कठुआ बलात्कार-खून प्रकरण : आठ वर्षांच्या चिमुकलीचा जीव नेमका कशामुळे गेला?

    • Author, समीर यासिर
    • Role, मुक्त पत्रकार, श्रीनगर

आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या जम्मूजवळच्या कठुआमध्ये करण्यात आली. देशभरात खळबळ माजवणाऱ्या या घटनेमुळे या भागात तणावाचं वातावरण आहे.

17 जानेवारीच्या सकाळी मोहम्मद युसूफ पुजवाला हे गावातल्या लोकांच्या गराड्यात होते. तेव्हा एक शेजारी धावत त्यांच्याकडे आला आणि त्याने पुजवालांना बातमी सांगितली - "तुमच्या मुलीचा मृतदेह आम्हाला घरापासून काही अंतरावर झुडुपांत सापडला आहे."

" माझ्या मुलीचं काहीतरी वाईट झालं आहे, असं मला वाटत होतं." असं पुजवाला यांनी बीबीसीला सांगितलं. जेव्हा ते बीबीसीशी बोलत होते तेव्हा शेजारीच बसलेली त्यांची पत्नी नसीमा बीवी मुलीच्या नावाने आक्रोश करत होत्या.

आसिफाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. यात सेवानिवृत्त शासकीय अधिकारी, चार पोलीस अधिकारी आणि एका अल्पवयीन व्यक्तीचा समावेश आहे.

आसिफाचं अपहरण कसं झालं?

आसिफा आणि तिचं कुटुंब जम्मू शहरापासून 72 किलोमीटर अंतरावर राहत होतं. यावर्षी 10 जानेवारीला ती बेपत्ता झाली.

पुजवाला हे भटक्या मेंढपाळांशी संबंधित मुस्लीम समुदायातील आहेत. त्यांना गुज्जर असं संबोधलं जातं. आपल्या बकरी आणि म्हशींना चरायला हिमालयात नेतात.

"घोड्यांना घरी परत आणण्यासाठी आसिफा जंगलात गेली होती. घोडे परत आले, पण आसिफा आली नाही," आसिफाची आई सांगते. नसीमा यांनी त्यांच्या पतीला हे सांगितलं. ते आणि त्यांचे काही शेजारी आसिफाचा शोध घ्यायला निघाले. बॅटरी, कंदील आणि कुऱ्हाड सोबत घेऊन ते रात्रभर तिला शोधत राहिले. पण त्यांना ती काही सापडली नाही.

दोन दिवसानंतर, म्हणजेच 12 जानेवारीला कुटुंबीय पोलिसांत तक्रार दाखल करायला गेले. "पण पोलीस काही मदत करत नव्हते," असं पुजवाला सांगतात.

"आसिफा एखाद्या मुलासोबत पळून गेली असेल," असंही एका पोलीस कर्मचाऱ्याने म्हटल्याचं ते सांगतात.

ही बातमी पसरताच गुज्जरांनी निदर्शनं करायला सुरुवात केली. त्यांनी रास्ता रोको केला. अखेर मुलीच्या शोधासाठी दोन पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले. यातला एक दीपक खजुरिया यालाच नंतर गुन्ह्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

पाच दिवसांनंतर आसिफाचा मृतदेह सापडला. "तिचं शरीर छिन्नविच्छिन्न झालं होतं. पाय तोडण्यात आले होते. तिची नखं काळी पडली होती आणि तिच्या दंडावर आणि बोटांवर लाल खुणा होत्या," नसीमा सांगतात.

तपासात काय पुढे आलं?

23 जानेवारीला म्हणजेच आसिफाचा मृतदेह सापडल्याच्या सहा दिवसांनंतर जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी क्राईम ब्रांचला घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले.

चौकशीतून समोर आलं की काही दिवस आसिफाला स्थानिक मंदिरात बांधून ठेवण्यात आलं आणि औषधं देऊन तिला बेशुद्धावस्थेत ठेवण्यात आलं. आरोपपत्रानुसार तिच्यावर काही दिवस सातत्याने बलात्कार करण्यात आला, तिचा छळ करण्यात आला आणि शेवटी तिची गळा दाबून हत्या करण्यात आली. त्यापूर्वी दोनदा तिच्या डोक्यावर दगडानं वार करण्यात आले."

60 वर्षीय निवृत्त शासकीय अधिकारी संजी राम यांनी पोलीस अधिकारी सुरेंद्र वर्मा, आनंद दत्ता, तिलक राज आणि खजुरिया यांना हाताशी धरून हा गुन्हा केला.

राम यांचा मुलगा विशाल, त्यांचा अल्पवयीन भाचा आणि त्याचा मित्र परवेश कुमार यांच्यावरही बलात्कार आणि खुनाचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

खजुरिया आणि इतर पोलीस अधिकारी तर आसिफाच्या घरच्यांसोबत तिची बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करण्यासाठी त्यांच्याबरोबर गेले होते आणि तिला शोधण्यासाठीही ते सोबत होते.

चौकशी अधिकाऱ्यांच्या मते आसिफाचे रक्ताळलेले आणि मातीने माखलेले कपडे फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यापूर्वी या पोलीस कर्मचाऱ्यांनी धुतले होते.

घटनेचे व्यापक पडसाद

या घटनेमुळे हिंदूबहुल जम्मू आणि मुस्लीमबहुल काश्मीर यांच्यात असलेला अंतर्विरोध चव्हाट्यावर आला आहे. 1989 मध्ये काश्मीर खोऱ्यात भारताविरुद्ध सशस्त्र बंडाळी करण्यात आली होती, तेव्हापासून तिथलं वातावरण तणावपूर्ण आहे.

या घटनेमुळे जम्मूत निदर्शनं करण्यात येत आहेत. आरोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयात प्रवेश करणाऱ्या पोलिसांना अडवण्याचा वकिलांनी प्रयत्न केला. तसंच आरोपींच्या समर्थनार्थ निघालेल्या निदर्शनात भारतीय जनता पक्षाचे दोन मंत्रीही सहभागी होते.

जम्मू-काश्मीरमध्ये भाजप आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पक्ष यांची आघाडी सत्तेवर आहे.

जम्मूत राहणाऱ्या गुज्जर समुदायाच्या मनात दहशत निर्माण करण्याचा आरोपींचा प्रयत्न होता, असं चौकशी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. चरण्यासाठी मेंढपाळ जम्मूमधल्या सार्वजनिक आणि वनजमिनीचा वापर करतात. काही दिवसांपूर्वी या प्रदेशातल्या हिंदू लोकांशी त्यांचा वाद निर्माण झाला होता.

"हे जागेविषयी होतं," असं आदिवासी कार्यकर्ते आणि वकील तालिब हुसेन सांगतात. आसिफाच्या कुटुंबीयांच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या हुसेन यांनी आरोप केला की स्थानिक पोलिसांनी त्यांना अटक करून धमकीही दिली आहे.

आरोपींच्या वतीनं निदर्शनं करणाऱ्या वकिलांपैकीच असलेल्या अंकुर शर्मा यांनी आरोप केला आहे की, "भटके मुसलमान हिंदूबहुल जम्मूची संरचना बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. ते आमच्या जंगलांवर आणि पाणी स्रोतांवर अतिक्रमण करत आहेत. आरोपींवर खोटे आरोप करण्यात आले आहेत आणि खरे गुन्हेगार अद्याप मोकाट आहेत."

जम्मूमध्ये या गुन्ह्यावर जास्त लक्ष केंद्रित झालं नसलं तरी श्रीनगरच्या वर्तमानपत्रांनी या घटनेला पहिल्या पानावर स्थान दिलं आहे.

गुज्जर नेते मियान अल्ताफ यांनी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत या वर्तमानपत्रांतील बातमी झळकवत चौकशीची मागणी केली. "ही घटना कौटुंबिक प्रकरण असून अल्ताफ गुन्ह्याचं राजकारण करत आहेत," असं भाजप सदस्य राजीव जसरोटिया यांनी म्हटलं आहे.

आसिफाच्या अंत्यसंस्कारादरम्यान काय झालं?

गुज्जरांना आसिफाला एका स्मशानभूमीत दफन करायचं होतं, जिथं त्यांनी काही वर्षांपूर्वी जमीन खरेदी केली होती. यापूर्वी तिथं पाच लोकांचं दफन करण्यात आलं आहे. "पण जेव्हा आसिफाचा मृतदेह घेऊन ते तिथं गेले तेव्हा हिंदू कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला आणि दमदाटी करून धमकावलं," असं पुजवाला सांगतात.

"सात मैल अंतर चालून आम्हाला तिला दुसऱ्या गावात दफन करावं लागलं," पुजवाला सांगतात.

काही वर्षांपूर्वी झालेल्या एका अपघातात त्यांच्या दोन मुलींचा मृत्यू झाला होता. पत्नीच्या आग्रहाखातर त्यांनी नंतर भावाच्या मुलीला म्हणजेच आसिफाला दत्तक घेतलं होतं.

"आसिफा म्हणजे बोलकी चिमणी होती, जी हरणासारखी धावायची," आसिफाची आई सांगते. ज्यावेळेस ते कुठे बाहेरगावी असायचे तेव्हा ती त्यांच्या कळपाची राखण करायची.

"तिच्या या गुणांमुळे ती आम्हा सर्वांची लाडकी होती. आमच्या जगाचं केंद्रस्थान होती," असं आसिफाची आई सांगते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)