कर्नाटकचा गड काबीज करण्यासाठी काय करतील अमित शहा?

    • Author, इम्रान कुरेशी
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गेल्या आठ दिवसांत 2वेळा बंगळुरूचा दौरा केला आहे. 3 महिन्यानंतर कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून ते पक्षाच्या निवडणुकीच्या तयारीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा पराभव करणं हा त्यांचा उद्देश आहे.

शहा यांना आधीच बंगळुरूला पोहोचायला हवं होतं. पण 31 डिसेंबरला धुक्यामुळे त्यांच्या विमानाला उशीर झाला. त्यामुळे त्यांना ही बैठक लवकर उरकावी लागली. केंद्रीय नेतृत्वाला सल्ले न देता केंद्रीय नेतृत्व जे सांगेल ते ऐकायचं, असे आदेश त्यांनी स्थानिक नेतृत्वाला दिले आहेत.

जैन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू संदीप शास्त्री सांगतात, "अनेक लोक या पद्धतीला 'अमित शाह स्कूल ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट' म्हणतात. शहा अतिशय बारकाईनं प्रचार अभियानाचं नेतृत्व करतात. इतकंच नाही तर प्रचार अभियानावर त्यांची करडी नजर असते आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते नेतृत्व करतात."

स्थानिक नेतृत्व

प्राध्यापक शास्त्री मानतात की कर्नाटकमधल्या प्रादेशिक नेतृत्वावर शहा यांचा विश्वास नाही. प्रादेशिक नेतृत्व मतदारांच्या मनात विश्वास निर्माण करू शकलेलं नाही, असं त्यांना वाटतं.

ते म्हणाले, "अमित शहा यांना एका गोष्टीची जाणीव आहे की कर्नाटकमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी निवडणुकीच्या तयारीवर बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे."

अमित शहा जेव्हा बंगळुरूला येतात तेव्हा स्थानिक नेत्यांमध्ये एक प्रकारची खळबळ आणि अस्वस्थता बघायला मिळते. कोणत्यातरी मोठ्या परीक्षेला बसायचं आहे अशा प्रकारची त्यांची वर्तणूक असते. आपल्या मागच्या दौऱ्यात त्यांनी काँग्रेसच्या आमदारांवर आरोपपत्र दाखल करायला सांगितलं होतं. त्यांनी पक्षाच्या सदस्यांना प्रत्येक बूथसाठी एक यादी प्रमुख निवडायलासुद्धा सांगितलं होतं.

कर्नाटकचे भाजपचे प्रवक्ते वमन आचार्य सांगतात, "मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अमित शहा जेव्हा इथे आले होते तेव्हा लोकांना असं वाटलं की ते जादुची कांडी आणतील. पण त्यांनी सांगितलं की लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप कष्ट घेण्याची गरज आहे."

लिंगायत समा

डॉ. वमन आचार्य सांगतात, "मागच्या वेळी त्यांनी आम्ही केलेल्या तयारीची पाहणी केली होती. पण आम्ही त्यांच्या दौऱ्याला घाबरतो हे म्हणणं योग्य नाही. त्यांच्या येण्यामुळे आम्ही आधी पण घाबरत नव्हतो आणि आताही घाबरलो नाही."

धारवाड विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक हरीश रामस्वामी म्हणाले, "अमित शहा मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांचा सामना कसा करावा, हे सांगायला इथं आले आहेत. सिद्धरामय्या राजकारणाच्या भाषेत पारंगत आहेत आणि त्यामुळे भाजप बचावात्मक भूमिकेत दिसतो."

प्राध्यापक रामास्वामी म्हणतात, "काँग्रेसनं केलेल्या विकासाला आणि गरिबांच्या हितासाठी राबवलेल्या धोरणांना तोडीस तोड असं काहीही भाजप शोधू शकलेलं नाही. डी. के. शिव कुमार यांच्यासारख्या मंत्र्यावर आयकर विभागाच्या पडलेल्या धाडीचा मुद्दा भाजपला तापवता आला नाही. लिंगायत समाजाची वोट बँक मिळवण्यात भाजप यशस्वी ठरलेलं नाही. त्यांच्याकडे दुसरा कोणताही भक्कम पर्याय नाही."

कर्नाटकात योगी

भाजप नेतृत्व फार आधीपासूनच दुहेरी राजकारण करताना दिसते. एका बाजुला बी. एस. येदियुरप्पा परिवर्तन बसमध्ये फिरून विकासाबाबत बोलतात. तर दुसऱ्या बाजुला केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हिंदुत्वाचा झेंडा पुढे घेऊन जाताना दिसतात.

कर्नाटक काँग्रेसचे उपाध्यक्ष बी. एल. शंकर म्हणाले, "हिंदुत्वाचा अजेंडा कर्नाटकच्या काही किनारी भागातल्या जिल्ह्यांतच चालतो. उरलेल्या राज्यात जातीचे मुद्दे धर्मावर वरचढ ठरतात. लोकांना फुटीरवादी शक्ती आवडत नाहीत."

शंकर मानतात की कर्नाटकचे लोक योगी आदित्यनाथ यांना 'हिंदू आयकॉन' म्हणून अजिबात बघत नाही. त्यांनी सांगितलं, "जर ते गोहत्येबद्दल बोलले तर लोक त्यांना गोरखपूर येथे झालेल्या बालमृत्यूंबद्दल नक्कीच विचारतील."

भाजपचं रेकॉर्ड

डॉक्टर आचार्य सांगतात, "काँग्रेसला सरकारविरोधी असंतोषाचा सामना करावा लागत आहे. ते समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांना एकत्र आणू शकत नाही. ते शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊ शकत नाहीत. राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. किनारी भागात आतापर्यंत 28 लोकांच्या हत्या झाल्या आहेत."

प्राध्यापक शास्त्री यांच्या मते काँग्रेस अजूनही स्थानिक मुद्दयांना चिकटून आहे आणि संपूर्ण जबाबदारी सिद्धारमय्या यांच्याकडे ढकलत आहेत. राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी हा वाद टाळण्यासाठी कदाचित असं केलं जात असावं. तर त्याचवेळी भाजप स्थानिक मुद्द्यांना घाबरतं. कारण 2008 ते 2013 या काळातील त्यांची कामगिरीही चांगली नाही.

सिद्धारमय्या कर्नाटकसाठी वेगळा झेंडा तसंच बंगळुरू मेट्रोत हिंदीत घोषणा न होणं असे मुद्दे उचलत आहेत. दुसरीकडे भाजप राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर खेळत आहे. थोडक्यात काय तर कर्नाटकमध्ये यश हवं असेल तर अमित शाह यांना लहानसहान गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल.

पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची वैयक्तिक भेट घेण्याकडे भाजपला लक्ष द्यावं लागेल आणि त्यांना लोकांशी बोलायला प्रेरणा द्यावी लागेल.

पण वस्तुस्थिती अशीही आहे की कर्नाटकमध्ये 1985पासून प्रत्येक दुसऱ्या टर्ममध्ये विरोधी पक्ष सत्तेत आला आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)