You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'अमित शहा की लूट' आणि 100 कोटींचा दावा
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मुलाची - जय शहाची - मालकी असलेल्या कंपनीची उलाढाल अवाजवी प्रमाणात वाढल्याची बातमी 'द वायर' या वेबसाईटने दिल्यानंतर आता जय शहा 'वायर'वर 100 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहेत.
माझ्याविरुद्ध प्रसिद्ध झालेली बातमी खोटी असल्याचा दावा करत त्यांनी म्हटलं आहे की "माझे व्यवसाय पूर्णतः कायदेशीर आहेत." त्यांच्या कंपन्यांच्या चढता आलेख आणि वडील अमित शहा यांचा चढता राजकीय आलेख यांच्यात संबंध असू शकतो, असा दावा 'द वायर'ने केला आहे.
"माझ्या कंपनीला मिळालेलं कर्ज शुद्ध आर्थिक निकषांवर आणि कायद्याला धरून आहे," असंही ते म्हणाले. या कर्ज मिळण्याच्या प्रक्रियेवर 'द वायर'मधल्या बातमीने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मी कर्ज पूर्णतः फेडलं आहे, असा दावा जय यांनी केला आहे.
भारतीय जनता पक्षानेही संध्याकाळी या वृत्ताचं खंडन केलं. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकार परिषदेत हे वृत्त असत्य असून बदनामीच्या उद्देशानं लिहिलं गेल्याचा दावा केला. जय शहा यांची कंपनी वैध मार्गानेच व्यवसाय करते आणि त्यांच्या उत्पन्नाचे सगळे स्रोत उघड असल्याचंही त्यांनी सांगितलं.
''विकास' जयसोबत खेळतोय'
अमित शहा यांचा मुलगा जय शहा यांच्या मालकीच्या कंपनीचं उत्पन्न 2015-16 या एका वर्षात कैक पटींनी वाढलं असल्याची बातमी 'द वायर' या वेबसाईटनी दिली आणि सोशल मीडियावरही यासंबंधी चर्चेला ऊत आला.
सोशल मीडियावर #AmitShahKiLoot हा हॅशटॅग दिवसभर ट्रेंड होत आहे. यावर अनेकांनी उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
#LiesAgainstShah हा हॅशटॅग अमित शहा समर्थक वापरत होते. समर्थक आणि विरोधकांसोबतच सामान्य नागरिकांनीही या ट्विटर आणि सोशल युद्धात भाग घेतला.
राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील अनेक जण याबाबत सोशल मीडियावरून व्यक्त झाले. सामान्य व्यक्तींनीही हा हॅशटॅग वापरून यावर विविध प्रतिक्रिया नोंदवल्या.
फझलूर रहमान यांनी ट्वीट करुन म्हटलं आहे की, "विकास अमित शहाच्या घरात सापडला असून तो सध्या अमित शहांचा मुलगा जयसोबत खेळत आहे."
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर #विकास पगला गया है हा ट्रेंड होता. त्यात मोदी सरकारला अपेक्षित असलेला विकास नेमका गेला कुठे? असा प्रश्न लोकांनी विचारला होता.
आता अमित शहांच्या मुलाची बातमी आणि विकास गेला कुठे या दोन गोष्टींवर कोट्या करून लोक ट्विटरवर पोस्ट करताना दिसले. यातल्या बहुतेक प्रतिक्रिया अमित शहा आणि त्यांच्या मुलाचा निषेध करणाऱ्या होत्या.
तरी काही पोस्ट मात्र अमित शहा, जय शहा यांची बाजू घेऊन ही बातमी खोटी आहे, असं सांगणाऱ्याही आहेत.
"अमित शहांच्या मुलासंबंधी आलेली बातमी ही फेक न्यूज असून तिचा फुगा गुजरात निवडणुकीनंतर नक्कीच फुटेल," असं प्रांजल पांडे यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.
याच विषयाला धरुन ट्विवरवर अमित शाह की लूट हे अकाऊंट बनवण्यात आलं आहे.
त्याद्वारे करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये अमित शहा मोदींना संपत्ती वाढण्यामागे 'टेक्निकल एरर' (तांत्रिक अडचणी) कारणीभूत असल्याचं सांगत आहेत. यासंदर्भात व्यंगचित्र, फोटो वापरूनही लोकांनी ट्वीट केलं आहे.
अमित शहांनी काही दिवसांपूर्वीच आर्थिक मंदी नसल्याचं सांगताना जीडीपी कमी होण्यामागे 'टेक्निकल एरर' कारणीभूत असल्याचं म्हटलं होतं. त्याचा याला संदर्भ आहे.
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे नेते सीताराम येचुरी यांनी यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
त्यांनी म्हटलं आहे की, "अमित शहांनी आमच्या पक्ष कार्यालयावर काढलेला कथित मोर्चा हा त्यांचं कुटुंब करत असलेली लूट, शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न आणि संकटात सापडलेले उद्योग यांवरचं लक्ष विचलित करण्यासाठी होता."
मंदावलेला विकास दर, अर्थमंत्री अरुण जेटली यांचा कारभार यावरही यानिमित्ताने लोक व्यक्त झाले.
अभिषेक पेटेकर यांनी याबाबत सरकारला एक दिल्ला असून त्यात ते म्हणतात, "जेटलींऐवजी जय अमित शहा यांना अर्थमंत्री करा. जेणेकरुन देशाची इकॉनॉमी 16 हजार पटींनी वाढेल."
अमर के. चंद्रा यांनी मात्र ट्वीटच्या माध्यमातून, या बातमीच्या खरेपणावर प्रश्न उपस्थित केला आहे. अमित शहांच्या मुलाला याबाबत विचारण्यात आलं होतं की नाही असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या आणि काँग्रेसच्या नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी लिहिलं आहे की, 'जय का विकास.' हा तोच विकास आहे ज्याबदद्ल सरकार गेल्या काही वर्षांपासून बोलत होतं.
फोर्ब्सच्या यादीनुसार मुकेश अंबांनींच्या संपत्तीत वाढ झाल्याची बातमी काल आली होती. त्याचा संदर्भ काही लोकांनी दिला आहे.
"मुकेश अंबानींची संपत्ती दुप्पट झाली आहे, तर अमित शहांच्या मुलाची संपत्ती 16 हजार पटींनी वाढली आहे. अच्छे दिन फक्त काही लोकांनाच आले असून देश मात्र वाईट परिस्थितीत आहे." असं इलयास शराफुद्दीन यांनी ट्वीट करुन म्हटलं आहे.
अंकुर जय श्री राम या ट्विटर अकांऊटवरुन ट्वीट करण्यात आलं आहे की,
"जे लोक आज अमित शहा की लूटला ट्रेंड करत आहेत. तीच माणसं काँग्रेस जेव्हा देशाला लूटत होती तेव्हा मात्र शांत बसलेली होती."
जेम्स विल्सन यांनी मात्र या विषयाला धरुन सरकारला उपरोधिक टोला मारला आहे.
त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "अमित शहांचा मुलगा शेतकरी असल्यामुळं त्याचं उत्पन्न 16 हजार पटींनी वाढलं आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी केलेला हा पायलट प्रोजेक्ट आहे."
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)