गीर अभयारण्यातल्या सिंहांच्या मृत्यूचं आफ्रिका कनेक्शन

    • Author, रॉक्सी गागडेकर छारा
    • Role, बीबीसी गुजराती, अहमदाबादहून

पूर्व आफ्रिकेत एका प्राणघातक विषाणूच्या संसर्गामुळे सुमारे 30 टक्के सिंह दगावले आहेत. आता हाच विषाणू भारतात गीर जंगलातील सिंहांच्या मुळावर उठला आहे का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Canine Distemper Virus म्हणजेच CDV या जीवघेण्या विषाणूमुळे गीरमध्ये चार सिंहांचा मृत्यू झाल्याची माहिती गुजरात सरकारने दिली आहे. तर तीन सिंहांना याची बाधा झाल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यांना इतर सिंहांपासून वेगळं ठेवण्यात आलं आहे.

आशियाई सिंहांचा जगातील एकमेव संरक्षित अधिवास म्हणजे गीर अभयारण्य... या अभयारण्यात गेल्या तीन आठवड्यात जवळपास 23 सिंहांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूंसाठी CDV विषाणूंची बाधा इथपासून ते हद्दीसाठीची झुंज अशी अनेक कारणं असल्याचं वन अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये मृत्यू झालेल्या अकरा सिंहांचे नमुने तपासण्यात आले. त्यातील चार सिंहांच्या नमुन्यात CDV विषाणू सापडले तर उर्वरित सात सिंहांच्या नमुन्यात प्रोटोझोआ आढळले, अशी माहिती गुजरातचे वन आणि पर्यावरण मंत्री गणपत वसावा यांनी दिली.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला या CDV विषाणूचा शोध लागला. याच विषाणूमुळे तस्मानियातील थायलसीन हा वाघांप्रमाणे काळे पट्टे असणारा आणि कुत्र्यासारखा दिसणारा मांसाहारी प्राणी पूर्णपणे लोप पावला. त्यांना तस्मानीयन वाघही म्हटलं जायचं.

गीरमध्ये मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या सिंहांच्या मृत्यूमुळे प्रशासनही खडबडून जागं झालं आहे.

या विषाणूविरोधी लस लवकरात लवकर आयात करण्याचे प्रयत्न करत असल्याचं जुनागढ वन्यजीव विभागाचे मुख्य संवंर्धक डी. टी. वसवडा यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितलं.

वसवडा म्हणाले, "खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही अमेरिकेतून कुठल्याही प्रकारच्या विषाणू संसर्गासाठी दिली जाणारी औषधं आणि लसी मागवल्या आहेत."

गीरमध्ये दलखानीया रेंजमधली सरसिया भागात सिंहांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वनअधिकाऱ्यांनी या भागातील 23 आणि आसपासच्या भागातील 37 सिंहांना दुसऱ्या ठिकाणी हलवलं आहे. या सर्व सिंहांची प्रकृती उत्तम आहे आणि त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

याव्यतिरिक्त गीर आणि बृहनगीर भागातील सिंहांवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने जवळपास 140 टीम तैनात केल्या आहेत.

धोक्याची घंटा

Canine Distemper Virus म्हणजेच CDV हा विषाणू अत्यंत धोकादायक असून तो खूपच वेगाने पसरतो, असं गुजरातच्या अमरेलीचे वन्यजीव कार्यकर्ते आणि जीवशास्त्रज्ञ राजन जोशी सांगतात.

तंजानियामध्ये 1994 साली या विषाणूच्या साथीमुळे अवघ्या दहा ते पंधरा दिवसात सेरेंगती रेंजमध्ये एक हजार सिंहांचा मृत्यू झाल्याचं ते सांगतात. त्यामुळेच गीरच्या सिंहांचा मृत्यू या CDV विषाणूंमुळे होत असेल तर प्रशासनासाठी ही धोक्याची घंटा असल्याचं ते म्हणतात. CDVची साथ पसरली तर आशियाई सिंह पूर्णपणे नामशेष होतील. म्हणूनच गीरमधल्या सर्वच सिंहांचं देशात इतरत्र पुनर्वसन करावं, असं जोशी सुचवतात.

राज्य सरकारच्या वनखात्याकडे पुरेसा पैसा, मनुष्यबळ आणि स्रोत आहेत. त्यामुळे वनखात्याने सिंहांच्या अधिवासात असलेल्या कुत्र्यांच्या लसीकरणाला प्राधान्य द्यावं, असं वन्यजीवतज्ज्ञ डॉ. भारत जेठवा यांचं म्हणणं आहे.

ते म्हणतात, "कुत्र्यांच्या लसीकरणाची वेळ येऊन ठेपली आहे. त्यासोबतच सिंहांचंही लसीकरण व्हायला पाहिजे."

सिंहाच्या मृत्यूनंतर वनखात्याने आजारी सिंहांना वेगळं करणं आणि त्या परिसरातील इतर सिंहांना इतरत्र हलवण्यामध्ये जी तप्तरता दाखवली, त्याचं जेठवा यांनी कौतुक केलं आहे.

काय आहे CDV विषाणू? आणि कसा होतो संसर्ग?

डॉ. भारत जेठवा वन्यजीव शास्त्रज्ञ आणि वन्यजीवतज्ज्ञ आहेत. बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगतात, "CDV हा प्राणघातक विषाणू आहे आणि तो प्रामुख्याने कुत्री आणि मांजरांमध्ये आढळतो. जे सिंह अभयारण्याच्या वेशीवर असतात आणि त्यांचा कुत्री-मांजर यांच्याशी संपर्क येतो, त्यांना या विषाणूची बाधा होण्याची शक्यता अधिक असते. एकत्रितपणे खाल्लेल्या अन्नातून ही बाधा होते.

हे विषाणू असलेले कुत्रे आणि मांजर ज्या ठिकाणी आहेत, अशा भागात सिंहांचा वावर वाढल्यास विषाणू संसर्गाची शक्यता बळावते. हा विषाणू जीवघेणा असला तरी त्यावर लस उपलब्ध आहे. त्यामुळेच सिंहांचा वावर असलेल्या भागातील कुत्र्यांना ही लस दिली तर आपोआपच सिंहांना या विषाणूची बाधा होण्याचं प्रमाण कमी होईल."

वन्यजीव कार्यकर्ते राजन जोशी सांगतात, त्यांनी अभयारण्याबाहेरही सिंहांच्या हालचाली टिपल्या आहेत आणि सिंहांची शिकार कुत्री आणि मांजरंही खाताना त्यांनी बघितलेलं आहे. यातूनच सिंहांना संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. कारण एकदा शिकार केल्यावर सिंह पुन्हा पुढचे दोन-तीन दिवस ती शिकार खातो.

सरकारचं म्हणणं काय?

राज्य सरकारने मृत सिंहांचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, जुनागढमधील वेटरनरी कॉलेज आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले आहेत.

गुजरात सरकारच्या वन आणि पर्यावरण खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव जे. पी. गुप्ता यांनी गांधीनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, पुण्याच्या संस्थेला चार सिंहांच्या नमुन्यांमध्ये CDV विषाणू सापडले. तर उर्वरित सात सिंहांना बेबिसिया प्रोटोझोआची लागण होऊन त्यांना श्वास घ्यायला त्रास झाल्याने त्यांचा मृत्यू ओढावला.

ते म्हणाले, "संबंधित भागात असलेल्या सर्व सिंहांना आम्ही स्थलांतरित केलं आहे. तसंच बाधित क्षेत्राच्या आसपास समुहाने फिरणाऱ्या सिंहांनाही आम्ही सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवून आहोत. ते पूर्णपणे निरोगी आहेत."

जुनागढच्या वेटरनरी महाविद्यालयाच्या अहवालानुसार सहा सिंहांचा मृत्यू हा गोचिडीसारख्या किटकापासून झालेल्या संसर्गामुळे झाला आहे.

मुख्य संवर्धक डी. टी. वसवडा सांगतात, या संसर्गामुळे सिंहांची श्वसनसंस्था बंद पडते. सरसिया भागातच हा संसर्ग झाला आहे. "राज्यातली एकूण सिंहांपैकी केवळ एक टक्का सिंह या भागात आढळतात."

सरकारने 550 जणांच्या एकूण 140 टीम तैनात केल्या आहेत. त्यात उत्तर प्रदेशातील इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्युटचे पाच तज्ज्ञ, दिल्ली प्राणीसंग्रहालयातील पाच तज्ज्ञ, इटावातील दोन तज्ज्ञ आणि गुजरातमधील तज्ज्ञांचा समावेश आहे.

तीन हजार चौरस मीटरवर पसरलेल्या गीर आणि गीरच्या आसपास जिथे सिंहांचा वावर आहे, अशा बृहनगीर भागातील जवळपास सहाशे सिंहांची तपासणी या टीमनी केल्याचा दावा सरकारने केला आहे. यातील केवळ नऊ सिंह आजारी आहेत. त्यातील चौघांना जागेवरच उपचार देण्यात आले. तर उर्वरित पाच आजारी सिहांवर मदत केंद्रांमध्ये उपचार सुरू आहेत.

डी. टी. वसवडा यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितलं, "या पाच सिंहांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे."

CDVविरोधी लस येत्या पाच ऑक्टोबरपर्यंत गीरमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. "एकदा का लस मिळाली की तज्ज्ञांच्या देखरेखीखाली सर्व सिंहांना ही लस देण्यात येईल."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)