You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लोकसभा 2019 : बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्याविना निवडणुकीत काय होईल?
- Author, प्रदीप कुमार,
- Role, बीबीसी प्रतिनिधी
चारा घोटाळ्यासंदर्भातील अनेक प्रकरणांमध्ये कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांना सुप्रीम कोर्टातून जामीन मिळालेला नाही.
त्यामुळे 2019च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान ते तुरुंगातच राहतील आणि बिहारमध्ये प्रचारासाठी फिरताना दिसणार नाहीत. ना ते राष्ट्रीय जनता दलासाठी प्रचारसभा घेऊ शकतील ना पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात कोणतीही राजकीय भूमिका घेऊ शकतील.
बिहारमध्ये सुमारे 42 वर्षांनंतर निवडणुकीच्या रिंगणातून लालू प्रसाद यादव गायब असतील. लालूप्रसाद यादव 1977मध्ये पहिल्यांदा बिहारच्या सारणमधून निवडणूक जिंकून लोकसभेत गेले होते. तेव्हापासून ते बिहारच्या राजकारणात भूमिका बजावत आहेत.
निवडणुकीत पराभव होत असताना त्यांची राजकीय कारकीर्द संपली, असं टीव्हीवर विवेचन केलं जात असो किंवा त्यांचा विजय होत असताना त्यांना भारतीय लोकशाहीचा चमत्कार म्हणवलं जात असो... गेल्या चार दशकांमध्ये बिहारच्या राजकारणामध्ये लालू यांची छाप दिसून आली आहे.
लालू यांना चारा घोटाळ्यातील ज्या प्रकरणांमध्ये शिक्षा झाली आहे, त्याची सर्वांत आधी तक्रार करणाऱ्या लोकांमध्ये शिवानंद तिवारी यांचा समावेश आहे. आजकाल हेच तिवारी लालूंच्या राजदबरोबर आहेत.
लालूप्रसाद यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिल्यावर शिवानंद तिवारी म्हणाले, "त्यांना जामीन मिळेल अशी आम्हाला अपेक्षा होती. मात्र त्यांना तो मिळाला नाही. हे सगळ्यांच्या लक्षात येतंय."
लोकांना काय लक्षात येत आहे, यावर शिवानंद तिवारी म्हणाले, "ज्याप्रकारे ठरवून लालूंना फसवण्यात आलंय आणि ज्याप्रकारे त्यांना एकाच प्रकरणामध्ये शिक्षा देण्यात येत आहेत, हे सगळं काही लोकांना समजतंय. हे मी आज लालूंबरोबर आहे म्हणून सांगत नाहीये तर मी हे सगळं काही जवळून पाहिलंय म्हणून सांगतोय."
सध्या लालूप्रसाद यादव ज्या प्रकरणात शिक्षा भोगत आहेत, तो घोटाळा बिहारमध्ये झाला होता आणि त्यामुळे सरकारी महसुलाचं मोठं नुकसान झालं होतं. अर्थात वर्षानुवर्षं चाललेला हा घोटाळा आपणच पहिल्यांदा उघडकीस आणून दिला होता, असा दावा लालूप्रसाद यांनी केला होता.
पण याच प्रकरणात सध्या लालूप्रसाद जेलमध्ये आहेत आणि बिहारचे आणखी एक माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्र यांची मात्र या प्रकरणातून सुटका झाली आहे.
लालू यांचा प्रभाव
यावर शिवानंद तिवारी म्हणतात, घोटाळा तर झाला होता. मात्र तो वर्षानुवर्षे व्यवस्थात्मक पद्धतीने होत होता. या घोटाळ्यामध्ये जे नुकसान झाले ते भरून काढण्याचा आणि वसुली करून सरकारी महसुलात टाकण्याचा उद्देश होता. मात्र हे सर्व झालंच नाही आणि संपूर्ण प्रकरणात केवळ लालू प्रसाद यादव यांना फसवणं हा उद्देश राहिला.
शिवानंद तिवारी याचं कारणही सांगतात, लालू यांनी ब्राह्मणवाद, भाजपा आणि रा.स्व. संघाविरोधात जी भूमिका घेतली त्याची किंमत त्यांना चुकवावी लागली आहे.
प्रचारादरम्यान लालू जेलमध्ये राहिल्यामुळे नेहमीसारखं त्यांचं ग्रामीण व्यक्तीमत्त्व पाहायला मिळणार नाही. तसं पाहायला गेलं तर 2013 साली चारा घोटाळ्यात शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतरच त्यांच्यावर निवडणूक लढवण्यास बंदी घालण्य़ात आली होती.. मात्र 2014 साली लोकसभा आणि 2015 साली विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या पक्षाच्या आणि आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार करण्याची संधी मिळाली होती.
2015 साली बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये लोकप्रियता आणि साधनं असूनही नरेंद्र मोदी लालू प्रसाद यादव यांना आव्हान देऊ शकले नव्हते. यातील एका प्रचारसभेवेळेस लालू यांनी मोदी यांची नक्कल करून आपल्या समर्थकांना खूप हसवलं होतं.
ते आपल्या एका प्रचारसभेत तर म्हणाले होते, मोदीजी अशाप्रकारे बोलू नका नाहीतर मानेची शिर तुटेल. बिहारला पॅकेज देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेची नक्कलही त्यांनी केली होती.
2014 च्या लोकसभा निवडणुकांनंतर नरेंद्र मोदी यांच्या जादूसमोर लालूप्रसाद यांचा प्रभाव दिसणार नाही असं बोललं जात होतं. परंतु लालू यांनी नितीशकुमार यांच्या मदतीने बिहारमध्ये अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना निष्प्रभ करून दाखवले होते.
नुकतीच लालू यांचे त्यांच्या राजकीय प्रवासावर आधारीत आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे. रुपा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या गोपालगंज टू रायसिना, माय पॉलिटिकल जर्नी या पुस्तकात त्यांनी आपल्या अत्यंत कमी वयातच नक्कल करण्याची सवय लागली होती असं लिहिलं आहे.
या पुस्तकात त्यांनी लिहिले आहे, नक्कल करायला मी कोठे शिकलो हे मला माहिती नाही, परंतु त्यात मी पारंगत होतो. माझे मित्र आणि शिक्षकांना ते फार आवडायचं. माझ्या शाळेत एकदा 'द मर्चंट ऑफ व्हेनिस' नाटक बसवण्यात आलं होतं. त्यात मी शायलॉकची भूमिका केली होती. तेव्हा माझी संवादफेक लोकांना भरपूर आवडली होती.
भोजपुरीमध्ये ऑल इंडिया रेडिओवर प्रसारित होणाऱी मालिका लोहासिंह या लालू यांच्यावर मोठा प्रभाव पडला. त्या मालिकेतील मुख्य पात्र लोहा सिंह ब्रिटीश लष्करातून निवृत्त झालेला सैनिक होता. त्याचे संवाद लोकांना आवडायचे.
लालू यांनी आपल्या पुस्तकामध्ये लोहा सिंहच्या अनेक संवादांचा उल्लेख केला आहे. उदाहरण द्यायचे झाले तर, "ओ खादरेन के मदर, जानत बाड़ू, मेहरारू के मूंछ काहे ना होला और मर्द के माथा के बाल काहे झर जाला?" याचं उत्तर लोहा सिंह देतात,
"सुन ला, मेहरारू लोग ज़बान से काम लेला, इ से मुंछ झर झाला और मर्द लोग दिमाग से काम लेला, इ से कपार के बाल झर झाला.
लालू यांची ग्रामिण शैली
लालू यांनी आपल्या शालेय जीवनापासूनच लोहा सिंहची नक्कल करायला सुरुवात केली. भविष्यात लोकांशी जोडण्यास त्यांना त्याची मदत झाली.
शिवानंद तिवारी म्हणतात, लालू जे बोलतात ते थेट बोलतात. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. 1990च्या काळामध्ये ज्या पद्धतीने बिहार सरंजमशाहीमध्ये गुरफटलेला होता त्यावेळेस दुसरा कोणता मार्गही नव्हता. त्य़ामुळे त्यांनी गोरगरिबांना आवाज मिळवून देण्याचं निश्चित केलं. त्यामुळं ते आपल्या खास ग्रामीण शैलीमध्ये बोलत राहिले. आजही त्यांच्यासारखं बोलणारा नेता नाही.
लालू प्रसाद यादव यांच्या राजकीय वाटचालीकडे पाहणाऱ्या लोकांना कदाचित हे आठवत असेल, ते जेव्हा 1990 साली पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना भाजपासह सर्व विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळाला होता. मात्र त्यांनी यानंतर राममंदिर रथयात्रा करणाऱ्या लालकृष्ण अडवाणी यांना अटक केली होती.
त्यावेळी त्यांनी गांधी मैदान येथे केलेल्या भाषणाची आठवण आजही लोकांना आहे. त्यात ते म्हणाले होते, जर माणूसच राहिला नाही तर मंदिरात घंटा कोण वाजवेल? जर माणूसच राहिला नाही तर मशिदीत प्रार्थना कोण करेल. नेते, पंतप्रधान यांच्या जीवाची किंमत आहे तितकीच सामान्य माणसाच्या जीवनाचीही किंमत आहे. माझं सरकार राहो या जावो दंगल घडवणाऱ्यांशी समझोता करणार नाही.
लालू यांनी अडवाणी यांना अटक केली आणि त्यानंतरसुद्धा बिहारमधून कोणत्याही प्रकारच्या दंगलीची बातमी आली नाही. मात्र त्यानंतर लालू यांनी भाजपा आणि रा. स्व. संघ यांना कायमस्वरुपी राजकीय शत्रू बनवले.
लालू प्रसाद यादव यांना राष्ट्रीय माध्यमांनी नेहमीच खलनायकाप्रमाणे प्रस्तुत केले. मात्र एकापाठोपाठ एक प्रचारसभा घेत लालूप्रसाद विरोधीपक्षांना आपली ताकद दाखवत राहिले.
त्यांच्या प्रचारसभांची नावंही मोठी रोचक असंत. त्यांच्या पहिल्या रॅलीचं नाव गरीब रॅली होतं. 1995 साली झालेली ही रॅली बिहारमध्ये झालेल्या मोठ्या रॅलीपैकी एक होती. 1997 साली लालू यांनी रॅलीचं नाव बदलून महागरीब रॅली असं नाव ठेवलं. 2003 साली घटत्या जनाधाराकडे पाहून त्यांनी लाठीरॅलीचं आयोजन केलं होतं. त्यानंतर चेतावनी रॅली, भाजपा भगाओ-देश बचाओ अशा रॅलीमध्ये लोकांना गोळा करण्यात ते यशस्वी झाले.
सामान्य लोकांशी जुळवून घेण्याच्या त्यांच्या खुबीला त्यांचे विरोधकही मानतात.
जनता दल युनायटेडचे प्रवक्ते राजीव रंजन सांगतात, त्यांची शैली नैसर्गिक आहे आणि लोकांशी जोडून घेण्यात त्यांचा हात धरणारा कदाचित दुसरा नेता सापडणार नाही हे निश्चित. परंतु परिवार आणि भ्रष्टाचारामुळे त्यांनी स्वतःला विसंगत बनवलं आहे.
लालू प्रसाद यादव जेलमध्ये असल्यामुळे बिहारमध्ये त्यांच्या पक्षाच्या राजकारणावर परिणाम झालेला दिसून येत आहे. महागठबंधनच्या जागा आणि उमेदवारांना ठरवण्यात फार वेळ गेला. तसेच लालू प्रसाद यांचा मोठा मुलगा बंडखोरी करत मैदानात उतरला. यावरून राजद पक्षाची स्थिती कमकुवत असल्याचे अनुमान काढले जात आहे. तसेच लालू बाहेर असते तर अशी स्थिती आलीच नसती असं बोललं जात आहे.
परंतु त्यांच्या अनुपस्थितीमुळे राजदच्या स्थितीवरही परिणाम होईल का हा मोठा प्रश्न आहे.
राजीव रंजन सांगतात, नितिश कुमारजींनी ज्या प्रकारे बिहारला नवी दिशा दिली आहे, ती पाहता लालूप्रसाद असते तरी राजद आणि महागठबंधनला कोणताही फायदा झाला नसता. आणि ते जेलमध्ये आहेत तेव्हाची स्थिती सगळ्यांच्या समोर आहे. त्यांच्या कुटुंबात भांडणं आहेत, महागठबंधनमध्ये जागांवरून वाद आहेत.
मात्र शिवानंद तिवारी याचं मात्र यापेक्षा वेगळं म्हणणं आहे, ते म्हणतात, लालू जेव्हा संकटात असतात तेव्हा त्यांचे कट्टर मतदार त्यांच्या मदतीसाठी एकत्र येतात. असं अनेकदा झालं आहे आणि यावेळेसही असंच होत आहे.
बिहारमधील ज्येष्ठ राजकीय पत्रकार आणि बाबू जगजीवनराम संशोधन संस्थेचे संचालक श्रीकांत म्हणतात, लालू यांची स्वतःची शैली तर होती. ते ज्याप्रकारे भाजपावर आक्रमक टीका करायचे. त्याप्रकारे आक्रमण करणारा दुसरा नेता नाही. त्यामुळे महागठबंधनमध्ये त्यांची अनुपस्थिती जाणवेल.
तेजस्वी यादव यांचे राजकीय सल्लागार संजय यादव म्हणतात, लालूजी असते तर त्यांच्या उपस्थितीचा प्रभाव तर झालाच असता. परंतु ते प्रचारसभेत का नाहीत, त्यांना का रोखलं जात आहे हे बिहारी लोकांना समजत आहे. त्यांच्या विचारानुसार चालणारे अनेक तरुण आहेत. त्यामुळेच आमच्या प्रचारसभांमध्ये इतकी गर्दी दिसून येत आहे.
सामान्य लोकांवर परिणाम
महागठबंधनमध्ये सहभागी राष्ट्रीय लोकसमता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव फजल इमाम मलिक सांगतात, लालू यांना जामीन मिळाला असता तर पुन्हा एकदा बिहारमध्ये दलित, मागास आणि अल्पसंख्यांकांची एकजूट पाहायला मिळाली असती. पण आघाडीला मिळणारं समर्थन कोठेही कमी झालेलं दिसून येत नाही. बिहारमधील सर्वात मोठी शक्ती लालूप्रसादच आहेत.
बिहारमधील महागठबंधनमध्ये लालू प्रसाद यादव यांचा किती प्रभाव आहे हे पाहाण्यासाठी काँग्रेस पार्टीमध्ये नुकतेच सहभागी झालेल्या शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्रकार परिषदेला पाहायला हवे. त्यामध्ये ते स्पष्टपणे म्हणतात, "लालूजींनी काँग्रेसबरोबर जाऊन विरोधी पक्षांना मजबूत करणार असल्याचं सांगितलं आहे."
शत्रुघ्न सिन्हा यांना राजदकडून तिकीट मिळेल असे मानलं जात होतं मात्र नंतर रवीशंकर प्रसाद यांच्याविरोधात सजातीय मते मिळवण्यासाठी त्यांना काँग्रेसच्या मार्गे महागठबंधनचे उमेदवार बनवण्यात आले.
परंतु बिहारमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि बिहार सरकारमधील कॅबिनेट मंत्री विनोद नारायण यांचं मत वेगळं आहे. त्यांच्यामते, भाजपा प्रणित आघाडीसमोर लालू प्रसाद यादव यांनी असणं किंवा नसणं याचा काहीही फरक पडत नाही. ते म्हणतात, 2009च्या सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळेस भाजपा-जदयू आघाडीसमोर लालू प्रसाद जेलच्या बाहेरच होते. तेव्हा आम्ही 32 जागा जिंकल्या होत्या. तेव्हा त्यांचा काय प्रभाव होता? 2014 मध्ये नितिशजी भाजपाबरोबर नव्हते तेव्हाही आम्हाला 22 जागा मिळाल्या होत्या. तेव्हाही लालूप्रसाद बाहेरच होते.
झा म्हणतात, नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि भाजपा-जदयू-लोजपा आघाडीसमोर महागठबंधनची ताकद क्षीण झाली आहे.
अर्थात लालू प्रसाद यादव यांच्या गैरहजेरीत तेजस्वी यांना स्थिर होण्यास मदत झाली आहे. ज्याप्रकारे त्यांनी महागठबंधनच्या जागावाटपात मागास आणि दलितांना प्रतिनिधित्व दिलं आहे, त्यातून राजकीय परिपक्वता दिसते असं विश्लेषकांना वाटतं.
संजय यादव म्हणतात, बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात तेजस्वी यादव यांच्या जवळपास 52 ठिकाणी सभा झाल्या आहेत. ते स्टार कॅंपेनर म्हणून पुढे आले आहेत. बिहारमध्ये इतर कोणत्याही नेत्याने 20 सभाही घेतल्या आहेत.
बिहार विधानसभेच्या दरम्यान लालूप्रसाद यादव यांनी एकट्याने 252 प्रचारसभांना संबोधित केलं होतं. त्यामुळे तेजस्वी यांच्यासमोर मोठं आव्हान आहे. त्यांच्यासमोर गर्दी तर जमत आहेत. पण त्याचं रुपांतर मतांमध्ये होतं की नाही हे पाहायला हवं.
याचा अंदाज लालू प्रसाद यांनाही आला असेल, म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्यांनी लगेच एक पत्रक काढून न्यायाच्या बाजूने बिहारी लोकांनी मतदान करावे असं त्यांनी बिहारवासियांना आवाहन केलं होतं.
लालू यादव यांचे समर्थक आणि लालूविरोधक यांच्या मतामध्ये कोणताही बदल झाला नसल्याचं दिसून येत नाही हे मात्र निश्चित. त्यांचे समर्थक त्यांना सामाजिक राजकारणाचे मसिहा मानतात. तर त्यांचे विरोधक त्यांना भ्रष्टाचार आणि घराणेशाही जोपासणारे नेते मानतात.
लालूप्रसाद यादव यांच्या शासनकाळात बिहारची जी प्रतिमा झाली होती आणि लालू यांच्या परिवारावर करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत कोणीही बोलण्यास तयार नाही. आता केवळ नरेंद्र मोदी आणि नितिश कुमार यांच्या कामकाजाची आणि प्रतिमेची चर्चा होत आहे किंवा महागठबंधनच्या जातीय समीकरणांची चर्चा होत आहे. दोघांमध्ये बरोबरीचा सामना होत असल्याचे मानले जाते.
लालू जेव्हा आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सर्वोच्च बिंदूवर होते तेव्हा 'जब तक रहेगा समोसे मे आलू तब तक रहेगा बिहारमे लालू' असे ते लोकांना सांगायचे. मात्र यावेळेस लालू स्वतः नाहीत मात्र त्यांची परंपरा चालवणारे तेजस्वी यादव आहेत. काही विश्लेषकांच्या मते तेजस्वी यादव यांना राजकीय डावपेच समजू लागले आहेत आणि त्यामुळेच त्याचं राजकारण पुढे जाईल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)