इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यलढ्यात भारताने कशी बजावली होती महत्त्वाची भूमिका

भारतीय नेते इंडोनेशियाला भेट देतात तेव्हा एका भारतीय नेत्याचा विशेष उल्लेख होतो. ते म्हणजे बिजयनंदा पटनाइक.

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाइक यांचे ते वडील. बिजयनंदा पटनायक यांना ओडिशामध्ये सर्वजण प्रेमाने बिजू पटनाइक म्हणत असत. बिजू पटनाइक यांची ओळख एक स्वातंत्र्यसैनिक, एक धाडसी पायलट आणि दिग्गज राजकीय व्यक्तिमत्त्व अशी होती. त्यांना 'आधुनिक ओडिशाचे शिल्पकार'म्हणूनही ओळखलं जातं.

इंडोनेशियाशी त्यांचं खूप जवळचं नातं होतं. इंडोनेशियातले लोक बिजू पटनाइक यांचा खूप आदर करतात, त्यांना आपल्याच देशातलं समजतात. त्यामागे एक कारण आहे - त्यांनी इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

बिजू पटनाइक हे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे मित्र आणि विश्वासू होते. त्यावेळी इंडोनेशियावर डचांचं राज्य होतं.

इंडोनेशियाच्या स्वातंत्र्य सैनिकांचं डचांपासून संरक्षण करण्याची जबाबदारी नेहरूंनी पटनाइकांवर सोपवली आणि त्यांना डचांविरुद्ध लढण्यासाठी इंडोनेशियाला पाठवलं.

1948मध्ये बिजू पटनाइक ओल्ड डकोटा एअरक्राफ्ट घेऊन सिंगापूरमार्गे जकार्ताला गेले.

ज्यावेळी ते इंडोनेशियाच्या हवाई क्षेत्रात पोहोचले त्यावेळी त्यांच्यावर डच सेनेनं हल्ला केला. त्यांचं विमान पाडण्याचा प्रयत्नही झाला होता. त्यांना तडकाफडकी एका ठिकाणी लँडिंग करावं लागलं. तिथं त्यांनी जपानी सेनेच्या उरलेल्या इंधनाचा वापर केला.

त्यानंतर ते संघर्षग्रस्त भागांत गेले आणि इंडोनेशिया स्वातंत्र्यलढ्याचं नेतृत्व करणाऱ्या सुल्तान शहरयार आणि सुकर्णो यांना घेऊन दिल्लीत परतले. तिथं त्यांची नेहरूंशी एक गोपनीय बैठक झाली. त्यानंतर इंडोनेशिया स्वतंत्र्य झाल्यावर डॉ. सुकर्णो देशाचे पहिले राष्ट्रपती बनले.

राष्ट्रपती बनल्यानंतर त्यांनी पटनाइक यांना इंडोनेशियाची मानद नागरिकता बहाल केली आणि त्यांना 'भूमिपुत्र' हा इंडोनेशियाचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला.

1996 साली इंडोनेशियाच्या सुवर्ण महोत्सवी स्वातंत्र्यदिनी पटनाइक यांना इंडोनेशियाने 'बितांग जसा उताम' हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार दिला.

दोन्ही देशांमधले आणि पर्यायाने दोन्ही नेत्यांमधले संबंध नंतर किती घनिष्ट याची साक्ष देणारा हा एक प्रसंग.

डॉ. सुकर्णो यांना ज्या दिवशी मुलगी झाली त्यावेळी खूप जोरदार पाऊस पडत होता आणि मेघांची गर्जना होत होती. त्या मुलीचं नाव मेघावती ठेवा, असं पटनाइक यांनी सुकर्णो यांना सुचवलं.

पुढे चालून मेघावती देशाच्या पाचव्या राष्ट्राध्यक्ष झाल्या. त्यांनी 2001 ते 2004 मध्ये एका मुस्लीमबहुल देशाची धुरा सांभाळली, असं करणाऱ्या त्या जगातल्या सहाव्या महिला होत्या.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)