You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गुहेत डांबून तरुणीवर 15 वर्षं बलात्कार करणाऱ्याला अटक
इंडोनेशियात 83 वर्षांच्या व्यक्तीनं एका तरुणीला गुहेत डांबून तिचं 15 वर्षं लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी या प्रकरणात त्या व्यक्तीला अटक केली आहे. 15 वर्षांपूर्वी या तरुणीला पळवून नेलं त्यावेळी ती फक्त 13 वर्षांची होती, असं सांगितलं जात आहे.
आपल्या शरीरात एका तरुण व्यक्तीच्या आत्म्याचा प्रवेश झाला आहे, असं सांगून या व्यक्तीनं जवळपास 15 वर्षं या तरुणीचं लैंगिक शोषण केलं.
"या तरुणीची रविवारी मध्य सुलावेसी प्रांतातल्या गालुम्पांग परिसरातून सुटका करण्यात आली. तिथे तिला एका गुहेत डांबून ठेवण्यात आलं होतं," अशी माहिती पोलिसांनी दिली.
ही गुहा आरोपीच्या घराजवळ असून तिथे काही फर्निचरही असल्याचं पोलिसांनी प्रकाशित केलेल्या चित्रांमध्ये दिसत आहे.
अशी दाखवायचा भीती
"तरुणीला वयाच्या 13व्या वर्षापासून हा आरोपी तिच्यावर बलात्कार करत होता. रात्री तो तिला घरी घेऊन यायचा आणि दिवसा गुहेत डांबून ठेवायचा," असं तोलितोलीचे पोलीस प्रमुख M. इक्बाल अलकुदुसी यांनी सांगितलं.
"आरोपीनं 15 वर्षांपूर्वी तरुणीला तिच्या मित्राचा फोटो दाखवला आणि त्याच्या आत्म्यानं आपल्या शरीरात प्रवेश केला आहे, असं तिला सांगितलं," असंही अलकुदुसी म्हणाले.
"पीडित तरुणीचं ब्रेन वॉश करण्यात आलं, असं वाटत आहे. ती तिथून पळून जाऊ नये आणि इतर कुणाशी बोलू नये, यासाठी एक जिन सतत तिच्यावर लक्ष ठेवून आहे, अशी भीती तिला दाखवण्यात आली होती," असं जकार्ता पोस्टनं स्थानिक सुजेंग यांच्या हवाल्यानं सांगितलं आहे.
2003पासून अमरीन आपल्यासोबत लैंगिक संबंध ठेवून आहे, असं या तरुणीनं पोलिसांना सांगितल्याची बातमी रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिली आहे.
आपली बहीण ही आसपासच कुठेतरी आहे, अशी माहिती पीडितेच्या बहिणीनं शेजाऱ्यांना दिली आणि त्यानंतर पोलिसांना याबद्दल माहिती मिळाली.
पीडितेच्या बहिणीचं लग्न आरोपीच्या मुलाशी झालं होतं. आरोपीनं पीडितेच्या कुटुंबाला सांगितलं होतं की ती काम करण्यासाठी जाकार्ताला गेली आहे.
आरोपीविरुद्ध बाल सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोप सिद्ध झाल्यास आरोपीला 15 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)