झिम्बाब्वेचे 'पेंन्टेड लांडगे' : आफ्रिकेतील जंगलात हे आहेत खरे राजे

    • Author, जॉनथन अॅमॉस
    • Role, बीबीसी सायन्स प्रतिनिधी

ते विस्मयकारक आहेत, यात शंकाच नाही आणि या प्राण्याला दिलेलं 'पेंन्टेड लांडगे' हे नावही त्यांना साजेसं असंच आहे.

ठिपके ठिपके असणारी बदामी आणि पांढऱ्या रंगाची त्यांची कातडी आणि त्यामधून डोकावणारे पांढरे चट्टे सूर्यप्रकाशात लख्ख चमकतात. 

तुम्हाला हा प्राणी लवकरच ओळखीचा होणार आहे आणि कदाचित तुम्ही त्याच्या प्रेमातही पडाल. डेव्हिड अॅटेनबरो यांची येऊ घातलेली नवी टिव्ही मालिका 'डायनॅस्टी'मध्ये तो झळकणार आहे. 

लोप पावत चाललेल्या या आफ्रिकी जंगली कुत्र्यांचं चित्रीकरण करण्यासाठी बीबीसीने झिम्बॉब्वेच्या मॅना पूल नॅशनल पार्कमध्ये अनेक महिने घालवले आणि वन्यजीव फोटोग्राफर निक डायर यांच्या मते प्रेक्षकांना ते फार आवडतील. 

लंडनमध्ये माजी फंड मॅनेजर आणि मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह राहिलेले निक आता या प्राण्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत आहेत. खांद्यावर तीन बॅगा लटकवून झिम्बेझी नदीच्या पूरपात्रात ते त्यांचा कॅमेरा घेऊन भटकत असतात. 

ते म्हणतात, "दिवसा ते सहसा झोपलेले असतात. मात्र जागे असताना पूर्ण वेळ ते आनंदाने उड्या मारण्यात आणि बागडण्यात घालवतात. त्यांचे सामाजिक बंध फार घट्ट असतात. ते खूप खेळकर आहेत. विशेषतः पिल्लांसोबत आणि एकमेकांच्या मागे धावतात, एकमेकांच्या शेपट्या ओढतात. हे सगळं बघणं खूपच आनंद देणारं असतं."

पेंन्टेड लांडग्यांबद्दल सर्वांत पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते लांडगे नाहीत आणि कुत्रे तर नाहीच नाही. 

कुत्र्यांशी साधर्म असलेल्या जातीतील ती एक वेगळी प्रजाती आहे. त्यांचं शास्त्रीय नाव लाईकाओ पिक्टस (Lycaon Pictus) असं आहे. याचा अर्थ 'पेंन्टेड लांडग्यांसारखा'. 

(इशारा : काही वाचकांना पुढील फोटो विचलित करणारे वाटू शकतात)

त्यांचं वर्तन हे बरंचस लांडगे आणि कुत्र्यांसारखं असतं. ते सतत हालचाली करतात आणि सतत गोंगाट करत असतात. 

निक सांगतात, "ते वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढतात. मात्र त्यातला सर्वांत प्रेमळ आवाज म्हणजे त्यांचं 'हू' (hoo) करणं."

"झुंडीतून वेगळे झाल्यावर ते डोकं खाली करून हू हू असा आवाज करतात. तो आवाज विश्वास बसणार नाही इतका प्रेमळ असतो. मात्र दोन किलोमीटर दूरपर्यंत ऐकू येऊ शकतो. मोठे मोठे कान टवकारून झुंडीतले इतर सदस्य हा आवाज ऐकून त्या दिशेने जातात आणि हरवलेल्या जंगली कुत्र्याला पुन्हा आपली झुंड सापडते."

मात्र त्यांचा खूप घाण वास येतो. निक यांनी यासंदर्भातली एक आठवण सांगितली. एका जंगली कुत्र्याने काळविटाची शिकार केली होती. ती खाल्यावर त्यांने गरळ ओकली आणि त्यात तो लोळला. दुसऱ्या जंगली कुत्र्याने तेच खाल्लं आणि त्यानेही काही वेळाने गरळ ओकून त्यात अंग घासलं. कदाचित शिकार करण्यासाठीची त्यांची ही युक्ती असावी. 

"त्यांना आफ्रिकेमधले सर्वांत प्रभावी शिकारी मानलं जातं. त्यांनी शिकार केलेले जवळपास 80% प्राणी ठार होतातच. मला स्वतःला ही जरा अतिशयोक्तीच वाटते. मात्र सिंह, चित्ता किंवा बिबट्यापेक्षा ते चांगले शिकारी आहेत, हे नक्की."

हे जंगली कुत्रे माणसांसाठी नुकसानकारक असल्याचं बोललं जातं. युरोपातून आफ्रिकेत येऊन स्थायिक झालेल्यांनी या प्राण्यांचा छळच केला. हे प्राणी धान्यसाठा फस्त करत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

शेकडो वर्षांपूर्वी आफ्रिकेत पाच लाख पेंन्टेड लांडगे होते आणि आता फक्त सहा हजार उरले आहेत. 

झिम्बॉब्वेमधल्या या मोठ्या अभयारण्यात ते सुरक्षित आहेत. मात्र जिथे त्यांचा माणसांशी संबंध येतो तिथे त्यांना अजूनही परिणाम भोगावे लागतात. माणसांनी लावलेल्या सापळ्यात अडकून किंवा रस्त्याच्या कडेला गाडीखाली येऊन त्यांना जीव गमवावा लागतो. 

मानवी वस्तीच्या जवळ गेल्याने तिथल्या कुत्र्यांना होणाऱ्या आजारांची लागण होऊनही अनेक जंगली कुत्री दगावली आहेत. 

नॅचरल हिस्ट्री म्युझियमतर्फे दरवर्षी आयोजित होणाऱ्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इअर (WPY) स्पर्धेत भाग घेण्यासाठी निक नुकतेच लंडनला जाऊन आलेत.

तिथे 'Ahead Of The Game' या त्यांच्या फोटोची खूप प्रशंसा झाली आणि तो फोटो खूप धक्कादायकही होता. 

फोटो बघितला की दोन जंगली कुत्री एकमेकांशी खेळत असताना दिसतं. मात्र बारकाईने बघितलं की त्याची तीव्रता कळते. यातल्या एका जंगली कुत्र्याच्या तोंडात बबूनचं मुंडकं आहे. 

हे जंगली कुत्रे माकडांची शिकार करत नाहीत. मात्र मॅना पूल अभयारण्यात त्यांची संख्या वाढल्याने आता बबूनही त्यांची शिकार होऊ लागले आहेत. 

निक यांनी बरंचसं काम 'पेंन्टेड वुल्फ फाउंडेशन'च्या माध्यमातून केलं आहे. अॅटेनबरो यांच्या नव्या मालिकेत या कामाचा थेट समावेश करण्यात आला नसला तरी त्यांनी बीबीसीच्या पथकासोबत या जंगली कुत्र्यांना कॅमेऱ्यात कैद केलं आहे. 

कॅमेऱ्यात जे फुटेज मिळालं आहे ते बघून लोकांना या प्राण्यांच्या संवर्धनात रस निर्माण होईल, अशी आशा त्यांना वाटते. 

"बीबीसीचे कार्यक्रम कोट्यवधी प्रेक्षक बघतील आणि त्यामुळे हे जंगली कुत्रे म्हणजे केवळ क्रूर शिकारी आहेत, ही त्यांची प्रतिमा बदलेल. लोकांनी या अभूतपूर्व प्राण्याचं सौंदर्य बघावं आणि त्यांचं संवर्धन व्हायला हवं, अशी भावना त्यांच्यात निर्माण व्हावी, असं मला वाटतं."

डायनॅस्टीज हा कार्यक्रम बीबीसी वनवर रविवारी 11 नोव्हेंबर रोजी 20.30 GMT या वेळी प्रसारित होईल. या मालिकेतल्या पाचव्या भागात 'पेंन्टेड लांडगे' दाखवण्यात येतील. निक यांची काढलेला WPY फोटो नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये ठेवण्यात आला आहे. या चित्रासोबतच पेंन्टेड वुल्फ फाउंडेशनला मदत करण्यासाठी त्यांनी काढलेल्या या जंगली कुत्र्यांच्या सर्वोत्तम फोटोंचं पुस्तकदेखील ठेवण्यात आलं आहे. 

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)