You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
...अन् विमान उडवताना पायलटने तिच्या कानाखाली लगावली!
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एका वैमानिकाने भर उड्डाणादरम्यान त्याच्या महिला सहकाऱ्याच्या कानाखाली लगावली. अर्थातच जेट एअरवेजने दोन्ही वैमानिकांना बडतर्फ केलं.
1 जानेवारीला 324 प्रवाशांना घेऊन हे विमान लंडनहून मुंबईला येत असताना कॉकपिटमध्ये हे भांडण झाल्याचं जेट एअरवेजने मान्य केलं आहे. आणि सुदैवाने ते विमान मुंबईत सुखरूप उतरलं.
या दोन वैमानिकांमध्ये गैरसमजुतीमुळे उडत्या विमानातच भांडण झाल्याचं सांगत जेट एअरवेजने त्यांच्यावर बंदी घातली आहे.
पण ही वाऱ्यावरच्या कसरतीची वेळ ओढवली तरी कशी?
विमानातल्या प्रवाशांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार झालं असं की, लंडनवरून निघालेल्या या विमानातल्या दोन वैमानिकांमध्ये काही तरी गैरसमजुतीतून वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला गेला अन् पुरुष वैमानिकाने महिला वैमानिकाच्या कानाखाली लगावली.
मग महिला वैमानिक कॉकपिटमधून बाहेर आली आणि काही वेळानं ती पुन्हा कॉकपिटमध्ये गेली.
हा असा प्रकार घडल्याचं जेट एअरवेजच्या प्रवक्त्यानं मान्य केलं, पण त्यांच्याकडून बीबीसीला अधिक माहिती मिळू शकली नाही.
मात्र नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला या घटनेची माहिती देण्यात आल्याचंही प्रवक्त्यानं सांगितलं.
"प्रवासी सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कोणताही कृत्याला थारा दिला जात नाही. तसंच प्रवाशी, कर्मचारी आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेला जेट एअरवेज सर्वोच्च प्राध्यान्य देते," प्रवक्त्यानं सांगितलं.
भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी लोकसभेत शून्य प्रहरात हा मुद्दा चर्चेला घेतला. विमान इतक्या उंचीवर असताना वैमानिकांनी असं भांडण करणं, हा प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार असल्याचा मुद्दा सोमय्या यांनी चर्चेदरम्यान मांडला.
या चर्चेला उत्तर देताना नागरी हवाई उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करण्यात येईल आणि कोणी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असं स्पष्ट केलं.
आणखी वाचा -
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)