खंबाटकी घाट अपघात : 'मुकादमानं आमचं ऐकलं असतं तर 18 जीव वाचले असते!'

    • Author, सागर कासार आणि स्वाती पाटील-राजगोळकर
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"टेम्पोत आम्ही सगळे दाटीवाटीनं बसलो होतो. काहींना तर बसायलाही जागा मिळालेली नव्हती. त्यात पुन्हा सामानही कोंबलेलं होतं. आम्ही मुकादमाला बोललो की दुसरी गाडी करून जाऊ. पण त्यानं काही ऐकलं नाही. मुकादमानं ऐकलं असतं तर आमच्या लोकांचा जीव वाचला असता," असं चंदू नायक सांगत होते.

पुणे-बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात झालेल्या अपघातात त्यांनी हात गमावला. नायक यांना आम्ही साताराच्या जिल्हा रुग्णालयात भेटलो, जिथं अपघातातल्या जखमींवर उपचार सुरू आहेत.

मंगळवारी पहाटे पाच वाजता टेम्पो उलटून झालेल्या या अपघातात 18 मजूर ठार तर 20 जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन लहान मुलं आणि सहा महिन्यांच्या एका बाळाचा समावेश आहे.

कोण होती ही माणसं?

कर्नाटकातल्या विजापूर जिल्ह्यातल्या तांड्यावस्तीत राहणारे लोक कामाच्या शोधात महाराष्ट्रात येतात. या भागातले मुकादम अशा कामगारांना शोधतात आणि त्यांना महाराष्ट्रातल्या औद्योगिक वसाहतींमध्ये मजूर म्हणून काम देतात.

सोमवारी सायंकाळी मदभाई तांडा, कुडगी तांडा, नागठाणे, हडगली, राजनाळ तांडा आणि आलिका इथून 37 मजुरांना घेऊन एक टेम्पो पुण्याच्या दिशेनं निघाला होता. सेंटरिंग आणि काँक्रीटचं काम करणाऱ्या या मजुरांना टेम्पोमध्ये त्यांच्या सामानासकट अक्षरक्षः जनावरांसारखं कोंबलेलं होतं.

रात्रभर मजल दरमजल प्रवास सुरू होता. शिरवळच्या MIDC मध्ये काम मिळणार आणि आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सुटणार, अशी आशा मजुरांच्या मनात होती. पण टेम्पोत एवढे लोक आणि असं कोंबलेलं सामान बघून त्यातल्या अनेकांच्या डोळ्यांत भीतीही दाटलेली होती.

मंगळवारची पहाट उजाडत असताना सातारा आणि पुण्याच्या दरम्यान लागणाऱ्या खंबाटकी घाटात या मजुरांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला.

टेम्पो उलटा झाला. काही गाडीखाली दबून, काही सामानाखाली अडकून आणि काही एकमेकांवर पडून तब्बल 18 जणांचा मृत्यू झाला.

सातारा जिल्हा रुग्णालयात आम्ही भेटलो त्यापैकी बहुतांश जण धक्क्यातून सावरलेले नव्हते. रुग्ण बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हते. काही नातेवाईक भोवती गोळा झालेले. त्यांच्याशी आम्ही बोललो. काही अपघातग्रस्त रुग्णही बोलले. सारं काही सुन्न करणारं.

'टायर फुटल्याचा आवाज आला!'

"सोमवारी संध्याकाळी टेम्पो निघाला. त्यात आधीच बांधकाम साहित्य होतं. सगळेच दाटीवाटीनं बसलेले होते. रात्री 11 वाजता भोर इथं एका ढाब्यावर आम्ही चहासाठी थांबलो. तिथं चहा घेतला," अशी माहिती अपघातातून बचावलेल्या एकानं दिली.

"इथंच अनेक जणांनी ड्रायव्हरला विनंती केली की, आता रात्री थांबू. सकाळी प्रवासाला सुरुवात करू. पण सगळ्यांनी सांगूनही ड्रायव्हर ऐकायला तयार नव्हता. 'मला अजून एक ट्रीप घेऊन जायची आहे', असं तो सांगत होता. मुकादम पण ऐकायला तयार नव्हता. टेम्पो निघाला. पुढं आल्यावर खंबाटकी घाटात होत्याचं नव्हतं झालं," असं दुसऱ्या एका जखमी व्यक्तीनं सांगितलं.

खंडाळ्याचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांनी सांगितलं, "या अपघातात गाडीचा ड्रायव्हर आणि मुकादम दोघंही मरण पावले आहेत. ड्रायव्हरसोबत त्याचा मुलगाही होता, तोही मरण पावला आहे."

मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले असून या प्रकरणात चालक महिबूब राजासाब आतार आणि मुकादम विठ्ठल खिरू राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं.

या अपघातात जखमी झालेल्या रबिता राठोड यांनी प्रसंग कथन केला. "मी टेम्पोच्या वरच्या बाजूला बसले होते. माझ्याबरोबर आणखी तिघं तिथं बसले होते. रात्री चहा घेताना सगळ्यांनी सांगूनसुद्धा ड्रायव्हरनं थांबण्यास नकार दिला. मुकादमानेही काहीच ऐकून नाही घेतलं.

त्यानंतर काही अंतर कापल्यावर गाडीचा मागचा टायर फुटल्याचा आवाज आला. ड्रायव्हरच्या लक्षात आणून दिलं. चाक फुटलं म्हणून ओरडून सांगितलं. पण उशीर झाला होता. अचानक गाडीनं सहा फूटी कठड्याला धडक दिली. कठड्यावरून टेम्पो उलटा झाला..." सांगता सांगता रबिता यांच्या डोळ्यात पाणी आलं.

मुकादमनं आमचं ऐकलं असतं तर आमच्या लोकांचा जीव वाचला असता, असं चंदू नायक यांना राहून राहून वाटतं.

हे सगळे लोक तांड्यावर राहणारे. मृतांपैकी मदभाई तांड्यावरचे आठ जण, कुडगी तांड्यावरचे तिघं तर हडगलीतले चौघं जण होते.

ज्या तांड्यावरचे आठ लोक मरण पावले, त्या मदभाई तांड्याला आम्ही भेट दिली. गावावर सुतकी कळा पसरलेली होती. संध्याकाळी सगळे मृतदेह येतील, असं त्यांना कळवण्यात आलं होतं.

काम मिळणार म्हणून आनंदानं सगळ्यांचा निरोप घेऊन निघालेली मंडळी आता तांड्यावर परतणार नव्हती.

ही माणसं लमाण समाजातली. सगळेजण रोजगारासाठी महाराष्ट्रात जात असतात. आणि या भीषण दुर्घटनेमुळे अनेक कुटुंबांवर आभाळ कोसळलं होतं.

"आम्ही लमाण समाजाचे लोक. आमच्या गावात रोजगार नाही. रोजीरोटीसाठी आम्ही महाराष्ट्रात मजुरी करायला जातो. खाणकाम, सेंट्रिंग, काँक्रिटिकरणासाराखी कामं तिथं करतो," मदभाई तांड्यावरील प्रेमसिंह राठोड माहिती देत होते.

तांड्यावर मागे राहिलेल्या बायाबापड्यांना आपल्या लोकांना पाहायचं होतं. ते आता आतूरतेनं वाट पाहत होते. पण परत येणाऱ्यांपैकी काही कायमचेच निरोप घेऊन निघून गेले होते. म्हणून गेलेल्यांपैकी काहीच परत येतील, पण या धक्क्यातून सावरण्यास त्यांनाही काळ लागेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)