जनरल कासिम सुलेमानी कोण होते ज्यांचा अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला

इराणी कुड्स कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांना अमेरिकेनं इराकमधील बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई हल्ल्यात ठार केलं. सुलेमानी हे इराणच्या कुड्स सेनेचे प्रमुख होते.

कुड्स ही सेना इराणच्या 'इस्लामिक रिव्हॉल्युशन गार्ड कॉर्प्स' म्हणजेच IRGC चं विशेष पथक आहे.

याच हल्ल्यात कताइब हिजबुल्लाहचा कमांडर अबू महदी अल मुहांदिस हा देखील ठार झाल्याचं अमेरिकेने सांगितलं आहे.

"परदेशात राहणाऱ्या अमेरिकन सैनिकांच्या सुरक्षेसाठी कासिम सुलेमानी यांना ठार मारण्याचं पाऊल उचललं गेलं. अमेरिकेच्या अध्यक्षांनीच तसा आदेश दिला होता. सुलेमानी यांना अमेरिकेनं दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं," अशी माहिती अमेरिकेच्या संरक्षण खात्यानं दिली.

अमेरिकनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय की, "27 डिसेंबर रोजी इराकस्थित अमेरिकन सैनिकांवर हल्ला झाला होता. या हल्ल्यासह गेल्या अनेक महिन्यांपासून इराकमधील अमेरिकन सैन्याच्या चौक्यांवरील हल्ल्यांमध्ये सुलेमानी यांचा हात होता. गेल्या आठवड्यात अमेरिकन दूतावासावर झालेल्या हल्ल्यालाही सुलेमानी यांनीच परवानगी दिली होती."

तसंच, "अमेरिकेनं केलेला एअरस्ट्राईक भविष्यातील इराणी हल्ल्यांना रोखण्याच्या उद्देशानं केला गेलाय. अमेरिका कुठंही असली तरी, आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठीची कारवाई सुरुच ठेवेल," असंही या पत्रात अमेरिकनं म्हटलंय.

जनरल कासिम सुलेमानी यांच्यावरील कारवाई मध्य-पूर्व आशियातील अत्यंत मोठी घटना मानली जातेय.

इराण आणि इराण समर्थक शक्ती आता इस्रायल आणि अमेरिकेविरोधात उत्तरादाखल जोरादर पावलं उचलण्याची शक्यताह वर्तवली जातेय.

कुड्स सेना काय आहे?

कुड्स सेना ही इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सची एक शाखा आहे. या सेनेच्या माध्यमातून इराणबाहेरील कारवाया केल्या जातात.

या सेनेचे प्रमुख कासिम सुलेमानी हे इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला अल खोमेनी यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात. शिवाय, भविष्यातील सर्वोच्च नेते म्हणूनही सुलेमानींकडे पाहिलं जात होतं.

2003 मध्ये अमेरिकेच्या नेतृत्त्वातील सैन्याकडून इराकमध्ये सद्दाम हुसैनची सत्ता संपवण्यात आली. त्यानंतर मध्य-पूर्व आशियात कुड्स सेनानं आपल्या मोहिमा वेगवान केल्या.

इराणचं समर्थन करणाऱ्या इतर देशांच्या सरकारविरोधी गटांना कुड्स सेनेनं शस्त्र पुरवली, आर्थिक मदत केली आणि प्रशिक्षण देण्यासही सुरुवात केली.

2019 च्या एप्रिल महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी इराण रिव्हॉल्युशनरी गार्डसह कुर्द सेनेला 'परदेशी दहशतवादी संघटना' म्हणून घोषित केलं.

अमेरिकेतर देशाच्या सरकारशी संबंधित संघटेनेला 'कट्टरतावादी' ठरवण्याचं अमेरिकेनं यानिमित्तानं पहिल्यांदाच पाऊल उचललं होतं.

अमेरिकेच्या या निर्णयानंतर इराणनं इशाऱ्यातून म्हटलं होतं की, आखातात अमेरिकन सैन्य म्हणजे दहशतवादी गटांपेक्षा कमी नाहीय.

2001 ते 2006 दरम्यान ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री जॅक स्ट्रॉ यांनी अनेकदा इराणचा दौरा केला. त्यांच्या मतानुसार, जनरल कासिम सुलेमानी यांची भूमिका एखाद्या सैन्य कमांडरपेक्षाही अधिक आहे.

IRGC सेनेसोबतच सुलेमानी मित्र देशांसाठी इराणची परराष्ट्रनिती चालवत असल्याचंही जॅक स्ट्रॉ यांचं म्हणणं होतं.

कताइब हिजबुल्लाह संघटना अमेरिकेच्या निशाण्यावर का?

कताइब हिजबुल्लाह संघटना सातत्यानं इराकस्थित आमच्या लष्करी चौक्यांवर हल्ला करते, असा दावा अमेरिका करत आलीय.

2009 पासूनच अमेरिकेनं कताइब हिजबुल्लाहला 'दहशतवादी संघटना' म्हणून घोषित केलंय. शिवाय, अबू महदी अल मुहांदिसला 'आंतरराष्ट्रीय दहशतवादी' महणून घोषित केलं होतं.

इराकच्या स्थिरतेला आणि शांततेला कताइब हिजबुल्लाह संघटना घातक असल्याचा दावा अमेरिकेचा आहे.

"कताइब हिजबुल्लाहचा संबंध इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशन गार्ड कॉर्प्स म्हणजेच IRGC च्या आंतरराष्ट्रीय कारवाया सांभाळणाऱ्या कुर्द सेनेशी आहे. या संघटनेला इराणकडून विविध प्रकारची मदत मिळते," असं अमेरिकेच्या संरक्षण खात्याचं म्हणणं आहे.

कोण होते कासिम सुलेमानी?

इराणच्या कर्मन प्रांतात 11 मार्च 1957 रोजी कासिम सुलेमानी यांचा जन्म झाला होता. 80 च्या दशकात इराण इराकमध्ये युद्ध झालं होतं. या युद्धावेळी इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशन गार्ड्स कॉर्प्स' या सेनेनी महत्त्वपूर्ण बजावली होती. 1980 मध्ये ते या सेनेत सामील झाले.

1980 ते 1988 या काळात झालेल्या इराण-इराक युद्धावेळी सुलेमानी यांनी साराल्लाहच्या 41 व्या तुकडीचं नेतृत्व केलं होतं. इराणची पूर्वेची सीमा सांभाळण्याची जबाबदारी या तुकडीकडे होती.

इराकविरोधात झालेल्या अनेक कारवायांमध्ये जनरल सुलेमानी यांचा सहभाग होता. ऑपरेशन डॉन 8, कर्बाला 4 आणि कर्बाला 5 या ऑपरेशनमध्ये त्यांचा सहभाग होता. इतकंच नाही तर लेबनॉन, सीरिया आणि अफगाणिस्तानध्ये इराणने केलेल्या कारवाया या सुलेमानी मार्फत झाल्याचं बीबीसी मॉनिटरिंगने 'न्यूयॉर्कर'च्या हवाल्याने म्हटलं आहे.

मार्च 2019 मध्ये सुलेमानी यांना इराणने 'ऑर्डर ऑफ जोल्फाकार' हा सर्वोच्च वीर पुरस्कार दिला होता. 1979 नंतर हा पुरस्कार मिळालेले ते पहिले इराणी व्यक्ती होते. इराणचे शाह अयातुल्लाह खोमेनी हे सुलेमानी यांना 'लिव्हिंग मार्टिर' म्हणजे 'जीवंत हुतात्मा' असं म्हणत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)