'जालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल ब्रिटिश सरकारने माफी मागणं व्यर्थ आहे'

    • Author, राज बिल्खू
    • Role, बीबीसी एशियन नेटवर्क

जालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल ब्रिटिश सरकारने माफी मागणे 'व्यर्थ' आहे, ही भावना आहे 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमध्ये घडलेल्या नरसंहारातून जिवंत बचावलेल्या तीन सुदैवी शिखांचे वंशज डॉ. राज सिंह कोहली (37) यांची.

ब्रिटिश असणं म्हणजे, "वसाहतवादाच्या अपराधभावनेचं ओझं सतत खांद्यावर वागवण्यासारखं आहे," असं स्वतः ब्रिटिश नागरिक असलेले रग्बी उद्योजक डॉ. राज सिंह कोहली यांना वाटतं.

जालियनवाला बाग हत्याकांडाला शंभर वर्षं पूर्ण झाल्या निमित्ताने ब्रिटिश संसदेत दोन्ही पक्षातील काही सदस्यांनी हा मुद्दा मांडत शेकडो निशस्त्र भारतीयांना ठार केल्याप्रकरणी ब्रिटिश सरकारने माफी मागावी, अशी सूचना केली होती. त्यावर राज सिंह कोहली यांनी आपलं म्हणणं मांडलं.

ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांनीही या घटनेवर खेद व्यक्त केला. "हा ब्रिटिश वसाहतीखालील भारतीय इतिहासाला लागलेला कलंक आहे", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मात्र अधिकृत माफी मागितली नाही.

डॉ. कोहली यांच्या आजोबांचे भाऊ बलवंत सिंह जालियनवाला बाग हत्याकांडात मृतदेहांच्या ढिगाऱ्याखाली पडले आणि कित्येक तास तिथेच अडकले होते. डॉ. राज सिंह कोहली यांनी बीबीसी एशियन नेटवर्कला सांगितले, "मला वाटतं आता माफी मागणे व्यर्थ आहे. खरंतर काहीसं अयोग्यच."

"गोळीबार सुरू झाला तेव्हा त्यांच्यापैकी दोघे (आजोबा) पळून जाण्यात यशस्वी झाले. ते भिंतीवरून उड्या मारून गेले की एखाद्या उघड्या गेटमधून पळून गेले, हे मी खात्रीलायक सांगू शकत नाही", ते सांगत होते.

मात्र गोळीबारानंतर त्यांना भारत सोडावा लागला.

"माझे पणजोबा बर्मा मिलिट्री पोलिसात असिस्टंट डेप्युटी कमिश्नर होते. त्यांनी आपल्या मुलांना भारत सोडायला सांगितले."

"आणि अशा रीतीने ते भारतातून बाहेर पडले."

ब्रिटनच्या महाराणी यांनी 1997 साली, तर पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी 2013 साली अमृतसरला भेट दिली. घडलेल्या घटनेविषयी दोघांनीही खेद व्यक्त केला होता.

मात्र एवढ्यावर डॉ. राज सिंह कोहली यांच्या 78 वर्षांच्या आई जगजीत कौर यांचं समाधान झालं नाही.

त्या म्हणाल्या, "सरकारने गोळीबाराची परवानगी दिली असो किंवा नसो. मात्र त्यांनीच नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांपैकी एकाने केलेली ही चूक होती, हे सरकारने मान्य करून कबूल केलं पाहिजे."

"त्या घटनेनंतर माझ्या आजीचं संपूर्ण आयुष्य आसवं गाळण्यात गेलं. त्या दिवसानंतर तिला तिची मुलं कधीच दिसली नाही. कितीतरी कुटुंबं उद्धवस्त झाली होती. घरातली एकमेव कमावती व्यक्ती त्यांनी गमावली होती."

डॉ. राज पुढे सांगतात, "वसाहतवादाची अपराधभावना सतत सोबत वागवणं, हा ब्रिटिश शीख असण्याचा एक भाग आहे."

"ऐकायला विचित्र वाटेल, मात्र, ब्रिटिश असणं म्हणजे काय, याविषयीच्या माझ्या भावना या आधी ब्रिटन काय होता, त्यातून तो काय शिकला आणि आज ब्रिटन काय आहे, याभोवती केंद्रित आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)