You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फोटो पाहा : सुमात्राच्या जंगलात ओरांगउटानला वाचवताना...
उत्तर सुमात्रामधलं 'लेयुसर इकोसिस्टम' म्हणजेच एक प्रकारचं वर्षा वन असून या वर्षा वनाला युनस्कोचा जागतिक वारशाचा दर्जा लाभला आहे. दक्षिण-पूर्व आशियामधलं हे एकमेव आणि सगळ्यांत मोठं असं वर्षा वन आहे. तसंच ओरांगउटान यांचा आधिवास या वनांमध्ये असून इथल्या धोकादायक प्रजातींमध्ये त्यांची गणना होते.
मात्र, जागतिक वारशाचा दर्जा प्राप्त असूनही मोठ्या प्रमाणात पाम ऑईल वृक्षांच्या लागवडीमुळे वनाचे मूळ क्षेत्र कमी होत आहे. याचा परिणाम इथल्या नाजूक पर्यावरण संस्थेसह धोक्यात आलेल्या वन्यजीवांवरही होत आहे.
फोटोग्राफर चार्ली डेली यांनी सुमात्राच्या या भागाचा दौरा केला असून इथे धोक्यात आलेल्या ओरांगऊटानना शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
सुमात्रात आढळणाऱ्या ओरांगउटानचा नैसर्गिक अधिवास हीच वर्षा वनं आहेत. या लेयुसर वनांच्या सीमेवर हे ओरांगउटान जास्त संख्येने आढळतात. त्यातही जवळपास 40 फुटांचं आच्छादान असलेल्या या उष्णकटिबंधीय वनांच्या ट्रिपा, क्लेऊट आणि सिंखील या भागात ओरांगउटानची घनता जास्त आहे.
पाम ऑईल कंपन्यांनी या भागात प्रवेश केल्यानंतर त्यांना इथल्या जंगलामुळे पाम ऑईलच्या झाडांची लागवड करता आली नाही. इथल्या पाणथळ जागांमध्ये झाडं लावण्यासाठी कंपन्यांना इथे पाणी वाहून नेणारे कालवे खणावे लागले. त्यानंतर इथली मूळ झाडं जाळण्यात आल्यानंतर ओरांगउटानना आपली वस्ती सोडावी लागली.
पाम ऑईल उत्पादनांचा सुपरमार्केटमधल्या 50 टक्के उत्पादनांमध्ये वापर केला जातो. यात खाद्यपदार्थांपासून सौंदर्य प्रसाधनं आणि औषधांचा समावेश आहे.
डॉ. इयान सिंगलटन हे 'Sumatran Orangutan Conservation Programme'चे (SOCP) संचालक आहेत. गेल्या 20 वर्षांपासून सुमात्रातल्या ओरांगउटानसोबत काम करत आहेत. त्यांचं संरक्षण करणं तसंच जे लोक त्यांना पाळीव प्राणी म्हणून ठेवत असतील अशांकडून या ओरांगउटान माकडांना मिळवून त्यांचं पुनर्वसन करणं, ही कामं ते पाहतात.
तसंच SOCP च्या टीमचं मुख्य काम म्हणजे मूळ आधिवासापासून भरकटलेल्या ओरांगउटानचं संरक्षण आणि पुनर्वसन करणं हे आहे. त्यांची योग्य शुश्रृषा झाल्यानंतर त्यांना पुन्हा जंगलात सोडण्यात येतं.
SOCP टीम सध्या या वनांमधल्या सुरक्षित स्थळांमध्ये दोन स्वतंत्र ठिकाणी ओरांगउटानच्या प्रजातींची पैदास करत आहे, जेणेकरून त्यांची प्रजाती सुरक्षित वास्तव्य करू शकतील. आतापर्यंत 350 ओरांगउटानना अशा ठिकाणी सोडण्यात आलं आहे.
SOCPच्या एका फिल्डवरील टीमला एकदा आपत्कालिन संदेश मिळाला की, ओरांगऊटानची एक मादी आणि तिचं पिल्लू ट्रिपा भागातल्या धोकादायक परिसरात असून तिथे मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे.
ही मादी आणि तिचं पिल्लू पाम ऑईलने वेढलेल्या परिसरात होते. टीमने त्या मादीला बेशुद्ध करण्याचा निर्णय घेतला आणि नजीकच्या जांबी या सुरक्षित भागात सोडण्याचं ठरवलं.
या मादी आणि तिच्या पिल्लाला सुरक्षित स्थळी आणल्यानंतर ते दोघंही घनदाट जंगलात निघून गेले.
इथल्या पर्यावरणाला जर पाम ऑईल कंपन्यांपासून वाचवलं नाही आणि औद्योगिकरणाला रोखलं नाही तर सुमात्रन ओरांगउटान जगातून नाहीसे होतील, असं डॉ. सिंगलटन यांचं मत आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)