कासीम सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेत इराकमध्ये अमेरिकेविरोधात घोषणा

इराणमधील कमांडर कासिम सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेला बगदादमध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यांचा देह आता इराणमध्ये पाठवण्यात येणार असून तिथं त्यांचं दफन होणार आहे. यावेळेस जमलेल्या लोकांनी अबू माहदी अल माहदी यांच्या मृत्यूमुळेही शोक व्यक्त केला.

अमेरिकेचा निषेध करत बगदादमध्ये सकाळी लवकर ही अंत्ययात्रा सुरु झाली. बगदादमधील सर्व रस्ते लोकांनी भरून गेले होते आणि लोकांच्या हातामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांचे फोटोही होते.

शनिवारी रात्री हे मृतदेह इराणला पाठवण्यात येतील आणि मध्य इराणमधील केर्मान या सुलेमानी यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार होतील असं सांगण्यात आलं आहे.

इराकमध्ये सुरु असलेल्या लोकशाहीवादी आंदोलनाला सुलेमानी यांनी हिंसक पद्धतीने मोडून काढलं होतं. त्यामुळे काही इराकींनी सुलेमानी यांच्या निधनाबद्दल आनंदही व्यक्त केला आहे.

बीबीसीच्या मुख्य आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी लीस डॉसेट यांनी या घटनेचं विश्लेषण करताना सांगितलं, "इराण नक्की प्रतिकार करेल मात्र तो कधी कसा आणि कोठे प्रतिक्रिया देईल हे सांगता येत नाही. सध्या इराण कासीम यांची राष्ट्रीय हिरो म्हणून प्रतिमा तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. इराकमध्ये जिथं त्यांचा मृत्यू झाला आणि जिथं त्यांचा प्रभाव होता तिथून त्यांची अंत्ययात्रा सुरु केली आणि आता इराणमधील एक पवित्र शहर माशादमध्ये त्याचां मृतदेह नेण्यात येईल आणि नंतर केर्मानला नेण्यात येईल. तेहरानमध्ये अयातुल्ला खोमेनी प्रार्थनेत सहभागी होतील म्हणजेच एक वेगळा संदेश यातून देण्याचा प्रयत्न होत आहे."

सुलेमानी कोण होते?

सुलेमानी हे इराणच्या कुड्स सेनेचे प्रमुख होते.

कुड्स ही सेना इराणच्या 'इस्लामिक रिव्हॉल्युशन गार्ड कॉर्प्स' म्हणजेच IRGC चं विशेष पथक आहे.

याच हल्ल्यात कताइब हिजबुल्लाहचा कमांडर अबू महदी अल मुहांदिस हा देखील ठार झाल्याचं अमेरिकेने सांगितलं आहे.

कुड्स सेना काय आहे?

कुड्स सेना ही इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सची एक शाखा आहे. या सेनेच्या माध्यमातून इराणबाहेरील कारवाया केल्या जातात.

या सेनेचे प्रमुख कासिम सुलेमानी हे इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला अल खोमेनी यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात. शिवाय, भविष्यातील सर्वोच्च नेते म्हणूनही सुलेमानींकडे पाहिलं जात होतं.

2003 मध्ये अमेरिकेच्या नेतृत्त्वातील सैन्याकडून इराकमध्ये सद्दाम हुसैन यांची सत्ता संपवण्यात आली. त्यानंतर मध्य-पूर्व आशियात कुड्स सेनेनं आपल्या मोहिमा वेगवान केल्या.

इराणचं समर्थन करणाऱ्या इतर देशांच्या सरकारविरोधी गटांना कुड्स सेनेनं शस्त्र पुरवली, आर्थिक मदत केली आणि प्रशिक्षण देण्यासही सुरुवात केली.

2019 च्या एप्रिल महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी इराण रिव्हॉल्युशनरी गार्डसह कुड्स सेनेला 'परदेशी दहशतवादी संघटना' म्हणून घोषित केलं.

इतर देशाच्या सरकारशी संबंधित संघटेनेला 'कट्टरतावादी' ठरवण्याचं अमेरिकेनं यानिमित्तानं पहिल्यांदाच पाऊल उचललं होतं.

अमेरिकेच्या या निर्णयानंतर इराणनं इशाऱ्यातून म्हटलं होतं की, आखातात अमेरिकन सैन्य म्हणजे दहशतवादी गटांपेक्षा कमी नाही.

2001 ते 2006 दरम्यान ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री जॅक स्ट्रॉ यांनी अनेकदा इराणचा दौरा केला. त्यांच्या मतानुसार, जनरल कासिम सुलेमानी यांची भूमिका एखाद्या सैन्य कमांडरपेक्षाही अधिक आहे.

IRGC सेनेसोबतच सुलेमानी मित्र देशांसाठी इराणची परराष्ट्रनिती चालवत असल्याचंही जॅक स्ट्रॉ यांचं म्हणणं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)