बेंजामिन नेतन्याहू पाचव्यांदा इस्राईलचे पंतप्रधान होण्याच्या वाटेवर

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची सलग पाचव्यांदा पंतप्रधानपदी निवड होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. नेतन्याहू यांचे कडवे प्रतिस्पर्धी बेनी गांत्झ यांनी बुधवारी पराभव मान्य केला.

सर्व मतांची मोजणी झाल्यानंतर, दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड चुरस असल्याचं स्पष्ट झालं.

मात्र नेतन्याहू यांचा लिकूड पक्ष आणि उजव्या विचारसरणीचे तसंच धार्मिक पक्ष एकत्र येऊन बहुमतासाठी आवश्यक 65 जागांसाठी आपली दावेदारी सिद्ध करू शकतात.

इस्राईल संसद म्हणजेच नेसेटमध्ये एकूण 120 सदस्य असतात.

नेतन्याहू यांनी सत्तास्थापनेसाठी दावा करून तो यशस्वी ठरल्यास, ते सलग पाचव्यांदा पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतील.

सर्वाधिक कालावधीसाठी पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रमही नेतन्याहू यांच्या नावावर होईल. याआधी इस्राईलचे संस्थापक धुरीण बेन-गुरिअन सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी होते. नेतान्याहू आता त्यांना मागे टाकतील.

मात्र येत्या काही महिन्यात त्यांना भ्रष्टाचाराच्या तीन प्रकरणांमध्ये कथित सहभागासंदर्भात कारवाईला सामोरं जायला लागू शकतं.

निकालांची औपचारिक घोषणा झाल्यानंतर सरकारला अडचणीत आणण्याचा निर्धार विरोधी पक्षाचे नेत्यांनी व्यक्त केला.

बुधवारी रात्री केलेल्या भाषणात नेतान्याहू यांनी हा ऐतिहासिक विजय असल्याचं म्हटलं आहे.

हे उजव्या विचारसरणीच्या पक्षांचं सरकार असेल पण मी सर्वसमावेशक विचारसरणीचा पक्षांचा पंतप्रधान असेन असं नेतान्याहू यांनी म्हटलं आहे.

इस्राईलच्या जनतेने माझ्यावर, माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवला याचा आनंद आणि समाधान आहे, असंही नेतान्याहू यांनी सांगितलं.

उर्वरित मतांची मोजणी काही दिवसात पूर्ण होईल. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष रुवेन रिव्हीन सत्तास्थापनेसाठी बहुमतातील पक्षाला आमंत्रित करतील.

इस्राईल संसदेत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे नेहमीच आघाडी किंवा युतीचं सरकार तयार होतं.

एक्सिट पोल्समध्ये चुरशीचा मुकाबला असेल असं वर्तवण्यात आलं होतं. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात नेतान्याहू यांचे प्रतिस्पर्धी बेनी गांत्झ यांनी विजयी झाल्याचा दावा केला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)