Corona Virus : संसर्गावर सध्या तरी इलाज नाही, बचावासाठी काय कराल?

चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 170 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेले 1700 नवीन रुग्णही समोर आले आहेत.

कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांचे हे नवीन आकडे समोर आल्यानंतर आता या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा 7711 (29 जानेवारीपर्यंत) इतका झाला आहे. संशयित रुग्णांची संख्या 12 हजार 167 असल्याचं सांगण्यात येत आहे.

हा व्हायरसची लागण इतर 16 देशातील लोकांनाही झाली आहे. या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जागतिक आरोग्यविषयक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे का, याचा आढावा घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं गुरूवारी (30 जानेवारी) बैठक बोलावली आहे.

"गेल्या काही दिवसांमध्ये या विषाणूचा संसर्ग ज्यापद्धतीनं होत आहे, ते चिंताजनक आहे," असं जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस एडहेनोम यांनी म्हटलं आहे. त्यांचा रोख हा जर्मनी, व्हिएतनाम आणि जपानमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले, त्याकडे होता.

"चीनच्या बाहेर या विषाणूचा संसर्ग तुलनेनं कमी असला तरी त्याचा धोका अधिक आहे," असंही त्यांचं म्हणणं आहे.

कोरोना व्हायरसने चीनमध्ये शेकडो लोक आजारी आहेत आणि अनेक लोकांचा जीव गेला आहे.

श्वासाचा त्रास वाढवणारा हा विषाणू सर्वप्रथम वुहान शहरात आढळला. वेगाने पसरणाऱ्या या रोगाची लक्षणं न्युमोनियासारखी आहेत.

चीन प्रशासनाने संसर्ग थांबवण्यासाठी रोगाची साथ पसरलेल्या काही शहरांना इतर भागांपासून वेगळं करण्यात आलं आहे.

सध्या चीनमध्ये नवीन वर्षांचा उत्साह आहे. मात्र बदललेल्या परिस्थितीमुळे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

1. बहुतांश प्रकरणं चीनमध्येच

चीनमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग शेकडो जणांना झाला आहे. देशाच्या मध्यभागी असणाऱ्या हुवेई प्रांताला या विषाणूचा सर्वांत जास्त फटका बसला आहे. येत्या काही दिवसांत या विषाणूचा संसर्ग वाढण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

चीन प्रशासनाने कोरोना व्हायरसचा प्रभाव रोखण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. हुवेई शहरात प्रवासावर निर्बंध घातले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालून जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

चीन सरकारने शांघायच्या फॉरबिडन सिटी आणि ग्रेट वॉल चायना आणि इतकंच काय तर काही बौद्ध मंदिरंही बंद केली आहेत. सध्या तेथील लोक चिनी नवीन वर्ष साजरे करत आहेत. तिथे आठवडाभर सुट्ट्या आहेत. लाखो लाख घरी जाण्याच्या तयारीत आहेत.

अशा वेळी निर्बंधांची यादी दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या जागतिक आरोग्य संघटनेने या संकटाला आंतरराष्ट्रीय आपत्तीचा दर्जा दिलेला नाही. त्यामुळे चीनच्या बाहेर कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची तुलनेने कमी प्रकरणं उजेडात आली आहेत.

2. हुवेई सर्वांत जास्त प्रभावित

हुवेई भागात कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. सध्या तिथे कोरोना संसर्गाची 500 हून अधिक प्रकरणं नोंदवली गेली आहेत. या भागातील दहा शहरातील कमीत कमी दोन कोटी लोक निर्बंधांमुळे प्रभावित झाले आहेत. वुहान शहर त्यापैकी एक आहेत. कोरोना व्हायरस सर्वप्रथम तिथेच आढळला होता.

वुहान हुवेई भागाची राजधानी आहे. कोरोना व्हायरसची सुरुवात शहरातल्या मासळी बाजारापासून सुरू झाली असं सांगण्यात येतं. तिथे लोक मासे आणि इतर सीफूड खरेदी करायला जातात. वुहानची लोकसंख्या एक कोटी दहा लाख आहे.

सरकारने हे शहर सील केलं आहे. विमान आणि रेल्वे सेवा बंद केल्या आहेत.

वुहान विद्यापीठातील एक विद्यार्थी चॉन्गखान पेपे बिफहोवजित याने बीबीसीशी बोलताना सांगितलं, "माझ्या विद्यापीठातील प्रत्येक विद्यार्थ्याची तापाची चाचणी होत आहे. सगळ्यांना मास्क दिले आहेत. विद्यापीठाचं रुग्णालय आणि अॅम्ब्युलन्स सेवा आहे."

सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या व्हीडिओत स्थानिक रुग्णालयात लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत.

वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशासन आता हजार खाटांचं एक नवीन रुग्णालय बांधत आहे. हुबेई इथलं शासकीय वृत्तपत्र चांग्जीआंग डेलीच्या मते हे रुग्णालय तीन फेब्रुवारीपर्यंत बांधून तयार होईल. रुग्णालयाचं बांधकाम वेगाने होण्यासाठी 35 खोदण्याच्या मशीन्स आणि 10 बुलडोजर लावले आहेत.

3. कोरोना व्हायरसचे रुग्ण

चीनच्या बाहेर कोरोना व्हायरसची प्रकरणं थायलंड व्हिएतनाम, तायवान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, नेपाळ, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्समध्ये समोर आली आहेत.

इतर देश संशयित रुग्णांची तपासणी करत आहेत. त्यात ब्रिटन आणि कॅनडासारख्या देशांचा समावेश आहे.

अनेक देशांनी तर प्रवाशांच्या तपासणीसाठी विमानतळावरच उपाययोजना केल्या आहेत. दुबई आणि अबू धाबी सारख्या मुख्य विमानतळावरही उपाययोजना केल्या जात आहेत.

तैवानने वुहानवरून येणाऱ्या नागरिकांवर बंदी घातली आहे. अमेरिकेने चीनमध्ये असलेल्या त्यांच्या नागरिकांना अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

4. कोरोना संसर्गाची लक्षणं

कोरोना व्हारसच्या संसर्गाची लक्षणं अगदी सामान्य आहेत. श्वास घेण्यात अडथळा, खोकला किंवा वाहतं नाक, ही मुख्य लक्षणं आहेत. मात्र कोरोना व्हायरसच्या काही प्रजाती अतिशय धोकादायक आहे. सार्स (Severe Acute Respiratory Syndrome) आणि MARS (Middle East Respiratory System) अशी या दोन प्रजातींची नावं आहेत.

सध्या ज्या व्हायरसची साथ पसरली आहे त्या व्हायरसला nCoV असं नाव दिलं आहे. कोरोना व्हायरसचा हा नवीन प्रकार आहे. आतापर्यंत तो मनुष्यप्राण्यात आढळला नव्हता.

कोरोना संसर्गाची जी प्रकरणं सध्या समोर आली आहेत त्यावरून असं लक्षात येतं की या आजाराची सुरुवात तापापासून होते.त्यानंतर त्याचं रुपांतर कोरड्या खोकल्यात होतं. आठवडाभरात अशीच स्थिती राहिली तर श्वासाचा त्रास सुरू होतो.

मात्र गंभीर प्रकरणात या संसर्गाचं रुपांतर न्युमोनिया किंवा सार्समध्ये होतं. किडनी निकामी होण्याची स्थिती निर्माण होते. इतकंच काय तर रुग्णाचा मृत्यूही ओढवू शकतो. कोरोनाचे बहुतांश रुग्ण वृद्ध आहेत. ज्यांना पार्किन्सन किंवा डायबिटीज आहे त्यांना या विषाणूची लागण होण्याची शक्यता जास्त असते.

लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसीनचे संचालक प्रा. पीटर पायोट सांगतात, "कोरोना व्हायरस सार्सपेक्षा कमी धोकादायक आहे ही त्यातल्या त्यात सुखद बाब आहे. गेल्या काही काळाच्या तुलनेत माहितीचं आदान प्रदान योग्य प्रकारे होत आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण अशा संकटांशी एकट्याने लढू शकत नाही."

या विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी काही विशेष उपाययोजना नाहीत. सध्या रोगांच्या लक्षणांनुसार डॉक्टर रुग्णांवर उपचार करत आहेत.

5. बचावासाठी काय खबरदारी घ्यावी?

कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने अगदी साध्या उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. हात स्वच्छ करणं, मास्क घालणे, आणि योग्य आहार या उपाययोजनांचा समावेश आहे.

ज्या लोकांना श्वसनाचे विकार आहेत, त्यांच्या जवळपास जाण्यापासून लोकांना मज्जाव करण्यात आला आहे. ज्यांना विषाणूंचा संसर्ग झाला आहे त्यांची भेट घेतल्यावर तातडीने हात धुणे, पाळीव किंवा रानटी प्राण्यापासून दूर राहण्याचाही सल्ला दिला आहे. कच्चं किंवा अर्धवट शिजलेले मांस खाण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या व्यक्तीस शिंक आली तर समोरच्या व्यक्तीची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उदा. नाकावर टिश्यू पेपर किंवा रुमाल धरणं, निरोगी व्यक्तींपासून दूर राहणं, नियमित स्वच्छता अशा उपाययोजनांचाही त्यात समावेश आहे.

जवळच्या किंवा कुटुंबातल्या व्यक्तींना या रोगाची लागण झाल्याची अनेक प्रकरणं समोर आल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. कारण कुटुंबातल्या एका व्यक्तीला लागण झाली की दुसरी व्यक्ती त्याची काळजी घेण्यास सुरुवात करतो. मात्र बाह्यजगाशी संपर्क आल्यावर किती प्रमाणात लागण होते याची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही.

6. जर एखाद्या व्यक्तीला लागण झाली तर...

मागे सार्सच्या प्रादुर्भावासारखाच हा प्रादुर्भाव आहे, असं चीन सरकारचं म्हणणं आहे. याचा अर्थ असा, की ज्या व्यक्तीला लागण झाल्याचं समजेल त्याला वेगळं ठेवलं जाईल.

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी आणि डॉक्टरांसाठीही जागतिक आरोग्य संघटनेने काही मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली आहेत. लागण झालेल्या रुग्णांची तातडीने तपासणी करायला हवी, त्यानंतर या रुग्णाला लघु, मध्यम आणि गंभीर अशी वर्गवारी करायचे आदेश दिले आहेत,

आरोग्य कर्मचाऱ्यांना या रोगाची लागण होऊ नये यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजना कराव्यात. मास्क घालावे, तसंच लागण झालेल्या रुग्णांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचाही सल्ला दिला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)