You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इराण-अमेरिकेच्या संघर्षात भारताची भूमिका काय राहील?
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
जगात तिसरं महायुद्ध होणार का अशी चर्चा, ट्विटर, फेसबुकवर सुरू झाली आहे. आणि त्याचं कारण आहे इराण आणि अमेरिका या दोन देशांतला वाढता तणाव. या संघर्षाचा भारतावर काय परिणाम होईल याचा घेतलेला आढावा.
इराण- अमेरिका संघर्ष पुन्हा कशामुळे पेटला?
तुम्ही जनरल कासिम सुलेमानी यांच्याविषयी ऐकलं असेल. गेल्या आठवड्यात, 3 जानेवारीला अमेरिकेनं बगदादमध्ये ड्रोन हल्ला करून सुलेमानी यांची हत्या केली होती आणि तेव्हापासूनच दोन देशांमधलं तणाव शिगेला पोहोचला. हे सुलेमानी कोण होते?
तर इराणच्या कुड्स फोर्स या एका समांतर आणि प्रभावशाली सैन्यदलाचे ते प्रमुख होते. अनेक तज्ज्ञांच्या मते इराणचे सर्वोच्च नेता आयातुल्ला अली खामेनी यांच्यानंतर ते इराणमधले दुसरे सर्वांत ताकदवान व्यक्ती म्हणून ओळखले जात.
सुलेमानी इराकमध्ये काय करत होते? तर या अख्ख्या प्रदेशात इराणचं प्रभावक्षेत्र वाढवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. साहजिकच या प्रदेशात सक्रीय असलेल्या अमेरिका आणि अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांसाठी, मित्र गटांसाठी ते एक मोठं आव्हान ठरत होते. सुलेमानी हे अनेक निरपराधांच्या हत्येसाठी कारणीभूत असल्याचं सांगत अमेरिकेनं त्यांच्या ताफ्यावर ड्रोन हल्ला केला.
सुलेमानी यांची हत्या आत्ताच कशासाठी?
पश्चिम आशियातल्या अनेक अमेरिकाविरोधी मोहिमांना पाठबळ देण्याचं काम सुलेमानी यांनी केल्याचा आरोप अमेरिकेनं वारंवार केला आहे.
गेल्या आठवड्यातही इराकची राजधानी बगदादमध्ये अमेरिकन दूतावासावर झालेल्या हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनं सुलेमानी यांची हत्या केल्याचं बोललं जातंय. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी आत्ताच असं पाऊल का उचललं असावं, याविषयी तर्क लढवले जातायत.
यंदा अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार असून ट्रंप त्या पदासाठी पुन्हा शर्यतीत आहेत. तसंच ट्रंप यांच्यावर महाभियोग भरला जातो आहे. त्या पार्श्वभूमीवर युद्धासारखी परिस्थिती निर्माण करून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा आणि राजकीय फायदा घेण्याचा ट्रंप प्रयत्न करत आहेत असा आरोप त्यांच्या विरोधकांनी केला आहे.
सुलेमानी यांच्या हत्येनंतर काय झालं?
सुलेमानी यांच्या हत्येवर आंतरराष्ट्रीय समुदायानं सावध आणि संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. इराकच्या संसदेनं अमेरिकेनं इराकमधून निघून जावं याबाजूनं कौल दिला आहे.
तर इराण आणि अमेरिकेतले संबंध आणखी बिघडल्याचं चित्र असून त्यामुळं पश्चिम आशियातली परिस्थिती चिघळली आहे. इराणनं आपण कडक पावलं उचलणार असल्याचा इशारा दिला. मग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण इराणसाठी महत्त्वाच्या आणखी 52 ठिकाणी हल्ला करू असं ट्विटरवरून जाहीर केलं. त्यानंतर इराणनं अणुकरारातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला.
इराणसोबतचा अणुकरार काय आहे?
इराण स्वतःचा अणुबाँब तयार करण्याचा प्रयत्नात आहे अशी भीती अनेकांना वाटते. इराणनं तो बनवू नये म्हणून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे पाच सदस्य आणि जर्मनी यांनी इराणशी मिळून 2015 साली करार केला, त्यांच्या अणुकार्यक्रमावर मर्यादा घातल्या. त्याबदल्यात इराणवरचे आंतरराष्ट्रीय निर्बंध शिथिल करण्यात आले. इराणचा गळा आवळला गेला होता, तो मोकळा झाला, त्यांच्या अर्थव्यवस्थेला, व्यवसायाला फायदा झाला.
पण हा करार अमेरिकेतच अनेकांना रुचला नव्हता. त्याला अनुसरून डोनाल्ड ट्रंप यांनी 2018 साली मे महिन्यात त्या करारातून माघार घेतली आणि इराणवर आणखी कडक निर्बंध घालायला हवेत अशी भूमिका घेतली. तेव्हापासूनच दोन देशांतला तणाव वाढत गेला, आणि सुलेमानी यांच्या हत्येनं तो शिगेला पोहोचला आहे.
इराण आणि अमेरिकेत कशावरून भांडण आहे?
अनेकदा राजकीय प्रश्नांची उत्तरं इतिहास आणि भूगोलातून मिळतात. त्यामुळं या संघर्षाची बीजं समजून घ्यायची असतील, तर आधी इराणचं या प्रदेशातलं स्थान आणि महत्त्व समजून घ्यायला हवं. आकार आणि भौगोलिक स्थानाच्या दृष्टीनं इराण पश्चिम आशियातला एक बलाढ्य देश आहे. इराणची इथल्या अरब राष्ट्रांपेक्षा वेगळी सांस्कृतिक ओळख आहे.
एकीकडे सौदी अरेबिया हे अमेरिकेचं मित्रराष्ट्र प्रामुख्यानं सुन्नी पंथियांचं आहे. तर दुसरीकडे इराणमधले बहुसंख्य लोक शिया पंथाचे आहेत. या संपूर्ण प्रदेशात शिया पंथियांच्या हितसंबंधांचा मुद्दा येतो, तेव्हा इराणला त्यात रस असतो असं वारंवार दिसून आलं आहे. त्यामुळं इराण अमेरिका संघर्षाला या संघर्षाचीही किनार आहे.
पश्चिम आशियात अमेरिकेच्या प्रभावाला विरोध म्हणून इराक, सीरिया, लेबनॉन अशा देशांतल्या शियासमर्थकांची मोर्चेबांधणी करण्याचा इराणनं अनेकदा प्रयत्न केला आहे. कासिम सुलेमानी हे याच मोर्चेबांधणीचे शिल्पकार मानले जातात.
1979 साली इराणमध्ये इस्लामिक राज्यक्रांती झाली आणि त्यानंतर इराणमधला अमेरिकाविरोध वाढत जातानाच दिसला. त्यात अमेरिकेची इस्राएलशी मैत्री हेही एक कारण आहे.
पण हा संघर्ष आणखी टोकदार बनला, जेव्हा अमेरिकेनं इराकमध्ये हस्तक्षेप केला आणि 2003 साली सद्दाम हुसेन यांच्याविरोधात इथं युद्ध सुरू केलं. खरं तर सद्दाम सुन्नी पंथाचे असल्यानं इराणचा त्यांनाही विरोध होता. पण अमेरिकेनं सद्दाम यांना हटवल्यानंतर इराकमध्ये सत्तेसाठी शिया-सुन्नी संघर्षही पुन्हा तीव्र झाला. इराकमध्ये निम्म्याहून अधिक नागरिक शिया पंथाचे आहेत, आणि शिया लोकांची महत्त्वाची धर्मस्थळं कर्बला आणि नजाफ ही इराकमध्ये आहेत. त्यामुळं अमेरिकेला इराकमध्ये जेवढा रस आहे तेवढाच इराणलाही इराकमध्ये रस आहे.
या संघर्षाचा भारतावर कसा परिणाम होईल?
इराण आणि अमेरिकेत संघर्ष जगाच्या शांतीसाठीही चांगला नाहीच. आणि भारतासाठी तर ती परिस्थिती फार अडचणीची ठरू शकते. कारण भारतासाठी अमेरिका आणि इराण ही दोन्ही मित्रराष्ट्रं होत.
भारताला या वादात पडायचं नाही, कुणाची बाजू घ्यायची नाही. पण तरीही भारत कात्रीत सापडू शकतो. कारण इराण भारतापासून फार दूर नाही.
इराणचं चाबहार बंदर आणि मुंबई यांच्यात साधारण 1400 किलोमीटरचं अंतर आहे. इराण, अफगाणिस्तान आणि मध्य आशियात सुरळीत व्यापार करता यावा यासाठी भारतानं हे चाबहार बंदर विकसित केलं आहे. इराणमध्ये युद्ध भडकलं, तर भारताचा इथला व्यापार ठप्प होऊ शकतो.
तिसरी आणि स्वाभाविक गोष्ट म्हणजे या युद्धानं तेलाच्या किंमती, विशेषतः डिझेलचे भाव आणखी भडकतील ज्याचा थेट परिणाम सामान्य भारतीयांच्या खिशावरही होईल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)