पाकिस्तानमध्ये पाय पसरून बसलेल्या महिलेच्या पोस्टरवरून गोंधळ

जेव्हा रुमिसा लखानी आणि रशीदा शब्बीर हुसैन या दोघींनी आंतरराष्ट्रीय महिला दिवसासाठी एक खास पोस्टर बनवलं तेव्हा त्या दोघींना स्वप्नातही वाटलं नव्हतं की हे पोस्टर पाकिस्तानात रणकंदन माजवेल.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी 22 वर्षांच्या या विद्यार्थिनी एका पोस्टर-मेकिंग वर्कशॉपमध्ये सहभागी झाल्या होत्या.

त्या दोघींना असं पोस्टर बनवायचं होतं जे सगळ्यांचं लक्ष वेधून घेईल. त्यांनी नवनवीन कल्पनांवर विचार करायला सुरुवात केली.

एकदा मैत्रिणीशी गप्पा मारत असताना त्यांच्या लक्षात आलं की ती आपले दोन्ही पाय पसरून बसली आहे. यावरून प्रेरित होऊन रुमिसा आणि रशीदा यांनी आपलं पोस्टर डिझाईन केलं.

महिलांच्या बसण्यावर असणाऱ्या मर्यादा हा रुमिसासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. ती म्हणते, "आमच्याकडून शालीनतेची अपेक्षा केली जाते, आम्ही अंग चोरून बसावं अशी अपेक्षा केली जाते, आम्ही सतत या काळजीत असतो की आमच्या शरीराचा आकार तर कोणाला दिसत नाहीये ना, पुरुष स्वतःला हवं तसं बसू शकतात, त्यांच्यावर कोणाची बंधन नसतात."

रुमिसाच्या पोस्टरवर एक तरूण मुलगी आपले पाय फाकवून बसली आहे, तिच्या डोळ्यांवर गॉगल आहे आणि तिच्या चेहऱ्यावर बेफिकीर हसू.

या पोस्टरवर काय लिहायचं हे रुमिसाची जिवलग मैत्रीण रशीदाने सांगितलं. रशीदाची इच्छा होती की महिलांवर असणाऱ्या कसं बोलावं, कस वागावं, कसं चालावं, कसं बसावं या सगळ्या बंधनांकडे लोकांचं लक्ष जावं.

रशिदाने या पोस्टरला शीर्षक दिलं, 'इथे, मी बसलेय ते योग्यच आहे.' हबीबी युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना रुमिसा आणि रशीदा एकमेकींना पहिल्यांदा भेटल्या. रुमिसा कम्युनिकेशन डिझाईनची विद्यार्थिनी होती तर रशीदा सोशल डेव्हलपमेंट आणि पॉलिसीची.

रशीदा म्हणते, "आम्ही बेस्ट फ्रेंड आहोत. आम्ही एकमेकींशी सगळं शेअर करतो."

पोस्टरवरून वाद

रशीदा तिला सहन कराव्या लागणाऱ्या लैंगिक भेदभावाबद्दलही सांगते. दुसरीकडे रुमिसावर लग्न करण्याचा सतत दबाव आहे. तिच्या दृष्टीने तिने अजूनही लग्न न करता राहाणं हा तिचा वैयक्तिक आयुष्यातला मोठा विजय आहे.

रशीदालाही वाटतं की सतत लग्न करण्याचा दबाव असणं अन्यायकारक आहे. ती म्हणजे मी सतत लैंगिक भेदभाव आणि लैंगिक छळाच्या विरोधात बोलत असते, अशात कोणी लग्नाचा विषय काढला तर मला अस्वस्थ व्हायला होतं.

म्हणूनच मार्च महिन्यात पाकिस्तानात होणाऱ्या औरत मार्चमध्ये सहभागी होण्याची दोघींची इच्छा होती. "आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या अनेक महिलांसोबत उभं राहणं हा खूप मस्त अनुभव होता," रुमिसा सांगते.

पाकिस्तानात महिला अधिकारांसाठी झालेल्या आंदोलनांमध्ये औरत मार्चचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल. या मोर्चांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या तसंच LGBT समुदायाचे लोकही होते.

याच मार्चमध्ये रुमिसा आणि रशिदा आपलं पोस्टर घेऊन सहभागी झाल्या होत्या ज्यावरून वाद निर्माण झाला.

या मार्चमध्ये इतर महिलाही लैंगिक भेदभावांच्या विरोधात आवाज उठवणारे पोस्टर्स घेऊन सहभागी झाल्या होत्या.

या पोस्टर्सवरूनच वादंग माजला.

या मार्चच्या आयोजकांपैकी एक असणाऱ्या मोनिजा सांगतात, "आम्ही महिलांच्या शरीरांवर मर्यादा घालणाऱ्या चालिरितींविरोधात आवाज उठवत होतो. रूढीवादी धार्मिक समाजाला असं वाटतं की महिलांनी स्वतः शरीर झाकलं पाहिजे आणि घरातच राहिलं पाहिजे. या मानसिकतेला आम्ही आव्हान देत होतो."

रुमिसाला वाटतं की एकाच वेळेस 7,500 महिलांना एकत्र रस्त्यावर आलेलं पाहणं हा कट्टरपंथीयांसाठी एक मोठा झटका होता.

टीका आणि बलात्काराच्या धमक्या

"महिला रस्त्यावर मोठमोठ्या आवाजात घोषणा देत आहेत हे पाहून लोक अस्वस्थ झाले. त्यांना वाटलं इस्लाम धोक्यात आला आहे. या महिला इस्लामच्या विरोधात जात आहेत. पण मला नाही असं वाटत. मला वाटतं की इस्लाम स्त्रीवादी धर्म आहे," रुमिसा पुढे सांगते.

मोर्चातून घरी येतानाच रुमिसाच्या लक्षात आलं की तिने बनवलेल्या पोस्टरसोबतचा तिचा फोटो व्हायरल झाला आहे.

फेसबुकवर एक कमेंट आली होती, "माझ्या मुलींसाठी मला अशा समाजाची गरज नाही." दुसऱ्या एका कमेंटमध्ये लिहिलं होतं की, "मी स्वतः एक महिला आहे पण मला हे आवडलेलं नाही."

काही कमेंटमध्ये अपमानकारक भाषा होती. एका कमेंटमध्ये लिहिलं होतं की हा, "महिला दिन होता, कुत्री दिवस नाही."

अर्थात अनेक लोकांनी या पोस्टरचं समर्थनही केलं. एका महिलेने लिहिलं, "मला खरंच कळत नाहीये की या पोस्टरवर लिहिलेल्या या शब्दांनी लोक इतके घाबरलेले का आहेत. त्यांना खरंतर पाकिस्तानातल्या महिलांच्या गुलामगिरीची लाज वाटली पाहिजे.

रुमिसाला तिच्या कुटुंबातल्या अनेकांनी मेसेज केले की, "आम्हाला वाटलं नव्हतं तू असं करशील. तू एका चांगल्या घरातली मुलगी आहेस."

काही लांबचे नातेवाईक तिच्या आई-वडिलांना म्हणाले की त्यांनी रुमिसाला अशा प्रकारच्या मोर्चात जायची परवानगी द्यायला नको होती. पण सगळ्या दबावांना झुगारून रुमिसाच्या घरच्यांनी तिला पाठिंबा दिला.

या मोर्चातल्या आणखी एका पोस्टरवर लिहिलं होतं, 'माझं शरीर, माझा चॉईस.' समा टीव्ही या स्थानिक पाकिस्तानी चॅनलनुसार कराचीमधल्या एका मौलवीने या गोष्टीवर जहरी टीका केली.

या ऑनलाईन व्हीडिओमध्ये डॉ मंजूर अहमद यांनी कथितरित्या म्हटलं की, "तुमचं शरीर तुमचा चॉईस, मग पुरुषांचं शरीर, पुरुषाचा चॉईस तो कोणावरही झपटतील." या व्हीडियोनंतर त्यांच्यावर बलात्काराला उत्तेजन देण्याचे आरोप झाले.

मोनिजा म्हणतात, "या मोर्चानंतर बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या आमच्यासाठी नेहमीच्याच झाल्या. सोशल मीडियावर बहुतांश आयोजकांना अशा धमक्या मिळाल्या. जास्तीत जास्त पुरुषांमध्ये स्त्रियांचं दमन करण्याची वृत्ती असते. त्यालाच आम्ही आव्हान देत आहोत."

कट्टरवाद्यांशी तुलना

या मोर्चानंतर पाकिस्तानातल्या स्त्रीवादी आंदोलनातही फुट पडली. सोशल मीडियावरही अनेक स्वयंघोषित स्त्रीवाद्यांनी टीका केली. त्यांचं म्हणणं होतं की, "महिलांनी असं वागणं बरोबर नाही."

रुमिसा म्हणते, "माझे स्वतःचे मित्र-मैत्रिणी, जे स्वतःला फेमिनिस्ट म्हणतात त्यांनाही वाटलं की हे पोस्टर बनवायची गरज नव्हती."

पाकिस्तानातल्या एक प्रमुख स्त्रीवादी कार्यकर्त्या किश्वर नहीद यांना वाटलं की रुमिसा आणि रशीदाचं पोस्टर किंवा त्या प्रकारचे इतर पोस्टर्स परंपरा आणि मुल्यांचा अपमान करणारे होते.

"ज्यांना वाटतं की अशा प्रकारचे पोस्टर्सनी ते आपले हक्क मिळवतील त्यांच्यात आणि निर्दोष लोकांची हत्या करून स्वर्गात जायचं स्वप्न पाहाणारे जिहादी यांच्यात मला काही फरक दिसत नाही," किश्वर म्हणाल्या.

पण डॉन वर्तमानपत्रात सादिया खत्री यांनी एक लेख लिहून स्त्रीवाद्यांची बदनामी केल्याचा आरोप केला. वादात अडकूनही रुमिसाला पोस्टर बनवण्याचं दुःख नाहीये. "मला आनंद आहे की माझ्या पोस्टरने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं."

ती पुढे असंही म्हणते की आम्ही जी घोषणा पोस्टरवर वापरली त्यांची ना मला लाज आहे ना भीती. कारण आमची इच्छा होती महिलांच्या मुद्द्यांवर सगळ्यांच लक्ष जावं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)