You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दृष्टिकोन : आजकाल अमित शाह यांची जीभ सारखी का घसरते?
- Author, प्रदीप कुमार
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आपल्या भाषणाची सुरुवात पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी 'भारत माता की जय' या उद्घोषानं केली.
पुढे ते म्हणाले, "10 सदस्यांना सोबत घेऊन सुरू झालेल्या पक्षाची सदस्य संख्या 11 कोटीवर गेली." हा पक्ष जगातला सर्वांत मोठा पक्ष असल्याचा दावा देखील त्यांनी केला.
"एकेकाळी दोन खासदार असलेला पक्ष आता एकूण 330 खासदारांना सोबत घेऊन पूर्ण बहुमतामध्ये सरकार चालवत आहे," असं ते यावेळी म्हणाले.
'अंधकार दूर होईल, सूर्य उगवेल आणि कमळ फुलेल,' असं स्वप्न अटल बिहारी वाजपेयी यांनी पाहिलं होतं. हे कमळ देशातल्या बहुतेक राज्यात पोहोचवण्याचं काम नरेंद्र मोदी-अमित शाह यांच्या जोडगोळीनं केलं आहे. पण लगेच ते एका दुसऱ्या मुद्द्यावर येतात तो म्हणजे 2019च्या निवडणुकीचा मुद्दा.
नरेंद्र मोदींनी काय काय योजना आणल्या याचा पाढा त्यांनी या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन वाचून दाखवला. या योजना गरिबांसाठी सुरू करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
जनधन योजना, उज्ज्वला गॅस योजना, सौभाग्य योजना आणि स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत सुरू असलेलं शौचालय निर्मितीचं कार्य आणि विमा योजना या सर्व योजना गरिबांसाठीच सुरू केल्या आहेत, असं त्यांनी म्हटलं.
प्रत्येक गरिबाला सुखी करण्याचं काम मोदी सरकार करत आहे, असं शहा म्हणाले.
अमित शाह हे भाजपचे चाणक्य समजले जातात. ज्या गोष्टींचा विचार नरेंद्र मोदी करतात तो विचार प्रत्यक्षात आणण्याचं काम अमित शहा करतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात असते. तेच कारण आहे की नरेंद्र मोदी सरकारला कुणी काही प्रश्न विचारलेलं त्यांना आवडत नाही.
राहुल गांधी यांच्या प्रश्नांची दखल न घेता त्यांची थट्टा करत ते म्हणतात, "राहुल बाबा तुम्ही साडे चार वर्षांचा हिशोब मागत आहात, पण जनता तुमच्याकडे चार पिढ्यांचा हिशोब मागत आहे."
ही कसली तुलना आहे? यामुळे मोदी सरकारच्या कामावर काय परिणाम झाला, नेमकं कोणतं काम मोदींना करायचं आहे आणि काँग्रेसच्या आधीच्या सरकारमुळे ते शक्य होत नाहीये, याचं स्पष्टीकरण ते देत नाहीत.
38 वर्षं जुन्या राजकीय पक्षाचे आपण अध्यक्ष आहोत म्हणून ते स्वतःला 'महान' लोकांच्या रांगेत नेऊन बसवतात. पण 129 वर्षं जुन्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांची ते 'राहुल बाबा' म्हणून टर उडवतात.
आता ही गोष्ट वेगळी आहे की त्यांच्या पक्षात अस्सल बाबांना मोठी किंमत दिली जाते. नुकताच त्यांच्या एका मुख्यमंत्र्यांनी पाच बाबांना मंत्र्याचा दर्जा दिला आहे.
पण अमित शाह तिथंच थांबत नाहीत...
ते म्हणतात, "जेव्हा पूर येतो तेव्हा साप, मुंगूस, कुत्रा, मांजर, चित्ता आणि सिंह हे सर्व जण एकाच वेळी वडाच्या झाडावर चढतात. कारण त्यांना पाण्याची भीती वाटते. मोदींचा जो पूर आला आहे त्याच्या भीतीनं हे सर्व प्राणी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचं काम करत आहेत."
केंद्रात सत्ता असणाऱ्या पक्षाच्या अध्यक्षांनी हे उद्गार एखाद्या सार्वजनिक स्तरावर काढले यावर विश्वासच बसत नाही. तुम्ही ते दोनदा किंवा तीनदा ऐकलं तरी तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही.
पण अमित शाहंच्या आत्मविश्वासाला तोड नाही. जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही प्राण्यांबद्दल बोललात ते कुणाला उद्देशून होतं तर ते म्हणतात, "मी साप आणि मुंगसाचं उदाहरण यासाठी दिलं की हे दोन्ही प्राणी कधी एकत्र येत नाहीत. पण मोदींची लाट आली त्यामुळं त्यांचे विचार जुळत नसले तरी ते एकत्र येत आहेत. जर त्यांना वाईट वाटलं असेल तर मी त्यांचं नाव देखील घेऊ शकतो, सपा-बसपा, काँग्रेस आणि तृणमूल, तेलुगू देसम आणि काँग्रेस."
विरोधी पक्षाची प्रतिक्रिया
त्यांच्या या विधानावर विरोधी पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येणार हे उघडच होतं.
काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला म्हणतात की पूर फक्त काही काळासाठीच येतो आणि हा पूर आम्ही रोखू शकतो.
'अमित शाहंचं हे विधान म्हणजे गुन्हेगारी मनोवृत्ती आणि संघाचा कट आहे,' असं बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी म्हटलं.
अमित शाह यांनी मोदी यांची तुलना पुरासोबत केली, पण एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की पुरामुळं कुणाला फायदा होत नाही.
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटलं, "जर सत्ताधारी पक्ष स्वतःच हे मान्य करत आहे की आपण पूर आहोत, तेव्हा जनतेच्या हाती विकासाऐवजी विनाशच लागेल."
राजकीय वास्तव
तसं हे म्हणणं बरोबर आहे की समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष हे एकमेकांची कट्टर विरोधक आहेत. पण एक दुसऱ्यांचा विरोध करणारे पक्ष भारतात काही पहिल्यांदाच एकत्र येत आहेत असं नाही.
नरेंद्र मोदी यांचं केंद्र सरकार आणि 20 राज्यात असलेलं भाजप सरकार 44 पक्षांना सोबत घेऊन चालवलं जात आहे. यापैकी जम्मू आणि काश्मीरमध्ये पीडीपीसोबत भाजपचे असलेले मतभेद तर जगजाहीर आहेत. नितीश कुमार काही दिवसांपूर्वी भाजप विरोधी गटात होते.
ज्या चंद्राबाबू नायडूंची गोष्ट अमित शहा करत आहे त्यांच्या पक्षातील दोन खासदार तर मोदींच्या मंत्रिमंडळात होते.
जनता सरकारचा प्रयोग
कदाचित अमित शाहंना लक्षात नसेल पण इंदिरा गांधी यांच्याविरोधात सर्व विरोधी पक्ष एकवटले होते. त्यामध्ये जनसंघाचे अटल बिहारी वाजपेयी आणि डावे पक्षही सहभागी होते.
विरोधकांना हरवण्यासाठी वेळोवेळी पक्ष एकत्र येतात हे राजकारणात नेहमीचं आहे, पण देशातील सर्वांत मोठ्या पक्षाच्या अध्यक्षांनी अशा प्रकारची तुलना करणं हे पहिल्यांदाच होताना दिसत आहे.
गोरखपूर आणि फूलपूर लोकसभा पोटनिवडणूक हरल्यानंतर उत्तर प्रदेशचे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी यांनी सपा-बसपाच्या आघाडीची तुलना साप आणि मुंगसासोबत केली होती.
अमित शाह यांची नवी राजकीय खेळी
अमित शाह यांचा राजकीय अनुभव दोन दशकांहून अधिक आहे. आता हे तर आपण म्हणू शकत नाही की ते जे काही बोलत आहे ते चुकून बोललं गेलं. तसं पण ते भाषण वाचूनच दाखवत होते.
गेल्या महिन्यात त्यांची जीभ घसरली होती. आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराला हे देशातील सर्वांत भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत, असं म्हणाले होते.
त्यांच्या भाषणावेळी अनुवादकाने चूक केली होती. मोदी देशाचं वाट्टोळं करतील असं त्यांच्या अनुवादकानं म्हटलं होतं.
तर आपण असं म्हणू शकतो की 2019 च्या निवडणुकीचं वातावरण तापत आहे आणि त्याच्या झळा शाहंना बसू लागल्या आहेत. त्यातच सपा-बसपा एकत्र येणार असल्यामुळं हे वातावरण आणखी गरम होणार असं दिसत आहे.
उत्तर प्रदेशातील 80 जागांना खूप महत्त्व प्राप्त झालं आहे, पण लोकसभेच्या दोन जागावर हार पत्करावी लागल्यामुळं त्यांना नैराश्य आलं असं देखील म्हणणं योग्य ठरणार नाही.
विरोधी पक्षाच्या मोर्चेबांधणीच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी ते पूर्णपणे तयार आहेत असं देखील वाटत आहे.
निवडणुका जिंकणं हे एकच उद्दिष्ट
रणनीतीच्या स्तरावर म्हणाल तर त्यांनी आपल्या भाषणांमध्ये दोन संकेत दिले आहेत. कुठल्याही परिस्थितीत आरक्षण संपू देणार नाही, असं त्यांनी निक्षून सांगितलं.
दुसरी गोष्ट, 'येत्या 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी पक्षाचे 20 हजार कार्यकर्ते जयंतीच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करतील,' असं ते म्हणाले.
जशा जशा निवडणुका जवळ येत आहेत तसं तसं अमित शाह यांच्या पोतडीतून असे अनेक मास्टरस्ट्रोक बाहेर येताना दिसतील.
गेल्या तीन वर्षांत त्यांनी हे किती तरी वेळा दाखवून दिलं आहे की पक्षाला निवडणूक जिंकवून देण्याशिवाय त्यांच्यासमोर कुठलंही महत्त्वपूर्ण उद्दिष्ट नाही.
पण जर त्यांनी सार्वजनिक ठिकाणी थोडा संयम दाखवला आणि विरोधी पक्षातील नेत्यांना आदरानं वागवलं तर त्यांची राजकीय उंची कमी होणार नाही.
आपल्या उद्दिष्टासमोर जर त्यांना आपल्या वैयक्तिक उंचीची काळजी नसेल तर कमीत कमी त्यांनी ही तरी गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की ते एका 'महान' आणि 'राष्ट्रवादी' पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)