You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फ्रान्सच्या समुद्र किनाऱ्यावर पहिल्या महायुद्धातील पाणबुडीचे अवशेष
पहिल्या महायुद्धाचे काही अवशेष आता नव्याने खुणावू लागले आहेत. पहिल्या महायुद्धात जर्मनीने वापरलेली पाणबुडी फ्रान्सच्या उत्तरेकडील समुद्रकिनाऱ्यावर दिसू लागली आहे. गेली अनेक दशकं ही पाणबुडी गाळात रुतून होती.
फ्रान्समधील कॅले शहरातील विसंट समुद्रकिनाऱ्यावर UC-61 या जर्मन पाणबुडीचे अवशेष पाण्यातून वर येत आहेत. जुलै 1917 मध्ये ही पाणबुडी या ठिकाणी आणण्यात आली होती.
या पाणबुडीत पाणी शिरल्यानंतर त्यातील खलाशांनी पाणबुडीला या समुद्रकिनाऱ्यावर सोडून जीव वाचवला. त्यानंतर 1930 पर्यंत ही पाणबुडी या समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत खाली रुतून बसली होती.
ही पाणबुडी वर येत असल्यामुळे ती आता पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनली आहे. मात्र पाणबुडीचं हे दर्शन क्षणिक ठरू शकतं, असं स्थानिक महापौरांचे म्हणणे आहे.
डिसेंबरपासून ओहटीच्या वेळी या पाणबुडीचे दोन भाग दिसत आहेत.
विसंटचे महापौर बर्नार्ड ब्रॉक सांगतात, "भरती-ओहोटी आणि वाऱ्याच्या विशिष्ट वेगामुळे वाळूची हालचाल झाल्याने दर दोन-तीन वर्षांत पाणबुडी दिसते. मात्र जोरदार वारे वाहू लागले की वाळू आणखी सरकते आणि ही पाणबुडी पुन्हा दिसेनाशी होते."
मात्र स्थानिक गाईड विंसेंट शमिट यांच्या मते सध्याचा वाऱ्याचा वेग आणि भरती-ओहोटीची परिस्थिती बघता पाणबुडी आणखी वर येईल.
ते सांगतात, "विसंटमधील सर्व रहिवाशांना इथे पाणबुडी आहे, हे माहिती आहे. मात्र हे अवशेष बहुतांश गाळाखालीच असतात. त्यामुळे दिसत नाहीत."
"ते अधेमधे दिसतात. मात्र यावेळी पहिल्यांदाच पाणबुडीचा एवढा मोठा सांगाडा दिसला."
जर्मनीच्या पाणबुड्यांना यू-बोट म्हटले जायचे. या पाणबुड्या युरोपातून धान्यसाठा आणि इतर जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या ब्रिटिश जहाजांना लक्ष्य करायच्या. अशी शेकडो जहाजं या यू-बोट्सनी बुडवली होती.
यूसी-61 पाणबुडीने पाण्याखाली सुरुंगस्फोट घडवून किंवा पाण्याखालून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या सहाय्याने जवळपास 11 जहाजं बुडवली होती, असं इतिहासकार सांगतात.
ही पाणबुडी बेल्जियममधील झिब्रुगा बंदराहून निघून फ्रान्समधील बुलॉयन-सूर-मेर आणि ली हॅवरे बंदराजवळ सुरुंग पेरण्याच्या कामगिरीवर निघाली होती तेव्हा शत्रुराष्ट्राच्या नौदलाने तिला ताब्यात घेऊन विसंटच्या समुद्रकिनाऱ्यावर आणले.
आणि त्यानंतर पाणबुडीवरील 26 खलाशांनी फ्रान्सच्या अधिकाऱ्यांसमोर शरणागती पत्करली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)