अमित शहांचे पुत्र जय शहा आहेत तरी कोण?

    • Author, प्रशांत दयाल
    • Role, पत्रकार

2010 मध्ये एक 20 वर्षांचा मुलगा देशातले नामवंत वकील राम जेठमलानी यांच्याबरोबर गुजरात हायकोर्टात येत असे. कोर्टाच्या कामकाजादरम्यान वकील बसतात त्याच्या मागे दुसऱ्या रांगेत बसून तो सगळी सुनावणी ऐकत असे.

एका बाजूने राम जेठमलानी युक्तिवाद करत आणि दुसऱ्या बाजूने KTS तुलसी तो खोडून काढण्यासाठी प्रतिवाद करत.

हे सगळं सुरू असताना हा तरुण मुलगा वकिलांच्या युक्तिवादापेक्षा न्यायाधीशांच्या चेहऱ्यावरच्या बदलत्या भावाकडे नजर ठेवून असे.

सुनावणीदरम्यान तो सतत हनुमान चालीसाचा जप करत असे.

2010 पर्यंत या तरुण मुलाबद्दल कुणाला फारशी माहिती नव्हती. याचं नाव जय शहा. जय अमित शहा. भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांचा एकुलता एक मुलगा.

2010 मध्ये अमित शहा यांना सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणी अटक झाली होती.

त्या वेळी वडिलांच्या जामीन अर्जावरच्या सुनावणी प्रकरणी पहिल्यांदा लोकांचं आणि माध्यमांचंही लक्ष जय शहा यांच्याकडे गेलं.

गुजरात उच्च न्यायालयानं अमित शहा यांना जामीन मंजूर केला, पण सर्वोच्च न्यायालयानं अमित शहांना गुजरातमध्ये जायला बंदी घातली. अमित शहा गुजरापासून दूर दिल्लीला गेले. त्या वेळी ते गुजरातच्या नारणपुरा मतदारसंघाचे आमदार होते.

अमित शहा त्यांच्या मतदारसंघापासून दूर गेल्यानंतर त्यांच्या अनुपस्थितीत मुलगा जय यांचं नाव पुढे आलं आणि मतदार आपल्या मागण्या घेऊन जय शहांकडे जाऊ लागले. त्याच वेळी जय यांना वडिलांच्या स्टॉक मार्केट व्यवसायातही लक्ष घालावं लागत होतं.

या काळात जय शहा यांना जवळून ओळखणाऱ्या आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या सांगण्यानुसार याच काळात या तरुण मुलाचं व्यक्तिमत्त्व घडत गेलं.

वडिलांच्या पायावर पाऊल ठेवत जय शहा यांनी गुजरात क्रिकेट असोसिएशनमध्ये प्रवेश मिळवला.

नरेंद्र मोदी भारताच्या पंतप्रधानपदी पोहोचल्यावर गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या चेअरमनची रिकामी झालेली खुर्ची अमित शहा यांना मिळाली.

अमित शहा यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नेमणूक झाल्यावर त्यांनी या पदाचा कार्यभार मुलगा जय यांच्याकडे सोपवला आणि जय शहा गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या सहसचिवपदी नेमले गेले.

गुजरात क्रिकेट असोसिएशनचे माजी पदाधिकारी हितेश पटेल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, 'अमित आणि जय शहा यांची व्यक्तिमत्त्व वेगळी आहेत. जय खूपच लो प्रोफाइल राहणं पसंत करतात.'

'गुजरात क्रिकेट असोसिएशनसारख्या मोठ्या संघटनेचं दैनंदिन कामकाज सांभाळायला त्यांच्याकडे पुरेसा वेळ नसतो आणि वडील अमित शहा यांच्याएवढी समजही नाही', असंही पटेल म्हणाले.

जय शहा इंजिनिअर असून निरमा इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटची पदवी त्यांच्याकडे आहे. आपली सहाध्यायी ऋषिता पटेलबरोबर त्यांनी तीन वर्षांपूर्वी विवाह केला.

अमित आणि जय शहा हे दोघेही कटाक्षाने पाळत असलेली एक कॉमन गोष्ट म्हणजे ते त्यांचं व्यक्तिगत आयुष्य प्रकाशझोतापासून दूरच ठेवतात.

अमित शहा यांचे निकटवर्तीय कमलेश त्रिपाठी असा दावा करतात की, त्यांनी जय यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास जवळून पाहिला आहे. त्रिपाठी बीबीसीशी बोलताना म्हणाले, "एका बड्या राजकारण्याचा मुलगा म्हणून जयनं काही गृहित धरता कामा नये, याबाबत अमित शहा आग्रही होते. त्यांनी तशी पूर्ण काळजी होती."

जय आणि अमित शहा यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसणारा आणखी एक समान धागा म्हणते ते दोघेही दिखाऊ आणि बढाईखोर नाहीत. ते सहजासहजी कुणालाही आपल्या निकटच्या वर्तुळात किंवा कुटुंबात सामील करून घेत नाहीत.

जय यांना मुलगी झाली, तेव्हाही एका छोट्या समारंभात मोजक्याच मित्र आणि कुटुंबीयांसह त्यांनी तो आनंद साजरा केला.

कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याशी कोणत्याही विषयावर थेट संवाद साधायचा नाही, अशी स्पष्ट सूचना अमित शहा यांनी जय यांना दिल्याचं बोललं जातं.

आपली संपत्ती वाढवणे हीच पॅशन जय शहांकडे दिसते. ग्राउंडवर क्रिकेट मॅच बघतानादेखील ते नेहमी फोनवरून शेअर उलाढाल करताना दिसतात.

त्यांनी लो-प्रोफाईल राहण्याचा कितीही प्रयत्न केला तरी "द वायर"मध्ये रविवारी प्रसिद्ध झालेल्या लेखानंतर आता सर्वदूर त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

जय यांनी अमित शहा यांच्या संबंधांचा वापर करून आपला व्यवसाय वाढवला, असं या लेखात म्हटलं गेलं आहे. तर हे आरोप खोटे असल्याचे सांगत जय आता "द वायर" वर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहेत.

(या लेखातील मतं ही लेखकाची वैयक्तिक असून बीबीसीची नाहीत.)

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)