'बलात्कार राष्ट्रीय आपत्ती' : दक्षिण आफ्रिकेत दरवर्षी 40 हजार अत्याचार

दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सीरिल रामफोसा यांनी दक्षिण आफ्रिकेत बलात्कार राष्ट्रीय आपत्ती आहे, असं म्हटलं आहे. त्याविरोधात पुरुषांनी एकत्र यावे असे आवाहनही त्यांनी केलं आहे.

"महिलांवर बलात्कार होणे व पीडितांच्या हत्या करणे असे प्रकार सातत्याने होत असून लैंगिक हिंसा संपविण्याची वेळ आली आहे," असं ते म्हणाले.

निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना त्यांनी हे आवाहन केले आहे.

"दक्षिण आफ्रिकेत दरवर्षी 40 हजार बलात्कारांची नोंद होते. अर्थात बलात्कारांची खरी संख्या याहून मोठी असण्याची शक्यता आहे," असं ते म्हणाले. खचाखच भरलेल्या दर्बन स्टेडियममध्ये ते बोलत होते.

ते म्हणाले, "स्त्रियांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपण मोठी प्रगती केली आहे. मात्र लैंगिक हिंसाचार ही राष्ट्रीय आपत्ती असून, ते संपविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. लैंगिक हिंसाचार संपल्यामुळेच दक्षिण आफ्रिकेतील महिला व मुली शांततामय, सुरक्षित आणि सन्मानासह राहू शकतील."

महिलांना या संकटातून मुक्त करण्यासाठी दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.

गुन्हेगारांना कडक शिक्षा, चांगल्या प्रशिक्षित पोलिसांची नेमणूक, सर्व प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी व्यवस्थेला बळ देणे या सरकारी उपाययोजनांची उजळणीही रामफोसा यांनी केली.

लहान वयातच मुले इतरांचा सन्मान करायला शिकतात आणि तणाव, तंट्यामुळे निर्माण होणारी हिंसा टाळू शकतात, असेही ते म्हणाले.

गेल्या दशकभरात जेकब झुमा यांच्या काळातील अनागोंदी कारभाराला लगाम लावण्यात येईल, असा स्पष्ट संदेश रामफोसा यांच्या भाषणातून मिळाल्याचे बीबीसीचे आफ्रिका प्रतिनिधी अँड्र्यू हार्डिंग यांनी सांगितले.

रामफोसा यांनी भाषणात पारदर्शक कारभारावर भर दिला पण जमीन सुधारणा, गरिबी निवारण, जगातील सर्वाधिक बेरोजगारी यांचा त्यांनी फारसा उल्लेख केला नाही, असं हार्डिंग सांगतात.

दक्षिण आफ्रिकेत 12 महिन्यांत 40,035 बलात्कारांची नोंद पोलिसांनी केली आहे. म्हणजेच प्रतिदिन 110 बलात्कारांची नोंद केली जाते. त्याआधीच्या वर्षभरात 39,828 बलात्कारांची नोंद झाली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)