अमेरिका-इराणमध्ये टँकर हल्ल्यावरून युद्धाची ठिणगी पडणार का?

    • Author, जोनाथन मार्कस
    • Role, बीबीसी न्यूज

आखातातला तणाव वाढतोय. अमेरिकेने नुकताच एक व्हिडिओ प्रसिद्ध करत दावा केला आहे, की गेल्या गुरुवारी ओमानच्या आखातात तेलाच्या दोन टँकर्सवर झालेला हल्ला इराणने केला होता.

या घटनेबद्दल अजून आणखीन कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. पण हे पुरावे सारं काही स्पष्ट सांगत असल्याचं ट्रंप प्रशासनाचं म्हणणं आहे.

मग आता पुढे काय होणार, असा प्रश्न उभा रहातो. अमेरिका याचं उत्तर कसं देणार? प्रकरण गंभीर होत चाललंय.

अमेरिकेच्या संरक्षण खात्याचं मुख्यालय पेंटागॉनने प्रसिद्ध केलेल्या या अंधुक व्हिडिओमध्ये एक लहान इराणी जहाज दिसतंय. 13 जून रोजी ज्या तेलाच्या दोन टँकर्सवर हल्ला झाला, त्यातल्या एकाच्या बाहेरच्या बाजूला असलेली, स्फोट न झालेली स्फोटकं बाहेर काढताना या इराणी जहाजाचा क्रू दिसत असल्याचा दावा करण्यात येतोय.

या हल्ल्यांमागे इराणचाच हात असल्याचा थेट आरोप अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पाँपेओ यांनी नुकताच केला होता. ते म्हणाले, "मिळालेली गुप्त माहिती, या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली शस्त्रं, असा हल्ला करण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्यं, जहाजांवर इराणकडून नुकतेच करण्यात आलेले अशाच प्रकारचे हल्ले, या सगळ्यांवरून हा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. याशिवाय हेही सत्य आहे की या भागामध्ये सक्रिय असणाऱ्या कोणत्याही दुसऱ्या गटाकडे अशा प्रकारचा हल्ला करण्यासाठी लागणारी सामुग्री किंवा कौशल्यं नाहीत."

आपल्याला यामध्ये मुद्दाम अडकवण्यात येत असल्याचंही म्हणत इराणने हे आरोप फेटाळले आहेत. "इराण आणि इतर देशांमधील संबंध बिघडवण्याचा कोणीतरी प्रयत्न करतंय," असं इराणच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.

याआधी संयुक्त अरब अमिरातीमध्येही जहाजावर चार वेळा हल्ले झाले होते, तेव्हाही यात आपला हात नसल्याचं इराणने म्हटलं होतं.

आता या दोन्हींसाठी इराणच जबाबदार असल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. म्हणूनच अशी भीती व्यक्त केली जातेय की ही आतापर्यंत सुरू असलेल्या या शाब्दिक लढाईचं रूपांतर युद्धात तर होणार नाही ना!

व्हीडिओवरून शंका

वरवर पाहता अमेरिकन नौदलाने प्रसिद्ध केलेला व्हीडिओ हा ठोस पुरावा असल्याचं वाटतं. पण यातून अनेक प्रश्न उभे राहतात.

हा व्हिडिओ पहिल्या स्फोटानंतर इराणी क्रू पुरावे मिटवण्याचा प्रयत्न करत असताना चित्रित करण्यात आल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. पण या हल्ल्याविषयीची अजून बरीच माहिती समोर आलेली नाही. उदाहरणार्थ, या तेलाच्या टँकरला स्फोटकं नेमकी कधी बांधण्यात आली?

या भागामध्ये अमेरिकन नौदलाचं बऱ्यापैकी अस्तित्त्व असल्याने या भागामधली गुप्त माहिती मिळवण्यासाठीची त्यांची क्षमताही चांगली आहे. याबाबत नक्कीच आणखी माहिती समोर येईल आणि दोन्ही जहाजांच्या फॉरेन्सिक तपासणीतूनही अनेक पुरावे मिळतील.

पण अमेरिकेचे इराणबाबतचे आरोप हे फक्त या हल्ल्यांपुरतेच नाहीत.

पाँपेओ यांनी म्हटलं होतं की "कोणतंही कारण नसताना करण्यात आलेले हे हल्ले आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे आहेत. हे जलमार्गांवर हल्ला करण्यासारखं आहे. इराणकडून एकप्रकारे तणाव वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हे खपवून घेतलं जाणार नाही."

हे आरोप अतिशय गंभीर आहेत आणि यातून सवाल असा उभा राहतो, की याबाबत अमेरिका नेमकं काय करण्याच्या तयारीत आहे?

मुत्सद्दी कारवाई हा एक पर्याय असू शकतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर इराणवर टीका करून, त्यांच्यावर आर्थिक निर्बंध लादून इराणला एकटं पाडणं, हा एक पर्याय अमेरिकेपुढे आहे.

पण एक मतप्रवाह असाही आहे की सध्या लादलेल्या निर्बंधांमुळेच ही परिस्थिती आलेली आहे. इराणवरचा दबाव वाढतोय. कदाचित हा दबाव इतका वाढलाय की स्वतःला स्वायत्त नौदल म्हणवणाऱ्या 'रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प'ने याचं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला असावा.

कठीण काळ

मग आता होणार काय? अमेरिका कोणत्या प्रकारच्या लष्करी कारवाईने प्रत्युत्तर देणार? अमेरिकेचे आखातातील सहकारी देश आणि इतर सहकारी देश याविषयी काय भूमिका घेणार? आणि सैनिकी कारवाईचा परिणाम काय होणार?

हल्ला करण्यात आल्यास इराण एक प्रकारचं हायब्रिड युद्ध सुरू करण्याची शक्यता आहे. म्हणजे थेट त्यांच्या सैन्यातर्फे आणि त्यांच्यासोबतच्या स्वायत्त गटांतर्फेही हल्ले करण्यात येतील. लहान लहान हल्ल्यांसोबतच जहाजांवर आणि इतर ठिकाणीही मोठे हल्ले करण्यात येऊ शकतात.

यामुळे तेलाच्या किंमती आणि विम्यासाठीच्या प्रिमियममध्ये वाढ होईल. आणि कदाचित यापुढेही जाऊ प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्यात येईल.

यापैकी काहीही घडू शकतं. म्हणूनच इराण किंवा अमेरिकेपैकी कुणालाच युद्ध व्हावं, असं पूर्णपणे वाटत नाही.

अमेरिकेचं सैन्य शक्तिशाली आहे, पण आकाश आणि समुद्रमार्गे इराणसोबत लढणं त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतं.

आणि आतापर्यंत असं लक्षात आलंय की राष्ट्राध्यक्ष ट्रंप इतर देशांशी वाद तर घालतात पण त्यांच्या विरोधात कोणतीही ठोस लष्करी कारवाई करण्याचं टाळतात. अमेरिकेने सीरियामध्ये केलेले हवाई हल्लेही प्रतीकात्मकच होते.

पण आपल्याला याचं प्रत्युत्तर देण्यासाठी कारवाई करावी लागेल, असं इराणने एकूणच परिस्थितीचा चुकीचा अंदाज लावत अमेरिकन सरकारला ठणकावलं आहे. म्हणूनच अशी भीती व्यक्त करण्यात येतेय, की ठरवून युद्ध झालं नाही तरी चुकीमुळे किंवा अपघातामुळे होऊ शकतं.

इराण आणि अमेरिका एकमेकांना इशारे करत असले तरी त्यांना एकमेकांचं म्हणणं स्पष्टपणे कळत नाहीये. इराणला असं वाटू शकतं की अमेरिका या भागात प्रभाव वाढवून त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करतंय, आणि ते हे स्वीकारायला तयार नाहीत.

पण असंही होऊ शकतं की इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स या इशाऱ्यांचा चुकीचा अर्थ लावत आहे. अमेरिकेला वाटतं त्यापेक्षा किती तरी जास्त पटीने आपल्याला आखातामध्ये वावरण्याचं स्वातंत्र्य असल्याचं त्यांना वाटू शकतं.

थोडक्यात, त्यांना असं वाटू शकतं की त्यांचं सामर्थ्य जोखलं जातंय, म्हणून ते असं काहीतरी करतायत ज्यासाठी अमेरिका आणि त्यांचे मित्रराष्ट्र शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाहीत.

फ्रान्स आणि जर्मनीसारख्या अमेरिकेच्या सोबती देशांनी सावध राहण्याचा सल्ला दिलेला आहे. ब्रिटनचा अमेरिकेवर विश्वास असला तरी ते या सगळ्याकडे पाहण्याचा आपला स्वतंत्र दृष्टिकोन असल्याचं ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे.

"आम्ही या सगळ्याचा स्वतंत्र लेखाजोखा घेऊ. यासाठी आमचे स्वतःचे काही मार्ग आहेत," असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.

कोणतीही कारवाई करण्याआधी ट्रंप यांनाही नीट विचार करावा लागेल. त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेकांनी त्यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. यामध्ये रिपब्लिकन परराष्ट्र नीती तज्ज्ञही होते.

परराष्ट्र धोरणांबाबत ट्रंप यांची मतं पाहता एक दिवस ते संकट ओढवणार असल्याचं त्यांचं मत होतं. एका क्षणी असं वाटलं होतं की उत्तर कोरिया आणि सीरियासोबत युद्ध होणार, पण ते संकट टळलं.

पण यावेळी व्हाईट हाऊससमोर एक मोठं संकट उभं ठाकलंय. त्यांचं प्रत्येक पाऊल महत्त्वाचं असणार आहे. फक्त मध्यपूर्वच नाही तर यामुळे अमेरिकेच्या आखातातील मित्रराष्ट्रांसोबतच्या नातेसंबंधांवरही याचा मोठा परिणाम होईल.

पण अमेरिकेचे हे राष्ट्रपती आणि त्यांची ही वेगळी धोरणं नेमकी हाताळायची कशी, हेच यापैकी अनेकांच्या लक्षात येत नाहीये.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)