जेव्हा राहुल गांधींच्या चेहऱ्यावर 'प्रकाश' पडला होता...

2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी चर्चा करताना, राहुल गांधींच्या चेहऱ्यावर हिरव्या रंगाचा प्रकाश पडला होता. तो प्रकाश लेजर वेपनचा असू शकतो, अशी चिंता काँग्रेसनं व्यक्त केली होती. तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनाही पत्राद्वारे काँग्रेसनं याबाबत कळवलं होतं.

पुरावा म्हणून काँग्रेसने व्हीडिओ जोडला होता. त्या व्हीडिओत हिरव्या रंगाचा प्रकाश राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर पडल्याचं दिसत होतं. तो प्रकाश स्नायपर गनच्या लेझर लाइटचा असू शकतो असं काँग्रेसनं म्हटलं होतं.

आतापर्यंत भारताच्या दोन माजी पंतप्रधानांची हत्या झाली आहे. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मृत्यूची आठवण अजूनही भारतीय नागरिकांच्या मनात ताजी आहे, असं काँग्रेसनं राजनाथ सिंह यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं.

राजीव गांधी यांच्या हत्येच्या वेळी सुरक्षेत कमालीचा हलगर्जीपणा झाला होता. गुप्तहेर खात्याकडून सूचना मिळूनही त्यांची हत्या रोखण्यात अपयश आलं होतं.

राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर पडलेला प्रकाश ही गंभीर बाब असून त्यामुळे काँग्रेसमध्ये चिंतेचं वातावरण आहे. घातपाताची पुसटशी शक्यता असेल तर आपण ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी असं या पत्रात म्हटलं होतं.

गृहमंत्रालयाच्या SPG (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) विभागाच्या संचालकांनी म्हटलं होतं की, हा प्रकाश कॅमेऱ्याच्या लाइटचा आहे. काँग्रेसचा फोटोग्राफर राहुल गांधी यांचं शूटिंग घेत असताना तो प्रकाश पडला. अद्याप आमच्याकडे काँग्रेसचं पत्र आलं नाही. या घटनेची चर्चा माध्यमांमध्ये झाल्यानंतर आम्ही तपास केला. तेव्हा आमच्या लक्षात आलं की राहुल यांच्या चेहऱ्यावर पडलेला प्रकाश हा कॅमेऱ्याचाच आहे.

राहुल गांधी यांच्या सुरक्षेच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्यात यावं असं काँग्रेसनं म्हटलं होतं. राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा झाल्याचा आरोप त्यांनी केला होता.

तर त्यांचे हे आरोप गृहमंत्रालयाने फेटाळले होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)