल्लाह आपल्या कुटुंबीयासोबत डेरा इस्माईल खान इथे रहायला आलेत. इथे बरीच शांतता आहे.

50 लाख लोकांचं स्थलांतर

चकमकीतून जीव वाचवण्यासाठी पाकिस्तानातल्या या भागातले लोक कायमच आपलं घरदार सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होत असतात. गेल्या दोन दशकात हा आदिवासीबहुल भाग बराच अशांत आहे.

स्थानिक प्रशासन आणि स्वतंत्र रिसर्च ग्रुपच्या म्हणण्यानुसार कट्टरपंथीयांच्या हिंसाचारामुळे 2002 सालापासून वायव्य पाकिस्तानातल्या जवळपास 50 लाख लोकांना आपलं घरदार सोडावं लागलंय. हे सगळे नागरिक एकतर शरणार्थी शिबिरांमध्ये राहतात किंवा शांततापूर्ण भागात भाड्याने घर घेऊन राहतात.

या लढ्यात नेमक्या किती जणांचा मृत्यू झाला, याची अधिकृत माहिती उपलब्ध नाही. मात्र, स्थानिक प्रशासन, कार्यकर्ते आणि अभ्यासकांच्या अंदाजानुसार या लढ्यात सामान्य नागरिक,अतिरेकी आणि सैन्य दल मिळून जवळपास 50,000 जणांचा मृत्यू झालाय.

स्थानिक मानवाधिकार कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की लष्कराने केलेले हवाई हल्ले आणि जमिनीवरच्या कारवाईत मोठ्या संख्येने सामान्य नागरिक ठार झाले. आपल्या दाव्याची सत्यता सिद्ध करण्यासाठी ते व्हिडियो आणि डॉक्युमेंट्री तयार करत आहेत.

स्थानिकांच्या हक्कांसाठी चळवळ

या कार्यकर्त्यांना प्रभावशाली नवीन अधिकार संघटना असलेल्या पश्तून तहाफज मूव्हमेंट (PTM)शी जोडलं जातं. स्थानिकांच्या हक्कांची पायमल्ली होत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या तेव्हा गेल्या वर्षी या संघटनेची स्थापना झाली.

पीटीएमचे ज्येष्ठ नेते मंजूर पश्तीन सांगतात, "स्वतःची छळवणूक आणि अपमानाविरोधात उभं राहण्याचं धाडस करण्यात आम्हाला 15 वर्षं लागली. लष्कर आमच्या घटनादत्त अधिकारांची कशी पायमल्ली करतंय, याविषयी आम्ही जागरुकता निर्माण केली."

मात्र, पीटीएमवरही दबाव आहे. पीटीएमचं म्हणणं आहे की उत्तर वझिरीस्तानात 26 मे रोजी जवानांनी केलेल्या गोळीबारात त्यांचे 13 कार्यकर्ते मारले गेले. याविरोधात निदर्शन करण्यासाठी पीटीएमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.

मात्र, मिल्ट्री चेकप्वॉईंटवर हल्ला झाला त्यावेळी कमीत कमी तीन कार्यकर्ते ठार झाल्याचं लष्कराचं म्हणणंय. पीटीएमने हा दावा फेटाळला असला तरी खासदार असलेल्या त्यांच्या दोन नेत्यांना अटक करण्यात आलीय.

पीटीएमने लावून धरलेल्या अनेक प्रकरणांचा बीबीसीने स्वतंत्रपणे तपास केला आणि याविषयी पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यांना प्रश्नही विचारला. मात्र, हे आरोप पूर्णपणे एकतर्फी असल्याचं त्यांचं म्हणणंय.

पंतप्रधान इमरान खान यांच्या सरकारकडूनही कुठलीही प्रतिक्रिया मिळाली नाही. विशेष म्हणजे विरोधी पक्षात असताना स्वतः इमरान खान यांनी या भागातील स्थानिकांच्या हक्कांची पायमल्ली होण्याचा मुद्दा उचलून धरला होता.

9/11 नंतर तालिबान पाकिस्तानात डेरेदाखल कसा झाला?

अल-कायदाने सप्टेंबर 2001 मध्ये न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टनवर हल्ला चढवला आणि इथूनच सर्व घडामोडींची सुरुवात झाली. अमेरिकेने ऑक्टोबर 2001मध्ये अफगाणिस्तानात हल्ला केला. त्यावेळी तालिबान्यांनी अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला आसरा दिला होता. मात्र, हल्ल्यानंतर लादेनला अफगाणिस्तानातून पोबारा करावा लागला.

1996 साली तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या सत्तेवर कब्जा मिळवला. त्यावेळी या सत्तेला मान्यता देणाऱ्या तीन राष्ट्रांपैकी एक राष्ट्र होतं पाकिस्तान. अफगाणिस्तानातला भारताचा प्रभाव कमी करण्यासाठी पाकिस्तानने हे पाऊल उचललं होतं.

अनेक दशकं पाकिस्तान सैन्य मदतीसाठी अमेरिकेवर अवलंबून होता. शिवाय, पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ 'दहशतवादविरोधी लढ्यात' अमेरिकेच्या सोबत होते. मात्र, त्याचवेळी पाकिस्तानच्या सरकारने तालिबान्यांना पाकिस्तानातल्या उत्तर आणि दक्षिण वझिरीस्तान या अंशतः स्वायत्त अशा आदिवासीबहुल भागात आपलं बस्तान बसवू दिलं.

मात्र, अफगाण तालिबानने एकट्याने सीमा ओलांडली नाही. त्यांच्यासोबत इतर कट्टरपंथीय गटांचे अतिरेकीही पाकिस्तानातल्या आदिवासीबहुल भागात शिरले. यातल्या काहींचं तर पाकिस्तानशी कट्टर वैर होतं.

वैश्विक प्रसाराची महत्त्वाकांक्षा बाळगून असलेल्या या जिहादींनी वझिरीस्तानातून हल्ले करायला सुरुवात केली. त्यामुळे पाकिस्तानने या इस्लामिक कट्टरपंथीयांविरोधात अधिक कठोर कारवाई करावी, यासाठी अमेरिकेने पाकिस्तानवर दबाव टाकायला सुरुवात केली.

सुरक्षा विशेषज्ज्ञ आणि Military Inc: Inside Pakistan's Military Economy या पुस्तकाच्या लेखिका आयशा सिद्दीक सांगतात, की अशात हिंसाचार वाढला आणि या युद्धात आपण अडकल्याचं पाकिस्तानला वाटू लागलं. एकीकडे कट्टरपंथीयांवर कारवाईसाठी दबाव होता. तर दुसरीकडे अमेरिकेकडून मिळणाऱ्या मदतीचा हव्यास.

2014मध्ये पाकिस्तानने उत्तर वझिरीस्तानमध्ये नवीन मोहीम उघडली. या मोहिमेमुळे दहशतवादी गट आणि त्यांच्या ठिकाणांवर दबाव वाढला. परिणामी देशातल्या इतर भागात होणारे हल्ले कमी झाले.

'तालिबान आणि लष्कराच्या कामात फरक नाही.'

2001मध्ये जेव्हा तालिबान्यांनी डोंगराळ भागात प्रवेश केला तेव्हा स्थानिकांच्या मनात साशंकता होती. तरीही त्यांनी तालिबान्यांचं स्वागतच केलं. मात्र, काही दिवसातच त्यांचा भ्रमनिरास झाला. तालिबान्यांनी आपले कठोर धार्मिक नियम स्थानिकांवर लादायला सुरुवात केली.

सुरुवातीला मोठ्या संख्येने स्थानिक तरूण तालिबान्यांच्या सशस्त्र गटात सामील झाले. याचा परिणाम असा झाला की कट्टरपंथीयांच्या नेटवर्कमध्ये वेगवेगळ्या स्थानिक समूहांमध्ये असलेल्या शत्रुत्वाचा शिरकाव झाला. त्यांच्यात आपापसातच चकमकी झडू लागल्या.

दुसऱ्या टप्प्यात तालिबान्यांनी एक मोहीम हाती घेतली. या मोहिमेअंतर्गत आपल्या प्रभावाला बाधा पोहचू नये, यासाठी तालिबान्यांनी स्थानिकांच्या जुन्या-जाणत्या प्रमुखांना ठार करायला सुरुवात केली.

2002 पासून तालिबान्यांनी कमीत कमी 1000 ज्येष्ठ नागरिकांना ठार केलं. काही स्वयंसेवी संस्थांनी तर ही संख्या दोन हजाराच्या जवळपास असल्याचं म्हटलंय.

जुलै 2007 साली उत्तर वझिरीस्तानमध्ये एक हत्या झाली होती. स्थानिकांवर कशाप्रकारे कब्जा मिळवण्याचा प्रयत्न होत होता, याचं ही हत्या म्हणजे प्रतीक आहे.

'नागरिकाची अपहरण करून हत्या'

उत्तर वझिरीस्तानातल्या रमझाक भागातल्या स्थानिकांचे नेते मोहम्मद आमीन सांगतात, "यांनी माझ्या भावाचं अपहरण करून त्याची हत्या केली त्यावेळी आमच्या भागात आम्ही कमकुवत नव्हतो. मात्र, त्यांना लष्कराचा पाठिंबा होता. त्यामुळे आम्ही काहीच करू शकलो नाही."

त्यांच्या भावाचा मृतदेह अतिरेक्यांनी अपहरण केल्याच्या दुसऱ्या दिवशी एका बेवारस ट्रकमध्ये सापडला. मोहम्मद आमीन आणि इतरांनी त्या हल्लेखोरांना शोधून काढलं आणि त्यांचा सामना केला. त्यांच्यात झालेल्या चकमकीत आमीन यांचा मुलगा असादुल्लाह, चुलत भाऊ आणि इतर चार स्थानिक मारले गेले.

या नागरिकांनी लष्कराला अनेकदा रमझाकमधल्या तालिबान्यांचा हिंसाचार थांबवण्याची विनंती केली. मात्र, त्याच गावातले तालिबानी नेते सूड घेण्याची धमकी देत असल्याने अखेर स्थानिकही हताश झाले.

'सैन्यात आणि तालिबानच्या कामात फरक नाही'

दशकभरानंतरही आमीन यांना अजिबात शंका नाही की " कधी-कधी तालिबान आणि लष्करामध्ये चकमकी झडत असल्या तरी दोघांच्या कामात फरक नाही."

पीटीएम कार्यकर्त्यांनी अनेक प्रकरणांची माहिती गोळा केली आहे ज्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी स्थानिकांचा अनन्वित छळ केलाय.

उदाहरणार्थ मे 2016मध्ये उत्तर वझिरीस्तानमधल्या टेटी मदाखेल भागातल्या सैन्य ठिकाणावर हल्ला झाला होता. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी संपूर्ण गावाची झडती घेतली होती.

शेजारच्या शेतात लपून हे सर्व बघणाऱ्या आणि ज्याच्या भावालाही जवानांनी ताब्यात घेतलं होतं त्या प्रत्यक्षदर्शीने बीबीसीला सांगितलं की जवान स्थानिकांना काठ्यांनी मारहाण करत होते. इतकंच नाही तर रडणाऱ्या मुलांच्या तोंडात माती भरत होते.

या छळात दोघांचा मृत्यू झाला. त्यात एक गरोदर स्त्रीदेखील होती. तिच्या मुलानेच ही माहिती दिलीय. तर एक व्यक्ती अजूनही बेपत्ता आहे.

या छळातून बचावलेल्यांच्या कहाण्याही वेदनादायी आहेत. डेर इस्माईल खानपासून 100 किमी सिंधू नदीच्या दक्षिणेला असलेल्या रमाक गावात मी सतार्जन महसूदला भेटलो.

आम्ही एका पांढऱ्या तंबूत भेटलो आणि त्याने चहा घेता घेता त्याची कहाणी सांगितली. त्याची दोन मुलंही त्याच्यासोबत होती.

सतार्जन यांच्या कुटुंबाचा छळ

एप्रिल 2015मध्ये एका संध्याकाळी दक्षिण वझिरीस्तानातल्या शाकोरीमधल्या मिलिट्री पोस्टवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. कारवाई म्हणून सुरक्षा दलाच्या जवानांनी आसपासच्या गावातून संशयितांना ताब्यात घेतलं आणि त्यातल्या दोघांची गोळ्या घालून हत्या केली.

दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांनी आपली शोध मोहीम आणखी वाढवली आणि ते सतार्जनच्या गावात पोचले. तिथे सतार्जनच्या घरामागे असलेल्या डोंगरावर शस्त्रास्त्र लपवून ठेवल्याचं जवानांना आढळलं.

सतार्जन सांगतात, "त्यावेळी आमच्या घरात माझा भाऊ इदार्जन, त्याची बायको आणि दोन सुना होत्या."

जवानांनी घराचा दरवाजा ठोठावला. त्यांच्या भावाने दार उघडलं आणि जवानांनी त्याला ताबडतोब त्याचे हात बांधले आणि डोळ्यावर पट्टी बांधली. घरातली इतर पुरूष मंडळी कुठे आहेत, असं त्यांना विचारण्यात आलं आणि घाटीतून इदार्जनच्या चार मुलांनाही अटक करण्यात आली.

साक्षीदारांनी सतार्जनला सांगितलं की सर्व मुलांना बेदम मारहाण करण्यात आली होती आणि त्यांचा सर्वात मोठा पुतण्या रेझवार्जनच्या डोक्याला जबर मार बसला होता.

त्या सर्वांना एका ट्रकमध्ये भरून जवान त्यांना आर्मी कॅम्प भागात घेऊन गेले.

त्या ट्रकच्या ड्रायव्हरने नंतर सतार्जनला सांगितलं की रेझवार्जन आधीच "अर्धमेला झाला होता. त्याला बसताही येत नव्हतं. त्यामुळे जवानांनी ठरवलं की त्याला कॅम्पमध्ये घेऊन जायचं नाही."

डोक्यात गोळी घालून मृतदेह फेकून दिला

त्याने सतार्जनला सांगितलं, "त्यांनी मला ट्रक थांबवायला सांगितलं. रेझवार्जनच्या डोक्यात गोळी झाडली आणि त्याचा मृतदेह रस्त्यावर फेकून दिला."

त्यावेळी सतार्जन दुबईतल्या एका फॅक्ट्रीत काम करायचे. त्यांना बातमी कळताच ते घरी परतले. विमानप्रवास, बस आणि 15 तासांचा पायी प्रवास करत ते रेझवार्जनचा मृतदेह सापडला त्या गावी पोचले.

स्थानिकांनी त्यांना सांगितलं की संचारबंदी असल्याने ते रस्त्यावर सापडलेला रेझवार्जनचा मृतदेह गावात नेऊ शकले नाही. अखेर त्यांनी डोंगरावरच दफनविधी पार पाडला.

यानंतर ते स्वतःच्या गावात गेले. तिथे असलेलं त्यांचं पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. सतार्जनच्या भावाची पत्नी आणि त्याच्या मुलांना त्याचे नातेवाईक घेऊन गेले होते.

संचारबंदी आणि डोंगरांमधल्या या गावांमध्ये मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे घरातल्या स्त्रियांना काय घडलं, याची फारशी कल्पना नसेल, हे सतार्जन यांना माहिती होतं.

ते इदार्जनच्या पत्नीला भेटले तेव्हा तिने तिला कळालेली माहिती सांगितली. आपल्या पतीला सुरक्षा दलाचे जवान घेऊन गेले आणि तिचा मोठा मुलगा बेपत्ता असल्याचं तिने सांगितलं.

सतार्जन सांगत होते, "तिला सांगावं की सांगू नये, या द्विधा मनःस्थितीत मी होतो. त्यानंतर मी विचार केला की माझा भाऊ आणि त्याची इतर मुलं घरी परतली की त्यानंतर तिचा मोठा मुलगा आता या जगात नसल्याची बातमी तिला देणं थोडं सोपं होईल. माझा विश्वास होता की अधिकारी त्यांना सोडतील."

त्यामुळे त्यांनी तिला सांगितलं की तिची मुलं दूर पाकिस्तानच्या दक्षिण भागात असलेल्या कराची शहरात पळून गेली आहेत आणि तिच्या पतीलाही लवकरच सोडतील.

26 एप्रिल 2015 रोजी ते सर्वांना घेऊन रमाकला गेले. मात्र, तेव्हापासून आपला भाऊ आणि त्याची तीन मुलं कुठे आहेत, याची कसलीही माहिती सैन्याकडून मिळालेली नाही. आठवड्यांमागून आठवडे, महिन्यांमागून महिने आणि आता वर्षांमागून वर्षंही लोटली. मात्र, त्यांचा काहीच पत्ता नाही.

ही परिस्थिती ओढावलेले ते एकटे नाही. स्थानिक कार्यकर्ते सांगतात 2002 सालापासून सुरक्षा दलांनी ताब्यात घेतलेल्या आठ हजार लोकांचा काहीच पत्ता लागलेला नाहीय.

दरम्यान, सतार्जन यांच्या घरातल्या स्त्रिया आपण आपल्या गावी का जाऊ शकत नाही, असा प्रश्न त्यांना विचारताहेत.

सतार्जन सांगतात, "मी त्यांना सांगतो, सैन्यानं शाक्तोईमधलं आपलं घर पाडलंय. हे अर्धसत्य आहे. मात्र, खरं कारण हे आहे की आम्ही गावी परतलो तर शेजारी-पाजारी त्यांचं सांत्वन करण्यासाठी येतील आणि त्यांना सत्य काय आहे, ते कळेल."

'मी माझ्या सुनेला सांगू नाही शकत ती विधवा झालीये'

ते सांगतात, त्यांचा भाऊ आणि त्याची मुलं तुरुंगात आहे किंवा ती मेली आहेत, हे कळलं तरी बरं आहे. मात्र, त्यांचं काय झालं, हेच माहीत नसणं खूप वेदनादायी आहे.

ते म्हणतात, "मी माझ्या भावाच्या बायकोला त्यांची मुलं कुठे आहेत, आहेत की नाही, हे काहीच सांगू शकत नाही. मी माझ्या सूनेला हे सांगू शकत नाही की ती विधवा झालीय."

या भागात अनेकांच्या अशा व्यथा आहेत. पीटीएमचा आरोप आहे की आदिवासी भागातले शेकडो जण तुम्हाला अशा कहाण्या सांगू शकतील. मात्र, याची अधिकृत दखल कधीच घेतली गेली नाही.

हे युद्धाचे ते परिणाम आहेत जे लपवण्यासाठी पाकिस्तानने सर्व सीमा ओलांडल्या. गेली अनेक वर्षं अफगाण सीमेवर होणाऱ्या संघर्षाची माहिती दडवली जातेय.

पीटीएमने गेल्या वर्षी हा अडथळा दूर करत उघडपणे सांगायला सुरुवात केली तेव्हा या माहितीच्या मीडिया कव्हरेजवर अनेक प्रकारची बंधनं लादण्यात आली. मीडियातल्या ज्या लोकांनी ही बंधनं झुगारण्याचा प्रयत्न केला त्यांना धमकावण्यात आलं. त्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्यात आल्या.

सैन्यानं उघडपणे पीटीएमच्या राष्ट्रनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. इतकंच नाही तर त्यांच्यावर अफगाणिस्तान आणि भारताच्या गुप्तचर संस्थांशी संबंधित असल्याचे आरोप लावण्यात आले.

छळवणुकीच्या प्रकरणांचं दस्तावेजीकरण करणाऱ्या आणि सोशल मीडियावर मोहीम राबवणाऱ्या पीटीएमच्या काही कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं.

हे स्थानिक नागरिक गेली अनेक वर्षं सैन्याचे अत्याचार सहन करत आहेत. अखेर त्यांनी याविरोधात आवाज उठवला. मात्र, त्यानंतर त्यांना जी वागणूक मिळाली त्यावरून हे स्पष्ट होतं की जे गेली अनेक वर्षं संघर्षात भरडले गेले त्यांना आता न्यायासाठी लढा द्यावा लागतोय.

धादांत खोटी माहिती

या बातमीवर पाकिस्तानी लष्कराने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बीबीसीवर प्रकाशित झालेली बातमी धादांत खोटी असून पत्रकारितेच्या नियमांची पायमल्ली करणारी आहे. याबाबत आम्ही बीबीसीच्या संपर्कात आहोत, असं ट्वीट मेजर जनरल असिफ गफूर यांनी केलं आहे. गफूर पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते आहेत.

तसंच पाकिस्तानच्या मानवी हक्क मंत्री शिरिन मझारी यांनी एका जुन्या ट्वीटचा हवाला देत एक ट्वीट केलं आहे. पाकिस्तान टीव्हीच्या मुख्यालयात बसलो होतो. तेव्हा तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी भारत आणि पाकिस्तानच्या बाबतीत निष्पक्ष वार्तांकन करावं अशी विनंती केली. तेव्हा निष्पक्ष वार्तांकन हवं असेल तर जाहिराती द्या असा बीबीसीने दबाव आणल्याचा आरोप मझारी यांनी केला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)