You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इराण-अमेरिका तणाव: डोनाल्ड ट्रंप - कासिम सुलेमानीला मारण्याचे आदेश दिले कारण...
"मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असेपर्यंत इराणला अण्वस्त्रं तयार करू देणार नाहीत," असं डोनाल्ड ट्रंप यांनी खडसावून सांगितलं.
अमेरिका-इराण यांच्यातील ताणलेल्या संबंधांनंतर ट्रंप यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केलं. यावेळी ते पुढे म्हणाले, "इराणने दहशतवादाला खतपाणी घातलं आहे. आम्ही ते कधीही सहन करणार नाही."
अमेरिकेच्या अर्बिल आणि अल असद तळांवर बुधवारी सकाळी हल्ले झाले होते. "इराणच्या हल्ल्यात अमेरिकेच्या इराकमधील तळाचं थोडं नुकसान झालं आहे, मात्र इराणच्या हल्ल्यात एकही अमेरिकेन सैनिकाने जीव गमावलेला नाही," असंही ट्रंप म्हणाले.
या हल्ल्यानंतर इराणने "नमतं घेतल्याचं दिसतंय," असंही ते म्हणाले.
इराणने हा हल्ला त्यांचे सर्वोच्च लष्करी अधिकारी कासिम सुलेमानी यांना हत्येच्या आवेशात केल्याचं म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेने केलेलेया एका हवाई हल्ल्यात सुलेमानी यांचा मृत्यू झाला होता.
"माझ्या आदेशावरूनच अमेरिकन लष्कराने सुलेमानीला ठार केलं. सुलेमानी हा जगातील अनेक संहारक घटनांसाठी जबाबदार होता. तो अमेरिकेतील काही ठिकाणांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता, म्हणूनच त्याला ठार मारलं," असंही ते म्हणाले.
"अमेरिकेला धमकी देणाऱ्यांची गय केली जाणार नाही. कोणत्याही हल्ल्याला उत्तर देण्याची अमेरिकन लष्कराची ताकद आहे."
"इराणने अण्वस्त्रांची महत्त्वाकांक्षा सोडून द्यायला हवी. दहशत पसरवणाऱ्यांना मदत करणं थांबवायला हवं. यासाठी इराणवर आर्थिक निर्बंध लादू. इराणवर आर्थिक निर्बंध घालणार. इराकने आपल्याच नागरिकांच्या हत्या केल्यात. नाटोने मध्य पूर्वेतील घडामोडीत लक्ष घालायला हवं", असं ट्रंप म्हणाले.
"अमेरिका खनिज तेलाचे जगातील सर्वोत्तम उत्पादक आहे. आम्हाला मध्य पूर्वेतील तेलाची गरज नाही. तेलाच्या बाबतीत आम्ही स्वयंपूर्ण आहोत", असं ट्रंप यांनी सुनावलं.
ते पुढे म्हणाले, "आमची क्षेपणास्त्रं जगातील अत्याधुनिक अशी आहेत. आम्ही (कथित इस्लामिक स्टेटचा म्होरक्या) अल-बगदादीला ठार ठार केलं. तो अतिशय धोकादायक होता."
"युरोपियन देशांनी इराणविरोधात एकत्र यावं. आयसिस इराणचा नैसर्गिक शत्रू आहे. एकत्रित प्राधान्यासाठी काम करायला हवं. चांगलं भविष्य असायला हवं, शांतता नांदायला हवी," असं ट्रंप यांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)