You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इराकमधून सैन्य माघारी घेणार नाही, अमेरिकेने ठणकावलं
अमेरिका इराकमधून सैन्य माघार घेणार नाही, असं अमेरिकेच्या संरक्षण खात्याचे सचिव मार्क एस्पर यांनी स्पष्ट केलंय. अमेरिकेचे इराकमधील सैन्याचे प्रमुख विल्यम एच सिली यांच्या पत्रानंतर गोंधळ निर्माण झाला होता.
विल्यम एच सिली यांनी अब्दुल आमीर यांना हे पत्र पाठवलं होतं. अब्दुल आमीर हे इराकच्या लष्करातील वरिष्ठ अधिकारी आहेत.
अमेरिकेनं आपलं सैन्य माघारी बोलवावं, असं इराकच्या संसदेनं ठराव केल्यानंतर विल्य्म एच सिली यांनी एक पत्र पाठवलं होतं. त्यात म्हटलं होतं की, अमेरिका येत्या काही दिवसांत किंवा आठवड्यांमध्ये आपल्या सैनिकांचं स्थानांतर करू शकते.
"सर, इराक सरकार, संसद आणि पंतप्रधान यांच्या विनंतीनुसार CJTF-OIR आपल्या सैन्याचं येत्या काही दिवसांत किंवा आठवड्यांमध्ये स्थानांतर करेल," असं या पत्रात म्हटलं होतं.
मात्र, मार्क एस्पर यांनी स्पष्ट केलं की, इराकमधून सैन्य माघारी घेण्याचा कोणताही निर्णय झालेला नाहीय.
अमेरिकेनं बगदादमध्ये हवाई हल्ल्यात इराणचे कमांडर कासिम सुलेमानी यांना ठार केलं. त्यानंतर इराणनं अमेरिकेला बदला घेण्याचा इशारा दिला.
इराण आणि अमेरिकेत सुरु असलेल्या या तणावाची पार्श्वभूमी पत्रावरुन झालेल्या गोंधळाला आहे.
अमेरिकन संरक्षण खात्याकडून काय सांगण्यात आलं?
मार्क एस्पर यांनी वॉशिंग्टनमधील पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितलं की, "इराकमधीन सैन्य माघारी घेण्याचा कुठलाच निर्णय झालेला नाहीय. मला त्या पत्राबाबत काही माहित नाही. ते पत्र नेमकं कुठून आलं आणि त्यात काय आहे, याचा आम्ही शोध घेतोय."
यानंतर अमेरिकेच्या लष्करातील वरिष्ठ अधिकारी मार्क मिल्ली यांनीही म्हटलं की, ते पत्र चूक होती.
"ते पत्र केवळ मसुदा होता आणि तेही असंच लिहिलेलं. त्यावर स्वाक्षरी केलेली नव्हती, त्यामुळं ते प्रसिद्ध करायला नको होतं," असंही मार्क मिल्ली यांनी सांगितलं.
"ते पत्र हवाई हालचालींच्या समन्वयासाठी काही इराकी लष्करी अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं होतं. मात्र, ते एकाच्या हातून दुसऱ्या च्या हातात गेलं, नंतर तिसऱ्याच्या हातात गेलं आणि असा गोंधळ होत गेला," असंही त्यांनी सांगितलं.
मार्क मिल्ली यांनीही स्पष्ट केलं की, अमेरिका इराकमधून सैन्य माघारी घेणार नाहीय.
बीबीसीचे संरक्षणविषयक प्रतिनिधी जोनाथन बिल यांना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका सैन्याला संरक्षण देण्यासाठी ग्रीन झोनच्या बाहेर पडत आहे, मात्र याचा अर्थ असा नाही की, ते इराकमधून माघार घेत आहेत.
इराकमध्ये अमेरिकेचे 5000हून अधिक सैनिक
इराकमध्ये अमेरिकेचे 5000 हून अधिक सैनिक आहेत. कंबाईन्ड जॉईंट टास्क फोर्सचा (CJTF) ते भाग आहेत. CJTF द्वारे इराकी सैनिकांना प्रशिक्षण दिलं जातं.
आयसिसचा सामना करण्यासाठी अमेरिकेनं 2014 पासून इराकमध्ये सैन्य तैनात केले आहेत. त्यावेळी आयसिसनं सीरिया आणि इराकमधील मोठा भाग आपल्या वर्चस्वाखाली आणला होता.
इराकच्या संसदेनं इराणचे कमांडर कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर परदेशी सैन्यानं देश सोडावा असा ठराव रविवारी म्हणजे 5 जानेवारी रोजी एकमतानं मंजूर केला. मात्र, अमेरिकन सैन्यानं माघार घेतल्यास इराकवर कडक निर्बंध लादण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिलाय.
"इराकमध्ये आमचं महागडं हवाईतळ आहे. ते उभारण्यासाठी आम्ही लाखो डॉलर्स खर्च केलेत. एवढी परतफेड केल्याशिवाय आम्ही इराक सोडणार नाही," असं ट्रंप यांनी पत्रकारांना सांगितलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)