You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिका-इराण तणावः आखातामध्ये युद्धनौका आणि क्षेपणास्त्र तैनात
इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये तणाव वाढीस लागला आहे. अमेरिकेने मध्यपूर्वेत पॅट्रियट क्षेपणास्त्र प्रणालीची रवानगी करायला सुरुवात केली आहे.
अमेरिकेची युद्धनौका यूएसएस आर्लिंगट्नला आखातामध्ये अब्राहम लिंकन लढाऊ समूहात समाविष्ट करण्यात येत आहे. त्यामध्ये तैनात असलेली विमाने जमीन आणि महासागरातील शत्रूला टिपून मारू शकतात.
कतारच्या एका लष्करी तळावर बॉम्ब फेकणारी US B-52 विमाने पाठवल्याचेही अमेरिकेच्या पेंटॅगॉन लष्करी विभागाने स्पष्ट केले आहे.
मध्यपूर्वेत असलेल्या अमेरिकन सैन्याला इराणपासून होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून वाचवण्यासाठी ही पावलं उचलंली आहेत असं पेंटॅगाननं सांगितलं आहे. पण हा कोणता धोका आहे यावर स्पष्टपणे काहीच सांगितलेलं नाही.
इराणने या सर्व घडामोडीला निरर्थक म्हटले आहे. इराणने या तैनातीला 'मनोवैज्ञानिक युद्ध' म्हटलं आहे. केवळ आपल्याला घाबरवण्याचा यामागे उद्देश आहे असं इराणने म्हटलं आहे.
इराण आणि अमेरिका यांच्यातील संबंध कसे आहेत?
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पेओ यांनी आपल्या युरोप दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं, "इराणच्या चिथावणीखोर कृतीकडे आमचं लक्ष आहे, आमच्यावर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्यासाठी आम्ही त्यांना जबाबदार ठरवू."
पण ही चिथावणीखोर पावलं कोणती हे मात्र पोम्पेओ यांनी सांगितलं नाही.
इराणची अर्थव्यवस्था कोसळून पडावी यासाठी अमेरिका त्या देशाचं तेल खरेदी करू नका असा दबाव अमेरिका आपल्या सहकारी देशांवर आणत आहे. तर आपण कोणत्याही स्थितीमध्ये झुकणार नाही असं इराणनं स्पष्ट केलं आहे.
इराणसह सहा देशांबरोबर झालेल्या अणुकरारामधून अमेरिका बाहेर पडला होता.
इराणबरोबर 2005 साली झालेल्या या करारावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप नाराज होते असं सांगितलं जातं. हा करार बराक ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या काळात झाला होता.
येमेन आणि सीरियामधील युद्धातील इराणच्या भूमिकेवरही अमेरिकेने टीका केली होती.
इराण सरकारला नवा करार करण्यास भाग पाडू आणि त्या करारामध्ये केवळ अणुकार्यक्रमच नाही तर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाचाही समावेश होईल अशी ट्रंप प्रशासनाची आशा आहे.
अमेरिकेने लादलेले निर्बंध बेकायदेशीर आहेत असं इराणनं म्हटलं आहे.
अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांना उत्तर देण्यासाठी आपल्याकडे विविध मार्ग आहेत असं इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जवाद जरीफ यांनी म्हटल्याचं इराणी माध्यमांत प्रसिद्ध झालं आहे.
जवाद जरीफ म्हणाले, "इराण अनेक पर्यायांचा विचार करत आहे. अणू प्रसारविरोधी करारातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यात समाविष्ट आहे. इराणला आपलं तेल विकण्यापासून रोखलं गेलं तर त्याचे परिणाम वाईट होतील."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)