You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जपानच्या 'या' जंगलात जाऊन लोक आत्महत्या का करतात?
अमेरिकेतल्या युट्यूब स्टार लोगेन पॉल यानं जपानच्या एका जंगलात एका मृतदेहाचा व्हीडिओ शेअर केला होता. त्याच्या या व्हीडिओवर बरीच टीका झाली.
पण त्याच्या या व्हीडिओमुळे ओकिगाहारा जंगलसुद्धा चर्चेत आलं आहे. याच जंगलात पॉलने हा व्हीडिओ मित्रांसमवेत बनवला होता. या जंगलात त्यांना आत्महत्या केलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह मिळाला होता.
इथं अशा अनेक आत्महत्या झाल्या आहेत, म्हणून या जंगलाला 'आत्महत्यांचं जंगल' म्हटलं जातं.
या व्हीडिओमध्ये पॉल हसताना दिसतो आहे. अनेकांनी हा व्हीडिओ अपमानकारक असल्याची टीका केली. म्हणून या प्रकारानंतर पॉलनं माफी मागत हा व्हीडिओ काढून टाकला.
माफी मागताना पॉल म्हणाला की त्याचा उद्देश आत्महत्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा होता, नकारात्मकता पसरवण्याचा कोणताही उद्देश नव्हता.
ट्विटरवर तो म्हणतो, "या जंगलात मृतदेह दिसल्यानंतर मला धक्काच बसला. त्यातून माझ्या हातून ही चूक झाली. मी हा व्हीडिओ पोस्ट करायला नको होता. हा मृतदेह दिसल्यानंतर मी कॅमेरा बंद करायला हवा होता. मला स्वतःलाच लाज वाटत आहे."
आत्महत्यांचं जंगल
पण जपानमधील हे जंगल आहे तरी कसं? या जंगलाला सुसाईड फॉरेस्ट किंवा आत्महत्यांचं जंगल का म्हणतात?
ओकिगाहारा जंगलात मृतदेह सापडणं ही नवीन बाब नाही. कारण दरवर्षी अनेक लोक इथं आत्महत्या करतात.
हे जंगल टोकिओपासून 100 किलोमीटर अंतरावर फुजी पर्वताच्या पायथ्याशी आहे. दरवर्षी या जंगलात साधारणपणे 50 ते 100 लोक आत्महत्या करतात. या जंगलात अत्यंत गर्द झाडी आहे.
त्यामुळं इथं हवासुद्ध नीट खेळती राहत नाही. या जंगलात प्राणीसुद्धा नाहीत. त्यामुळेच हे जंगल अत्यंत शांत आहे. या जंगलात गुहा आहेत.
असंच एक ठिकाण म्हणजे सॅनफ्रान्सिस्कोचा गोल्डन गेट ब्रिज. दरवर्षी या पुलावरूनही अनेक लोक आत्महत्या करतात. तशाच प्रकारे या जंगलात अनेकांनी शेवटचा श्वास घेतला आहे.
या जंगलातील मृत्यूंच्या कथांवर बेतलेला 'द फॉरेस्ट' हा सिनेमा 2016 मध्ये रिलीज झाला होता.
या जंगलात आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासनानं विविध प्रयत्नही केले आहेत.
या जंगलात प्रवेश करताच एक फलक दिसतो - "तुम्हाला मिळालेल्या या जीवनाचा पुन्हा एकदा विचार करा. आपले आई-वडील, भाऊ-बहीण यांचा विचार करा. एकट्यानं सारं सहन करण्यापूर्वी कुणाला तरी संपर्क करा."
या नोटीस बोर्डवर संपर्कासाठी फोन नंबरही देण्यात आले आहेत.
आत्महत्यांची प्रेरणा साहित्यातून?
असं म्हटलं जातं की जपानमधल्या एका साहित्यकृतीवरून या आत्महत्या सुरू झाल्या. 1960मध्ये सेइचो माट्सुमोटो यांची 'कुरोई जुकाई' ('The Black Sea of Trees') ही कथा प्रसिद्ध झाली होती. या कथेत एका प्रेमीयुगुलानं ओकिगाहारा जंगलात आत्महत्या केल्याची घटना रेखाटण्यात आली आहे.
काही लोकांचं मत आहे की, या जंगलात आत्महत्या करण्याची परंपरा 19व्या शतकापासूनच सुरू आहे. या प्रथेचं नाव 'उबासुते' असं होतं. या प्रथेत दुष्काळात वयस्कर लोकांना इच्छामरणानुसार या जंगलात मरण्यासाठी सोडलं जायचे.
1993 मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'The Complete Handbook of Suicide' या पुस्तकात या जंगलाचा उल्लेख मरण्यासाठीची सर्वोत्तम जागा, असा करण्यात आला आहे. याच पुस्तकात गळफास घेऊन मरण्याचा उल्लेख 'वर्क ऑफ आर्ट' असा केला आहे.
हे पुस्तक प्रचंड खपलं. पण नंतर जपान सरकारनं या पुस्तकावर बंदी घातली.
आत्महत्या
जगभरात दरवर्षी 8 लाख लोक आत्महत्या करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार सर्वाधिक आत्महत्या होत असलेल्या पहिल्या 5 देशांमध्ये जपान आहे.
टोकियोमधल्या टेम्पल युनिव्हर्सिटीमधील मानसशास्त्रज्ञ वतरू निशिदा म्हणाले, "एकटेपणा आणि नैराश्य ही आत्महत्येमागची महत्त्वाची कारणं आहेत."
काही तज्ज्ञांचं मते, जपानमध्ये वृद्ध लोक बऱ्याचदा आत्महत्या करून जग सोडतात. निशिदा म्हणतात, "एकट्या राहणाऱ्या वृद्धांकडे त्यांच्या मुलांचं दुर्लक्ष होत असतं. म्हणून अशा वृद्धांमध्ये आत्महत्यांचं प्रमाण वाढत आहे."
'आत्महत्या पाप नाही'
जपानमधल्या आत्महत्यांमागे पारंपरिक कारणंही आहेत. निशिदा म्हणतात, "याचं कारण असंही असू शकतं की, जपान कधी ख्रिश्चन धर्माच्या प्रभावाखाली नव्हता. त्यामुळे जपानमध्ये आत्महत्या कधी पाप मानली गेली नाही."
काही तज्ज्ञांचं मत आहे की, जपानमध्ये राग आणि नैराश्य व्यक्त करण्याचे फारसे मार्ग नाहीत. जर तरुणांवर ज्येष्ठांचा दबाव असेल तर त्यांना आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नसतो.
या परिस्थितीला जपानमध्ये "हिकिकोमरी" म्हटलं जातं. हा एक तीव्र स्वरुपाचा एकटेपणा असतो ज्यात तरुण घरातून बाहेर पडत नाहीत.
हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)