सुदानचे राष्ट्राध्यक्ष ओमर अल-बशीर यांची राजवट अखेर संपुष्टात

जवळपास 30 वर्षे सत्तेमध्ये राहिल्यानंतर सुदानचे राष्ट्रपती ओमर अल- बशीर यांना पदच्युत करून अटक केल्याची माहिती सुदानच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली.

राष्ट्रीय वाहिनीशी बोलताना अवाद इब्न औफ म्हणाले, लष्कराने दोन वर्षांच्या संक्रमण काळानंतर निवडणुका घेण्याचे निश्चित केले आहे.

तसेच तीन महिन्यांची आणीबाणी लागू केल्याचेही ते म्हणाले.

बशीर 1989पासून सुदानचा कारभार पाहात होते. त्यांच्याविरोधात अनेक महिने आंदोलनं सुरू होती.

इब्न औफ म्हणाले, त्यांची 'राजवट' संपुष्टात आली असून बशीर यांना सुरक्षित जागी ठेवण्यात आले आहे.

सुदानची राज्यघटना स्थगित करण्यात आली असून पुढील सूचना येईपर्यंत सीमा बंद करण्यात आल्या असून देशाचे हवाईक्षेत्र 24 तासांसाठी बंद ठेवण्यात आले होते.

सुदानच्या पश्चिमेस डार्फर भागामध्ये मानवतेविरोधात युद्ध पुकारणे तसेच मानवतेविरोधात गुन्हा असे आरोप ठेवून इंटरनॅशनल क्राइम कोर्टाने बशीर यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावले होते.

अर्थात त्यांच्या अटकेनंतर पुढे काय होईल हे निश्चित नाही.

नक्की काय घडले आहे?

एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी लष्कराची वाहने खार्टुम येथील वसाहतीमध्ये आली. या वसाहतीमध्ये संरक्षण मंत्रालय, लष्कराचे मुख्यालय आणि बशीर यांचे निवासस्थान आहे.

लष्करच पुढील माहिती प्रसिद्ध करेल असा संदेश प्रसिद्ध करत सरकारी टीव्ही वाहिनी आणि रेडिओने प्रसारण थांबवले.

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार हजारो आंदोलकांनी खार्टुमच्या मध्यवर्ती भागात मोर्चा काढून 'सरकार पडले आहे, आम्ही जिंकलो' अशा घोषणा दिल्या.

हे आंदोलन का झाले?

महाग होत चाललेल्या राहणीमानामुळे या आंदोलनाची ठिणगी पडली. मात्र आंदोलकांनी नंतर राष्ट्राध्यक्षांनी राजीनामा द्यावा आणि हे सरकार जावे अशी मागणी सुरू केली.

गेल्या आठवड्यात या आंदोलनातील ज्येष्ठ सदस्य ओमर अल- डिगिएर यांनी एएफपीला सांगितले, "ही क्रांतीच आहे."

आंदोलकांच्या विरोधात हस्तक्षेप करू नका असे पोलिसांना सांगण्यात आले होते. मात्र आंदोलकांना दडपण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर मानवाधिकार संघटनांनी जबरदस्त टीका केली आहे.

सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबरपासून सुरु झालेल्या आंदोलनात 38 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र मृतांचा आकडा याहून मोठा असावा असा दावा मानवाधिकार संघटानांनी केला आहे.

फेब्रुवारीमध्ये, राष्ट्राध्यक्ष स्वतः पायउतार होतील असं वाटलं होतं मात्र बशीर यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)