जालियनवाला बाग हत्याकांड : 'ब्रिटिशांनी संसदेत बिनशर्त माफी मागावी'

    • Author, रविंदरसिंग रॉबिन
    • Role, बीबीसी पंजाबी

जालियनवाला बागेत घडलेल्या शोकांतिकेला 99 वर्षं पूर्ण होत आहेत. या हत्याकांडात ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांच्या मनावर आजही त्या घटनेचे व्रण कायम आहेत.

13 एप्रिल 1919 रोजी झालेल्या या अमानुष घटनेमुळे तत्कालीन भारत हादरला आणि तिथूनच स्वातंत्र्य लढ्याला कलाटणी मिळाली.

बैसाखीचा सण साजरा करण्यासाठी एकत्र आलेल्यांवर गोळ्या चालवण्याचे आदेश ब्रिगेडिअर जनरल डायर यांनी दिले आणि रायफलधारी 50 पोलिसांनी नि:शस्त्र जमावावर अंधाधुंद गोळीबार सुरू केला.

इतिहासतज्ज्ञांच्या मते या गोळीबारात सुमारे एक हजार लोक मारले गेले, तर 1100 लोक जखमी झाले. ब्रिटिश सरकारनं ही घटना खेदजनक असल्याचं काळाच्या ओघात मान्य केलं आणि 2013च्या भारतभेटीत तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांनी तसं जाहीरपणे म्हटलंही.

जालियनवाला बागमध्ये झालेल्या गोळीबारात ठार झालेल्या, जखमी झालेल्यांच्या कुटुंबीयांच्या मनात आज, शंभर वर्षें होत आली तरी त्या आठवणी जिवंत आहेत. त्यातल्या काहींनी बीबीसीशी बोलताना त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

निवृत्त मुख्याध्यापक सत्पाल शर्मा यांचे आजोबा अमीन चंद (45) हे पायघोळ काळा कोट आणि पायजमा अशा पोशाखात जालियनवाला बागेतल्या सभेसाठी गेले होते.

शहरात तणाव होताच. त्या दिवसाबद्दल सत्पाल यांना वडिलांनी सांगितलं होतं. पेशानं वैद्य असलेले त्यांचे आजोबा गोळीबार झाला तेव्हा स्टेजच्या जवळ उभे होते.

"शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे वडिलांना तत्काळ बाहेर पडून आजोबांचा शोध घेता आला नाही. दुसऱ्या दिवशी जालियनवाला बाग इथं मृतदेहांच्या राशीत त्यांना आजोबांचा मृतदेह मिळाला," अशी माहिती सत्पाल यांनी दिली.

त्यांचे वडिल आणि आजी दरवर्षी न चुकता जालियनवाला बागेत जातात आणि तेथं श्रध्दांजली वाहतात.

"बागेविषयी आमच्या भावना इतक्या तीव्र आहेत, की जालियनवाला बागेचं महत्त्व कोणत्याही पवित्र स्थळापेक्षा कमी नाही," असं सत्पाल यांच्या पत्नी कृष्णा म्हणतात.

"लग्नानंतर माझ्या सासऱ्यांनी आम्हाला सुवर्णमंदिरात नेण्याआधी या बागेत हुतात्म्यांचं दर्शन घेण्यासाठी आणलं होतं," अशी माहितीही त्यांनी दिली.

जालियनवाला बागमध्ये आम्ही ज्या ज्या वेळी गेलो त्या त्या वेळी माझ्या सासऱ्यांच्या डोळ्यात मी अश्रू पाहिलेत. एवढंच नव्हे तर, नवरा आणि सासरे यांनी जेव्हा त्या घटनेविषयी सांगितलं, तेव्हा मलाही रडू आवरलं नव्हतं, असं कृष्णा यांनी सांगितलं.

शाळेच्या अभ्यासक्रमात या शोकांतिकेविषयी विस्तृत माहिती नाहीये, पण तरीही मी मुलांना जालियनवाला बागमध्ये नेऊन त्या घटनेविषयी सांगत असे, असं शर्मा यांनी स्पष्ट केलं.

याच दुर्घटनेत, आजोबा गमावलेले महेश बहल यांनीही त्या दिवशीच्या हृदयद्रावक घटनेबद्दल माहिती दिली. त्यांचे आजोबा लाला हरी राम यांच्याविषयी त्यांच्या आजी, रतन कौर खूप गोष्टी सांगायच्या.

"माझ्या आजोबांना घरी आणलं तेव्हा त्यांच्या पायाला आणि छातीला गोळी लागलेली होती, भरपूर रक्त वाहत होतं. शहरात सगळीकडे प्रचंड गडबड होती. वैद्यकीय मदतही मिळू शकली नाही. आपण देशासाठी प्राण देत असून मुलांनीही त्याच मार्गावर चालावे, हे त्यांचे शेवटचे शब्द होते,"असं बहल म्हणाले.

माझ्या आजीनं त्यांच्यासाठी खीर बनवली होती. ते घरी आल्यावर खीर खाणार होते. पण ते परतलेच नाहीत, हे सांगताना त्यांचा स्वर जड झाला होता.

"आमच्या कुटुंबानं खूप सहन केलं. आजोबांच्या इच्छेप्रमाणे आम्ही सगळ्यांनीच परकीय सत्तेशी लढा दिला. 1997मध्ये जेव्हा ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ भारतात आल्या होत्या तेव्हा आम्ही दिल्लीत हाती फलक धरून निदर्शनंही केली होती.

"प्रायश्चित्त घेतल्याशिवाय राणींच्या अमृतसर दौऱ्याला अर्थ नाही, ही आमची भूमिका होती," असं बहल म्हणाले.

या शोकांतिकेची शताब्दी साजरी होत असताना, सरकारनंही वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले आहेत. परंतु, या कुटुंबांना त्याच्याशी फारसं देणंघेणं नाही.

दोन वर्षांपूर्वी पंजाब सरकारनं सत्पाल शर्मा यांना ओळखपत्र दिलं. "त्याचा काय उपयोग आहे, तेच आम्हाला माहिती नाही. राज्यभरात आम्हाला टोल भरण्यापासून मात्र सूट मिळाली आहे," असं शर्मा यांनी सांगितलं. यूकेच्या संसदेत ब्रिटिश सरकारनं बिनशर्त माफी मागावी, अशी या कुटुंबीयांची मागणी आहे.

गेली काही वर्षं एस. के. मुखर्जी जालियनवाला बागेत जात आहेत. मुखर्जी यांचे आजोबा त्या दुर्घटनेत जखमी झाले होते. ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ आणि ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांनी 1997मध्ये जालियनवाला बागेला भेट दिली, तेव्हाच्या त्यांच्या स्वाक्षऱ्या मुखर्जी यांनी दाखवल्या.

मुखर्जी म्हणतात, "माफी मागितल्यानं जखमा भरून येतील का ते माहिती नाही. पण आपण आता या स्मारकाचा विकास करून त्या काळ्या दिवसांच्या स्मृती जतन केल्या पाहिजेत."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)