You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इराण विमान दुर्घटना: अमेरिकेला अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स द्यायला इराणचा नकार
युक्रेनचं 176 प्रवाशांना घेऊन जाणारं बोईंग-737 हे विमान बुधवारी (काल) इराणमध्ये कोसळलं. या विमान दुर्घटनेचा तपास आता सुरू आहे. मात्र, या विमानाचा ब्लॅक बॉक्स विमान बनवणाऱ्या बोईंग कंपनीला किंवा अमेरिकेला द्यायला इराणने नकार दिला आहे.
जागतिक हवाई नियमांतर्गत या दुर्घटनेच्या चौकशीचं नेतृत्त्व करण्याचा अधिकार इराणला आहे.
मात्र, अशा तपासामध्ये विमान बनवणारी कंपनी साहाजिक सहभागी होत असते. शिवाय ब्लॅक बॉक्सचं विश्लेषण करण्याचं तंत्रज्ञान जगातल्या मोजक्या देशांकडेच असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
अमेरिकेत बनवलेल्या बोईंग विमानाचा जगभरात कुठेही अपघात झाल्यास त्या चौकशीत अमेरिकेची नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड ही संस्था सहभागी होत असते. मात्र, त्यासाठी संबंधित देशाची परवानगी बंधनकारक असते.
इराणच्या मेहर या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार इराणच्या हवाई उड्डाण संघटनेचे प्रमुख अली अॅबेदझाहेद यांनी म्हटलं आहे, "आम्ही ब्लॅक बॉक्स उत्पादक किंवा अमेरिकेला देणार नाही."
"इराणची हवाई उड्डाण संघटनाच या विमान अपघाताचा तपास करेल. युक्रेन मात्र, यात सहभागी होऊ शकेल."
मात्र, ब्लॅक बॉक्सचं परीक्षण कोणत्या देशाकडून करण्यात येईल, हे इराण अजून स्पष्ट केलेलं नाही.
तपासात लागणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी आपण तयार असल्याचं बोईंग कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. तर कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनीही तांत्रिक सहाय्य करण्याची तयारी दाखवली आहे.
इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी कासीम सुलेमानी यांच्या हत्येनंतर अमेरिका आणि इराण यांच्यात संघर्ष पेटला आहे. या हत्येनंतर इराणने इराकमधल्या अमेरिकी सैन्याच्या दोन तळांवर हवाई हल्ले केले होते. मात्र, सुलेमानी यांची हत्या आणि विमान दुर्घटना यात काही संबंध असल्याचं अजूनतरी निष्पण्ण झालेलं नाही.
काय घडलं?
युक्रेन इंटनॅशनल एअरलाईन्सचं फ्लाईट क्रमांक PS752 हे विमान बुधवारी 176 प्रवाशांना घेऊन तेहरानच्या विमानतळावरून युक्रेनची राजधानी किव्हला जात असताना उड्डाणाच्या काही मिनिटातच कोसळलं. विमानात बहुतांश प्रवासी कॅनडा आणि इराणचे होते.
युक्रेनच्या तेहरानमधल्या दूतावासाने सुरुवातीला या अपघातचं कारण इंजिनात झालेला बिघाड असल्याचं म्हटलं होतं. मात्र, काहीवेळाने तपास आयोगाच्या अहवालानंतरच विमान दुर्घटनेचं नेमकं कारण सांगता येईल, असं म्हणत त्यांनी पत्रक माघारी घेतलं होतं.
विमानाने उड्डाण घेतलं तेव्हा व्हिझिबिलिटी (दृश्यमानता) चांगली होती आणि विमान चालक दलही अनुभवी होता.
कुठलाही अधिकृत अहवाल येत नाही तोवर या दुर्घटनेमागे घातपाताची शक्यता वर्तवू नये, असा इशारा युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी दिला आहे.
इराणने या दुर्घटनेमागे तांत्रिक बिघाड असल्याचं म्हटलं आहे. ही दुर्घटना म्हणजे दहशतवादी कारवाई नाही, असंही इराणकडून सांगण्यात आलं आहे.
विमानात कोण-कोण होतं?
विमानात 82 इराणी नागरिक, 63 कॅनेडियन नागरिक, चालक दलासह 11 युक्रेनचे नागरिक, 10 स्वीडनचे नागरिक, 4 अफगाणिस्तानचे नागरिक आणि ब्रिटन आणि जर्मनीचे प्रत्येकी 3-3 प्रवासी होते, अशी माहिती युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिली आहे. मृतांमध्ये 15 मुलांचा समावेश आहे.
मात्र, दुर्घटनाग्रस्त विमानात जर्मन नागरिक होते का, याविषयी खात्रीशीर माहिती आपल्याकडे नसल्याचं जर्मनी सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
इराणच्या एका अधिकाऱ्याने विमानात 147 इराणी नागरिक असल्याचं म्हटलं आहे. म्हणजेच प्रवाशांपैकी काही जणांकडे दुहेरी नागरिकत्व असावं, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
कुठे चूक झाली? -टॉम बरिज, बीबीसी वाहतूक प्रतिनिधी
युक्रेनच्या 737-800 या विमानाचा डेटा ऑनलाईन उपलब्ध आहे. या माहितीवरून असं लक्षात येतं की विमानाने तेहरानच्या धावपट्टीवरून टेक-ऑफ केल्यानंतर आकाशात झेपावताना त्यात कुठलीही असामान्य किंवा अनैसर्गिक हालचाल दिसली नाही. मात्र, विमान 8 हजार फूट उंचीवर गेल्यावर विमानाचा संपर्क अचानक तुटला.
इथेच विमानात काहीतरी गडबड झालेली दिसते. मात्र, विमान नेमकं का कोसळलं, याचे पुरावे सध्यातरी आपल्याकडे नाही.
एका माजी विमान अपघात तपास अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार इंजीन बिघाड झाला, असं म्हणणं थोडं घाईचं ठरेल. ही शक्यता फेटाळता येत नसली तरी बोईंग 737-800 यासारख्या विमानात इंजीन बिघाड झाला तरी विमान उडत राहील, अशी व्यवस्था असते.
शिवाय विमान जेव्हा कोसळलं तेव्हा ते आकाशात अपेक्षित उंची गाठत होतं. इंजिनात बिघाड झाला असता तर विमान खाली येतयं, असं ग्राफमध्ये दिसलं असतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)