You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रिन्स हॅरी-मेगन मार्कलच्या शाही लग्नाचं बोलावणं थेरेसा मे, ट्रंप, ओबामांना का नाही?
प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचा विवाहसोहळा विंडसर कासलच्या सेंट जॉर्ज चॅपलमध्ये मे महिन्यात पार पडणार, असं केन्सिंग्टन पॅलेसच्या सूत्रांनी स्पष्ट केलं.
आमंत्रितांमध्ये राजकीय नेत्यांचा समावेश नाही. याचाच अर्थ, प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांनी त्यांच्या विवाहाचं ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना निमंत्रण दिलेलं नाही. तसंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनाही या लग्नासाठी निमंत्रित केलं जाणार नाही.
चर्चचा आकार आणि राजपदाच्या दावेदारांमध्ये प्रिन्स हॅरी यांचा असलेला पाचवा क्रमांक लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रिन्स यांचे मित्र असलेले बराक आणि मिशेल ओबामा यांनाही या सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलेलं नाही.
राजकीय नेत्यांच्या अधिकृत यादी नसलेल्या परंतु या जोडप्याशी जवळचं नातं असणाऱ्यांना लग्नाचं आमंत्रण देण्याचा निर्णय सरकारशी सल्लामसलत करून घेण्यात आल्याचं केन्सिंग्टन पॅलेसनं म्हटलं आहे.
कुणाला आमंत्रण?
या विवाह सोहळ्यासाठी वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या विविध वयोगटातल्या लोकांना निमंत्रित करण्यात आलं आहे, हे या सोहळ्याचं वैशिष्ट्य आहे.
मूकबधिरांसाठी काम करणाऱ्या 14 वर्षांच्या रूबेन लिधरलँड हिला या विवाह सोहळ्याचं निमंत्रण मिळालं आहे. चित्रपटगृहात लागणाऱ्या सिनेमांचं 'डेफ-फ्रेंडली स्क्रीनिंग'चं आयोजन करण्यासाठी तो काम करतो.
"निमंत्रण पाहिलं तेव्हा माझा त्यावर विश्वासच बसत नव्हता. ते बघून मी अक्षरश: नाचलो," असं रूबेन सांगतो.
मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या लोकांना हस्तकलेच्या माध्यमातून मदत करणाऱ्या NGO सोबत काम करणाऱ्या 52 वर्षांच्या पामेला अनोनेझ यांनाही निमंत्रण मिळालं आहे.
"हे आमंत्रण म्हणजे सुरुवातीला मला 'एप्रिल फूल' आहे, असं वाटलं. एकदम अविश्वसनीय अशीच ही गोष्ट. मी 15 वर्षांच्या माझ्या मुलाला लग्नासाठी सोबत नेणार आहे. कारण त्याला मेगन मार्कलला पाहायचं आहे."
रिसायकलिंगचा उपक्रम हाती घेणाऱ्या आणि ब्लीथच्या शाळेत स्टेम क्लब सुरू करणाऱ्या डेव्हिड ग्रेगरी या शिक्षकालासुद्धा निमंत्रित करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात स्वत:च्या लग्नासाठी घातलेला सूट ते या लग्नसोहळ्यासाठीही परिधान करणार आहेत.
सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अशा अनेकांना या शाही सोहळ्याला निमंत्रित करण्यात आलं आहे. 19 मे रोजी विंडसर कॅसलच्या प्रांगणात एकूण 1200 आमंत्रित या सोहळ्यास उपस्थित राहतील.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)