You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डोनाल्ड ट्रंप: इराणचे 52 तळ अमेरिकेच्या निशाण्यावर
इराकमधील अमेरिकन दूतावासाजवळ असलेल्या ग्रीन झोनवर रॉकेट हल्ला झाला असल्याचं इराकने सांगितलं. तसेच, इराणने जर सुलेमानी यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा विचार केला तर आम्ही त्यांना सोडणार नाहीत असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिला आहे.
इराणच्या कुड्स सेनेचे प्रमुख कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येनंतर आखातात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेला अमेरिकाविरोधी घोषणाबाजी झाली.
सुलेमानी यांच्या हत्येचा आम्ही बदला घेऊ असं इराणने म्हटलं. त्यांच्या या धमकीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी इराणला इशारा दिला आहे, 'जर तुम्ही काही हालचाल केली तर याद राखा गाठ आमच्याशी आहे.'
"इराणचे 52 तळ आमच्या निशाण्यावर आहेत. त्यांनी काही जरी हालचाल केली तर त्यांच्यावर जलद आणि भेदक हल्ला केला जाईल," असं ट्वीट डोनाल्ड ट्रंप यांनी केलं.
गेल्या काही वर्षांपासून इराण ही आमची डोकेदुखी बनल्याचं ट्रंप म्हणाले. अमेरिकेवर हल्ला करण्याचा विचार इराणने पुन्हा पुन्हा बोलून दाखवला आहे. "जर अमेरिकेच्या संपत्तीला अथवा अमेरिकन व्यक्तीला जर काही हानी झाली तर त्यांच्या 52 तळांवर आम्ही निशाणा लावलेला आहे ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी," असं ट्रंप म्हणाले.
इराकमध्ये रॉकेट हल्ला, सुलेमानींच्या हत्येनंतर आखातात तणाव
राजधानी बगदादसह इराकमधील अन्य काही ठिकाणी रॉकेट हल्ले झाल्याची माहिती इराकच्या लष्करानं दिली. हे रॉकेट हल्ले अमेरिकन दूतावासाजवळील ग्रीन झोन, बगदादजवळील जदरिया आणि अमेरिकन सुरक्षारक्षकांच्या बलाद एअरबेसवर झाले.
या रॉकेट हल्ल्यांमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं इराकच्या लष्करानं सांगितलं. इराणसमर्थक कट्टरतावाद्यांनी गेल्या काही आठवड्यांमध्ये असे हल्ले केले होते. मात्र, अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचे कमांडर कासिम सुलेमानी हे ठार झाल्यानंतर आखातातील तणावात वाढ झालीय.
कताइब हिजबुल्लाह संघटनेनं इराकच्या सैन्याला रविवारी अमेरिकन तळांपासून किमान एक हजार किलोमीटर मागे हटण्यास सांगितलं होतं.
इराक पोलिसांच्या माहितीनुसार, जदरियामध्ये मिसाईल हल्ल्यात पाच लोक जखमी झाले आहेत. हे वगळता इतर कुठेही नुकसान झालं नाहीय.
तर 'रॉयटर्स'नं इराकी सैन्याचा हवाला देत माहिती दिलीय की, हे रॉकेट ग्रीन झोनच्या जवळील जदरिया आणि अमेरिकनं सुरक्षारक्षकांच्या बलाद हवाईतळावर पडले. मात्र, यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
"सेलिब्रेशन स्केअर, जदरिया परिसर, सलाहुद्दीन प्रांताचं हवाईतळ यांना निशाणा करुन रॉकेटहल्ला करण्यात आला, ज्यात कुणाचाही मृत्यू झाला नाही. आणखी माहिती अजून यायची आहे," असंही रॉयटर्सनं म्हटलंय.
अमेरिकेच्या हल्ल्यात कासिम सुलेमानी ठार
इराणी कुड्स कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांना अमेरिकेनं इराकमधील बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई हल्ल्यात ठार केलं. सुलेमानी हे इराणच्या कुड्स सेनेचे प्रमुख होते.
कुड्स ही सेना इराणच्या 'इस्लामिक रिव्हॉल्युशन गार्ड कॉर्प्स' म्हणजेच IRGC चं विशेष पथक आहे.
याच हल्ल्यात कताइब हिजबुल्लाहचा कमांडर अबू महदी अल मुहांदिस हा देखील ठार झाल्याचं अमेरिकेने सांगितलं आहे.
कोण होते कासिम सुलेमानी?
इराणच्या कर्मन प्रांतात 11 मार्च 1957 रोजी कासिम सुलेमानी यांचा जन्म झाला होता. 80 च्या दशकात इराण इराकमध्ये युद्ध झालं होतं. या युद्धावेळी इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशन गार्ड्स कॉर्प्स' या सेनेनी महत्त्वपूर्ण बजावली होती. 1980 मध्ये ते या सेनेत सामील झाले.
1980 ते 1988 या काळात झालेल्या इराण-इराक युद्धावेळी सुलेमानी यांनी साराल्लाहच्या 41 व्या तुकडीचं नेतृत्व केलं होतं. इराणची पूर्वेची सीमा सांभाळण्याची जबाबदारी या तुकडीकडे होती.
इराकविरोधात झालेल्या अनेक कारवायांमध्ये जनरल सुलेमानी यांचा सहभाग होता. ऑपरेशन डॉन 8, कर्बाला 4 आणि कर्बाला 5 या ऑपरेशनमध्ये त्यांचा सहभाग होता. इतकंच नाही तर लेबनॉन, सीरिया आणि अफगाणिस्तानध्ये इराणने केलेल्या कारवाया या सुलेमानी मार्फत झाल्याचं बीबीसी मॉनिटरिंगने 'न्यूयॉर्कर'च्या हवाल्याने म्हटलं आहे.
मार्च 2019 मध्ये सुलेमानी यांना इराणने 'ऑर्डर ऑफ जोल्फाकार' हा सर्वोच्च वीर पुरस्कार दिला होता. 1979 नंतर हा पुरस्कार मिळालेले ते पहिले इराणी व्यक्ती होते. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनी हे सुलेमानी यांना 'लिव्हिंग मार्टिर' म्हणजे 'जीवंत हुतात्मा' असं म्हणत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)