2019 निवडणूक : फेसबुक भारतीय मतदारांना प्रभावित करू शकेल का?

    • Author, तृषार बारोट
    • Role, बीबीसी, भारतीय भाषा डिजिटल एडिटर

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी अमेरिकेच्या सिनेटसमोर एक साक्ष दिली. येत्या काळात अनेक देशात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत किंवा भविष्यातील कोणत्याही निवडणुकीत फेसबुकच्या अपरोक्ष युजर्सच्या माहितीची चोरी होऊ नये यादृष्टीने कोणती पावलं उचलली जाणार आहेत याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

ही त्यांची 2018 सालची सगळ्यांत मह्त्त्वाची गोष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, "जगात ब्राझील, भारत, हंगेरी आणि पाकिस्तान या देशांत निवडणुका आहेत. या निवडणुका नि:पक्षपातीपणे व्हाव्यात यासाठी शक्य ते सगळं आम्हाला करायचं आहे. आम्ही हे सगळं योग्य प्रकारे करू असा आम्हाला विश्वास आहे."

2016 साली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाच्या कंपनीने कोट्यवधी लोकांना राजकीय जाहिराती पाठवल्या होत्या. या प्रकाराची पुनरावृत्ती भारतात होऊ नये यासाठी फेसबुक नक्की काय करणार आहे?

नक्की काय उपाययोजना?

या आठवड्यात फेसबुकनं साडेपाच लाख भारतीय युजर्सना एक नोटिफिकेशन पाठवायला सुरुवात केली आहे. त्यांच्या माहितीचा ब्रिटीश कंपनी केंब्रिज अनालिटिकाकडून गैरवापर झाला असण्याची शक्यता आहे, अशा आशयाचं हे नोटिफिकेशन आहे. डोनाल्ड ट्रंप यांच्या 2016 मधल्या निवडणूक प्रचारामध्ये या कंपनीचा सहभाग होता. या कंपनीने प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली असा त्यांचा दावा आहे.

या कंपनीने काँग्रेस आणि भाजपसाठीसुद्धा संशोधन केल्याची माहिती आहे. पण कोणत्याही राजकीय पक्षासाठी फेसबुकच्या भारतीय युजर्सच्या माहितीचा गैरवापर झाल्याचा कोणताही पुरावा सध्या तरी उपलब्ध नाही.

2019 च्या निवडणुकांपर्यंत 50 कोटी लोकांपर्यंत इंटरनेट पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपली राजकीय भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठीस इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर होण्याची शक्यता आहे.

अमेरिका किंवा जगातल्या कोणत्याही इतर देशांपेक्षा भारतात जास्त फेसबुक युजर्स आहे. त्यामुळे 2016 सालची पुनरावृत्ती होऊ नये, कोणत्याही परदेशी कंपनीने गैरवापर करू नये यासाठी फेसबुकनं ठोस पावलं उचलण्याची गरज आहे.

फेसबुक कोणत्या उपाययोजना करणार याची माहिती झुकरबर्ग यांनी अमेरिक सिनेटलादिली

  • राजकीय अकाउंट्स ओळखणं आणि फेक अकाउंट्स काढून टाकण्यासाठी हजारो लोकांना कामाला लावलं जाईल.
  • राजकीय विषयासंबंधी जाहिरात चालवायची असल्यास जाहिरातदाराचं लोकेशन किंवा ओळखीची पडताळणी होईल.
  • युजर्सच्या टाईमलाईनवर दिसणाऱ्या जाहिरातींसाठी कोणी पैसै दिले आहेत याची माहिती देण्यात येईल.
  • फेक अकाउंट आपोआप ओळखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवणार.
  • फेक न्यूज आणि राजकीय जाहिराती तयार करणारी रशियामधील शेकडो फेक फेसबुक अकाउंट्स नष्ट करणार

त्यामुळे राजकीय पक्षांना आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फेसबुक हे खात्रीलायक माध्यम असेल का? याचं उत्तर जवळजवळ नाही असंच आहे. इथे दिसणारे अनेक व्हीडिओ किंवा मीम्स कोणत्या तरी एका राजकीय पक्षाने प्रकाशित केलेली असतात. तरी प्रत्येक पक्ष त्यांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्यांचे विचार कायदेशीर पद्धतीनं पोहोचवू शकतात.

न्यूजफीडमध्ये फेसबुकनं केलेल्या बदलामुंळेसुद्धा राजकीय पक्षांना फायदा होऊ शकतो. अनेक काँमेंट आणि शेअर्स (राजकीय पक्षाचे समर्थक उत्साहात काँमेंट करत असतातच) युजर्सच्या टाईमलाईनवर दिसतील.

व्हॉट्सअॅपचं काय?

फेसबुकनं अनेक बातम्यांनी स्थान मिळवलं. पण फेसबुकचीच मालकी असलेल्या व्हॉट्सअपबद्दल झुकरबर्ग यांनी मौन बाळगलं आहे. व्हॉट्सअॅपवर फिरणाऱ्या व्हीडिओचा काय स्रोत आहे ते फेसबुकसारखं व्हॉट्सअॅप वर कळत नाही. फेक न्यूज या माध्यमातून अतिशय लवकर पसरतात त्यांचा स्रोत काय आहे हे समजणं आणि ते थांबवणं जवळजवळ अशक्य आहे.

फेक न्युजमुळे अनेक गंभीर परिणाम झाले आहेत. फेक न्यूजमुळे जातीय हिंसाचार किंवा जमावाने केलेल्या हत्येचे अनेक प्रसंग घडले. या अडचणींवर मात करण्याचा मोठा दबाव यावर्षी कंपनीवर असेल. त्यामुळे व्हॉट्सअॅप इंडिया ऑपरेशन्ससाठी प्रमुख पदासाठी योग्य व्यक्तींचा शोध घेत आहे. हा नक्कीच योगायोग नाही.

रशियाबरोबर त्यांचा सामना असल्याचं मार्क झुकरबर्ग काल म्हणाले. भविष्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रभाव टाकू नये यासाठी रशियाशी हे युद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. पण रशियाला भारताच्या निवडणुकांवर प्रभाव टाकायचा असेल तर कोणता पक्ष जिंकायला हवा असं रशियाला वाटेल या प्रश्नाचं उत्तर अद्यापही अनुत्तरित आहे.

हेही पाहिलंत का?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)