You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
झिम्बाब्वेचे माजी अध्यक्ष मुगाबेंची पैशांची बॅग चोरांनी केली लंपास
झिम्बाब्वेचे पदच्युत माजी अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांची तब्बल 1,50,000 डॉलरने भरलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली आहे. या प्रकरणात तिघांविरोधात कोर्टात खटला दाखल करण्यात आला आहे.
तिन्ही संशयित चोरट्यांनी हे पैसे कार, घर आणि जनावरांवर खर्च केल्याचा आरोप आहे.
या तीन संशयितांमध्ये माजी अध्यक्ष मुगाबे यांच्या नातेवाईक कोन्स्टान्शिया मुगाबे यांचाही समावेश असल्याचे वृत्त सरकारी वृत्तसंस्थेने दिले आहे.
त्यांच्याकडे रॉबर्ट मुगाबे यांच्या राजधानी हरारेजवळ असलेल्या झिम्बॉ गावातील घराच्या किल्ल्या होत्या आणि त्यांनीच इतर आरोपींना घरात घुसण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे.
चोरी झाली त्याच दरम्यान इतर दोन आरोपींना घरकामासाठी ठेवण्यात आले होते. डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान ही चोरी झाली.
"या घटनेनंतर जोहाने मापुरिसा हिने 20 हजार डॉलरची टोयोटो कॅम्री गाडी विकत घेतली," अशी माहिती सरकारी वकील टेवरेशी झिनेंबा यांनी चिनहोई मॅजिस्ट्रेट कोर्टाला दिली आहे.
ते पुढे म्हणाले, "सेमोर हेतेक्वा यानेही होंडा गाडी विकत घेतली. याशिवाय गुरढोरं आणि डुकरंही विकत घेण्यात आली. मात्र ती कितीला विकत घेतली ती रक्कम कळू शकलेली नाही."
लष्कराने 94 वर्षीय मुगाबे यांची नोव्हेंबर 2017 मध्ये राष्ट्राध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली होती. तोवर मुगाबे जवळपास 37 वर्ष पंतप्रधान आणि नंतर राष्ट्राध्यक्ष पदावर होते.
तिन्ही संशयित जामिनावर
झिम्बाब्वे कधीच दिवाळखोरीत निघणार नाही, असे एकेकाळी म्हटले जाई. मात्र मुगाबे यांच्या काळातच देशावर आर्थिक संकट कोसळले आणि रॉबर्ट मुगाबे मात्र आलीशान आयुष्य जगत राहिले, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
झिम्बाब्वेमध्ये डॉलरची किंमत खूप जास्त आहे. डॉलरच्या बदल्यात झिम्बाब्वेच्या बँका ज्या 'बाँड नोट' जारी करतात. प्रत्यक्षात त्यातून फार कमी खरेदी करता येते.
निवृत्तीनंतर रॉबर्ट मुगाबे यांना चालताना त्रास होतो. त्यासाठी त्यांनी अनेक महिने सिंगापूरमध्ये उपचार घेतले आहेत.
चोरी झाली तेव्हा ते घरी होते की नाही, याबाबतही स्पष्टता नाही.
तिन्ही संशयित सध्या जामिनावर आहेत. तर चौथा संशयित अजूनही पोलिसांच्या हाती लागला नसल्याचे वृत्त AFP वृत्तसंस्थेने दिले आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)