कोरोना व्हायरस: लग्नाला वऱ्हाड जमलं पण वधूवर गायब

    • Author, येवेट टॅन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

लग्न हा वधूवरांसाठी कारकीर्दीतील संस्मरणीय क्षण. मात्र पाहुण्यांना आपल्यामुळे कोरोना व्हायरसची लागण होऊ नये यासाठी वधुवरांनी सोहळ्याला व्हर्च्युअल उपस्थित राहण्याचं ठरवलं.

जगभरातली कोरोना व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणं वाढत असल्याचा परिणाम एका लग्नावर झाला. आणि इथे चक्क एक रिसेप्शन वधू-वराशिवाय पार पडलं.

सिंगापूरमधलं जोसेफ यू आणि त्याची पत्नी कांग टिंग हे जोडपं लग्नाच्या काहीच दिवस आधी चीनहून परतलं होतं.

त्यांच्या लग्नाच्या स्वागत समारंभाला उपस्थित राहण्याबद्दल पाहुण्यांनी काळजी व्यक्त केल्यावर या जोडप्याने त्यातून वेगळा मार्ग काढला. त्यांनी स्वतःच्या लग्नाच्या रिसेप्शनला व्हीडिओ कॉन्फरन्सने हजेरी लावली.

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर

एका मोठ्या हॉटेलच्या हॉलमध्ये त्यांनी नातेवाईकांना बोलवलं आणि ते स्वतः त्याच हॉटेलच्या रूममध्ये थांबले.

या जोडप्याने व्हीडिओ कॉलवरून आपलं मनोगत मांडलं आणि लग्नाच्या हॉलमधल्या पाहुण्यांशी संवाद साधला.

कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये 760हून अधिक बळी गेले असून जवळपास चोवीस देशांमध्ये हा विषाणू पसरलेला आहे.

सिंगापूरमध्ये आतापर्यंत 28 जणांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. कोरोना व्हायरस जिथे सुरू झाला त्या चीनबाहेर जपान नंतर सिंगापूरमध्ये संसर्गाची आकडेवारी जास्त आहे.

'दुसरा पर्याय नाही'

मूळच्या हुनान प्रांतातल्या कांग आणि त्यांचे भावी पती यू हे जोडपं चिनी नववर्ष साजरं करण्यासाठी 24 जानेवारीला गेलं.

ज्या हुबेई प्रांतात कोरोना व्हायरसची सुरुवात झाली त्याच्या सीमेलाच लागून हुनान प्रांत आहे.

आपण हुनानमध्ये असताना अतिशय दुर्गम भागात असल्याने तिथे कोणतंही भीतीचं वातावरण नव्हतं, असं यू यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

30 जानेवारीला हे जोडपं सिंगापूरला परतलं. 2 फेब्रुवारीला सिंगापूरमधल्या एम हॉटेलमध्ये त्यांचं लग्न होणार होतं.

या जोडप्याने ऑक्टोबर महिन्यात चीनमध्ये लग्न केलं आणि लग्नासाठी चीनमध्ये येऊ न शकलेल्या मित्र परिवार आणि नातेवाईकांसाठीचं हे जोडपं पुन्हा लग्न करत होतं.

वर आणि वधू वेगवेगळ्या संस्कृतींचे असतील तर एशियन संस्कृतीमध्ये दोन वेळा लग्न लावलं जातं.

नातेवाईकांचा नकार

पण हे जोडपं नुकतंच चीनहून परतल्याचं समजल्याबरोबर अनेक पाहुण्यांनी चिंता व्यक्त केली.

"यातल्या काही जणांनी येत नसल्याचं कळवलं," यू सांगतात.

"आम्हाला हे लग्न पुढे ढकलायचं होतं, पण हॉटेल त्यासाठी तयार नव्हतं. सगळी तयारी झाली असल्याने असं करता येणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे ही मेजवानी करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता."

पाहुण्यांच्या मनातली भीती लक्षात घेत या मेजवानीला हजर न राहण्याचा निर्णय या जोडप्याने घेतला.

"आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या मेजवानीत सहभागी होणार असल्याचं पाहुण्यांना सांगितलं....काहींना तर धक्काच बसला. पण आम्ही तिथे हजर राहिलो असतो, तर वातावरण वेगळं झालं असतं. लोकांच्या मनात शंका राहिली असती." यू सांगतात.

"माझे आईवडील सुरुवातीला याबद्दल खूश नव्हते, पण नंतर ते राजी झाले."

'आई-वडिलांचासुद्धा सहभाग नाही'

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सध्या अनेक प्रवास मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत. यामुळेच कांग टिंग यांचे आईवडीलही या मेजवानीत सहभागी होऊ शकले नाहीत.

अखेरीस एकूण 190 पैकी 110 पाहुण्यांनी या मेजवानीला हजेरी लावली.

2 फेब्रुवारीच्या संध्याकाळी एम हॉटेलच्याच एका खोलीत राहत असलेल्या या जोडप्याने मेजवानीतल्या पाहुण्यांना व्हीडिओ कॉल केला.

"कार्यक्रमाला आल्याबद्दल आम्ही पाहुण्यांचे आभार मानले आणि त्यांना मेजवानीचा आस्वाद घ्यायला सांगितला," यू सांगतात.

हॉटेलने या जोडप्यासाठी त्यांच्या खोलीत शँपेन पाठवली. त्यांनी खोलीतूनच पाहुण्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आभार मानत शँपेन उडवत आनंद साजरा केला.

"आम्ही दुःखी नाही पण काहीसे नाराज आहोत," यू त्यांच्या लग्नाबद्दल सांगतात.

"पण आमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता, म्हणून खेद व्यक्त करण्यात अर्थ नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)