You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जालियनवाला बाग हत्याकांडाप्रकरणी ब्रिटनकडून माफी नाहीच, केवळ खेद व्यक्त
जालियनवाला बाग हत्याकांडाप्रकरणी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी संसदेत खेद व्यक्त केला. जालियनवाला हत्याकांड हे ब्रिटनच्या इतिहासाला लागलेला कलंक आहे अशा शब्दांत थेरेसा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. थेरेसा यांनी माफी मागावी अशी मागणी होत होती मात्र त्यांनी तसं केलं नाही. थेरेसा यांनी केवळ खेद व्यक्त केला.
हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बोलताना थेरेसा म्हणाल्या, '1919 मध्ये झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांड हे ब्रिटनच्या इतिहासातला दुर्देवी कालखंड आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी 1997 मध्ये जालियनवाला बागेला भेट दिली होती. भारताबरोबरच्या संबंधांतलं हे कटू प्रकरण आहे असं राणी म्हणाल्या होत्या.
थेरेसा यांनी आपल्या निवेदनात सांगितलं की, ''त्यावेळी जालियनवाला बाग परिसरात जे घडलं त्याचा आम्हाला पश्चाताप आहे. आता भारत आणि ब्रिटनचे संबंध सौहार्दपूर्ण आहेत. सहकार्य, सुरक्षा, समृद्धी आणि मैत्री अशा अनेक आघाड्यांवर हे संबंध दृढ झाले आहेत.
दरम्यान जालियनवाला हत्याकांडात ज्यांनी जीव गमावला, त्यांच्यासाठी बिनशर्त माफी मागणं आवश्यक होतं. स्पष्ट शब्दात माफी मागायला हवी होती असं थेरेसा यांच्या निवेदनानंतर विरोधी पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बिन यांनी सांगितलं.
थेरेसा यांनी औपचारिक शब्दात माफी मागितली नाही मात्र ब्रिटन सरकारने हत्याकांडाप्रकरणी अनेकदा खेद व्यक्त केला आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
ब्रिटनच्या संसदेत झाली होती मागणी
मंगळवारी संसदेच्या वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये जालियनवाला हत्याकांडातील जीव गमावलेल्या लोकांची माफी मागण्यावरुन सदस्यांमध्ये मतभेद झाले होते. 2017 मध्ये भारत दौऱ्यावर आलेले लंडनचे महापौर सादिक खान यांनी हत्याकांडासाठी ब्रिटन सरकारने माफी मागायला हवी अशी भूमिका घेतली होती.
जालियनवाला हत्याकांडाप्रकरणी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी माफी मागण्याची ही योग्य वेळ आहे असं भारतीय वंशाचे आणि लेबर पक्षाशी संलग्न ब्रिटनचे खासदार वीरेंद्र शर्मा यांनी सांगितलं.
1919 मध्ये झालेल्या जालियनवाला हत्याकांडाला शंभर वर्ष होत आहेत. अशावेळी ब्रिटन सरकारने जाहीरपणे माफी मागणं आवश्यक आहे. या हत्याकांडातील सहभागाबाबत ब्रिटन सरकारने स्पष्टीकरण द्यायला हवं असं भारतीय वंशाच्या खासदार प्रीत कौर गिल यांनी सांगितलं.
जालियनवाला बाग हत्याकांड
मार्च 1919 मध्ये ब्रिटीश सरकारने रौलेट कायदा नावाचा एक कायदा संमत केला होता. या कायद्यानुसार देशद्रोहाचा आरोप असलेल्या लोकांना कोणत्याही चौकशीविना तुरुंगात टाकण्याची तरतूद होती. या कायद्याविरोधात महात्मा गांधींच्या नेतृत्वात सत्याग्रह सुरू झाला होता. त्यात 6 एप्रिलला महात्मा गांधींनी या निर्णयाविरोधात सत्याग्रहाला सुरुवात केली. त्यात हिंदू, शीख, मुस्लीम या सर्व समुदायाच्या लोकांनी बरोबरीने सहभाग घेतला. त्याचदिवशी डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू या दोन नेत्यांना अटक करण्यात आली.
या अटकेला विरोध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर एक मोर्चा नेण्यात आला. तेव्हा त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर आणखी काही नेत्यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले.
या अटकेविरोधात सुवर्ण मंदिराजवळ असलेल्या जालियनवाला बाग परिसरात 20000 लोकांनी निदर्शनं केली. 13 एप्रिलला बैसलाखी सणाच्या दिवशी ब्रिगेडिअर डायर यांच्या नेतृत्वात सशस्त्र शिपायांनी जमावावर गोळीबार केला. त्यात अनेक भारतीयांचा मृत्यू झाला. हा आकडा 379 इतका असल्याचं सांगण्यात येतं. प्रत्यक्षात हजारापेक्षा जास्त लोक या हल्ल्यात मरण पावल्याचं सांगण्यात येतं. या हल्ल्याविरोधात अनेक निदर्शनं झाली. त्या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध करण्यात आला. या घटनेनंतर स्वातंत्र्यासाठी आंदोलन आणखी तीव्र झालं या हल्ल्यासाठी ब्रिटनने माफी मागावी ही मागणी बऱ्याच काळापासून करण्यात येते.
1997 मध्ये ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनी भारताचा दौरा केलाय. त्यावेळी जालियनवाला बाग हत्यांकांडासाठी माफी मागण्याच्या मागणीने जोर धरला. महाराणींचे पती प्रिन्स फिलीप यांनी हे हत्याकांड अतिरंजित पद्धतीने सादर करण्यात आलं आहे असा आरोप केला. त्यावरही चहुबाजूंनी टीका करण्यात आली आणि हा वाद आणखीच चिघळला.
2013 मध्ये ब्रिटन पंतप्रधान डेव्हिड कॅमरून भारताच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनी या घटनेतील शहिदांना श्रद्धांजली वाहिली होती. त्यानंतरही ब्रिटनने माफी मागावी ही मागणी सातत्याने होत होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)