डोनाल्ड ट्रंप यांची इराणला धमकी : 'मोठी किंमत मोजावी लागेल'

इराकमधील अमेरिकेच्या दूतावासावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी इराणला जबाबदार ठरवल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी इराण सरकारला धमकी दिली आहे.

डोनाल्ड ट्रंप यांनी ट्वीट करत म्हटलं की, "इराकस्थित अमेरिकेच्या दूतावासाची सुरक्षाव्यवस्था पूर्वपदावर आली आहे. आमचे अनेक सैनिक वेळेवर पोहोचले. मी या संपूर्ण प्रकरणी इराकचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांचे आभार मानतो, कारण त्यांची अतिवेगानं आमच्या निवेदनाची दखल घेतली."

"आमच्या जीविताचं आणि मालमत्तेचं कोणत्याही प्रकारे नुकसान झाल्यास त्यासाठी इराणला जबाबदार ठरवण्यात येईल. त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल. आणि हा काही इशारा वगैरे नाही, तर ही एक धमकी आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा."

डोनाल्ड ट्रंप यांच्या ट्वीटनंतर अमेरिकेचे संरक्षण सचिव मार्क एस्पर यांनी मध्य-पूर्व क्षेत्रात तत्काळ 750 जवानांची तुकडी पाठवण्याचं जाहीर केलं आहे.

धमकीचं कारण काय?

नुकताच अमेरिकेनं इराकस्थित इराणचा पाठिंबा असलेल्या कट्टरपंथी समुहांच्या ठिकाणांवर हल्ला केला होता.

या हल्ल्याच्या विरोधात इराकची राजधानी असलेल्या बगदादस्थित अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला करण्यात आला. आंदोलकांना पांगवण्यासाठी अमेरिकी सैन्यानं अश्रूधुराचा वापर केला.

आंदोलकांनी दूतावासाबाहेरील एका सुरक्षा चौकीला आग लावली. या हल्ल्यामागे इराण असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रंप यांनी केला आहे.

रविवारी अमेरिकनं पश्चिम इराक आणि पूर्व सीरियातल्या कताइब हिज्बुल्ला या कट्टरवादी संघटनेच्या तळांवर हल्ले केले होते. त्यात 25 जणांचा मृत्यू झाला होता.

शुक्रवारी इराकमधील किर्कुक या आमच्या लष्करी तळांवर हल्ले झाले होते, त्यामुळे आम्ही ही कारवाई केली, असं अमेरिकेनं म्हटलं होतं.

इराकचे पंतप्रधान अदेल अब्दुल महदी यांनी म्हटलंय, अमेरिकेच्या दूतावासावर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाल्यास आणि परदेशी प्रतिनिधींचं नुकसान झाल्यास हल्लेखोरांना कायद्यानुसार शिक्षा दिली जाईल.

इराणनं याविषयी कोणतीही प्रक्रिया दिलेली नाही.

न्यूज वेबसाईट अल-सुमारियानं म्हटलंय की, जोपर्यंत अमेरिकेचा दूतावास हटवण्यात येणार नाही, तोपर्यंत दूतावासाबाहेर आंदोलन करण्याची घोषणा कताइब हिज्बुल्ला संघटनेनं केली आहे.

हिज्बुल्ला संघटना इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले करत आहे, असं अमेरिकेचं म्हणणं आहे. 2009मध्ये अमेरिकेनं या संघटनेला कट्टरवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे.

इराकची शांतता आणि स्थैर्यासाठी ही संघटना धोकादायक आहे, असं अमेरिकेचं म्हणणं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)